विराटच्या अग्रस्थानाला धोका

0
109

>> रोहित शर्मापेक्षा केवळ सहा गुण अधिक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील आपल्या पाच अर्धशतकांच्या बळावर फलंदाजी क्रमवारीतील आपले पहिले स्थान कायम राखले आहे. परंतु, रोहित शर्मा याने विराटच्या स्थानाला धोका निर्माण केला आहे. प्रगतीपथावर असलेल्या विश्‍वचषक स्पर्धेत ६३.१४च्या सरासरीने ४४२ धावा केलेल्या विराटने केवळ एक गुणाची भर आपल्या पूर्वीच्या गुणांत घातली असून त्याचे ८९१ गुण झाले आहे. दुसर्‍या स्थानावरील रोहित त्याच्यापेक्षा केवळ सहा गुणांनी मागे आहे. रोहितच्या नावावर ८८५ गुणांची नोंद आहे. विश्‍वचषक स्पर्धेच्या एका आवृत्तीत पाच शतके ठोकणारा जगातील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविलेल्या रोहितच्या कारकिर्दीतील हे सर्वाधिक गुण आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम तिसर्‍या स्थानी पोहोचला असून साखळी फेरीत ६३८धावा जमवलेला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर सहाव्या क्रमांकावर आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने चार स्थानाची सुधारणा करत आठव्या स्थानासह ‘टॉप १०’मध्ये पुनरागमन केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च पंधरावे स्थान प्राप्त केले आहे. इंग्लंडचे स्फोटक सलामीवीर जेसन रॉय व जॉनी बॅअरस्टोव यांनी मोठी झेप घेतली असून रॉयने १३वे स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाचा नवोदित यष्टिरक्षक फलंदाज आलेक्स केरी व दक्षिण आफ्रिकेचा उदयोन्मुख फलंदाज रस्सी वेंडर दुसेन यांनी अनुक्रमे वैयक्तिक सर्वोत्तम ३४वे व ३०वे स्थान आपल्या नावे केले आहे. युवा खेळाडूंचा विचार केल्यास श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडो याने ११० स्थानांची मोठी प्रगती करताना ८५वे तर विंडीजच्या निकोलस पूरनने ‘टॉप ४००’च्या बाहेरून थेट ९२व्या स्थानावर हक्क सांगितला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन याने फलंदाजीत वैयक्तिक सर्वाधिक ६९२ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत.

गोलंदाजांचा विचार केल्यास अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह याने २१ गुणांपर्यंत मर्यादित असलेले अंतर ५६ गुणांपर्यंत वाढवले आहे. विश्‍वचषकातील साखळी फेरीतील ८ सामन्यांत १७ बळी घेतल्याचा फायदा त्याला झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्‌ट्रिक नोंदविलेला न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दुसर्‍या क्रमांकावर कायम आहे. साखळी फेरीत अफगाणिस्तानला सर्व सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असला तरी मुजीब उर रहमान व राशिद खान यांनी ‘अव्वल १०’मधील आपले स्थान राखले आहे. स्पर्धेपूर्वी फॉर्म मिळविण्यासाठी झगडत असलेल्या मिचेल स्टार्क व मोहम्मद आमिर यांनी आपल्या दमदार कामगिरीवर आरुढ होत सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे. इंग्लंडची जोडगोडी जोफ्रा आर्चर (+ १०३, ४२वे स्थान) व मार्क वूड (+ १०, १९वे स्थान) यांच्यासह पाकिस्तानचा युवा डावखुरा जलदगती गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी (+ ३४, २३वे स्थान) यांना ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे. अष्टपैलूंचा विचार केल्यास बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर कायम आहे. इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने नऊ स्थानांची उडी घेताना दुसरे स्थान आपल्या नावे केले आहे. सांघिक क्रमवारीत इंग्लंडचा संघ १२३ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. काही दशांश गुणांनी त्यांनी आपले पहिले स्थान टिकविले आहे. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया (११२) यांचे समान गुण आहेत. दक्षिण आफ्रिका ११० गुण घेत पाचव्या स्थानी आहे.

फलंदाज टॉप १० ः १. विराट कोहली (भारत, ८९१), २. रोहित शर्मा (भारत, ८८५), ३. बाबर आझम (पाकिस्तान, ८२७), ४. फाफ ड्युप्लेसी (द. आफ्रिका, ८२०), ५. रॉस टेलर (न्यूझीलंड, ८१३), ६. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया, ८०३), ७. ज्यो रुट (इंग्लंड, ७९१), ८. केन विल्यमसन (न्यूझीलंड, ७९०), ९. क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका, ७८१), १०. ऍरोन फिंच (ऑस्ट्रेलिया, ७७८)

गोलंदाज टॉप १० ः जसप्रीत बुमराह (भारत, ८१४), २. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड, ७५८), ३. पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया, ६९८), ४. कगिसो रबाडा (द. आफ्रिका, ६९४), ५. इम्रान ताहीर (द. आफ्रिका, ६८३), ६. मुजीब रहमान (अफगाणिस्तान, ६८१), ७. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया, ६७५), ८. राशिद खान (अफगाणिस्तान, ६५८), ९. कुलदीप यादव (भारत, ६५८), १०. लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड, ६५०)
अष्टपैलू टॉप ५ ः १. शाकिब अल हसन (बांगलादेश, ४०६), २. बेन स्टोक्स (इंग्लंड, ३१६), ३. मोहम्मद नबी (अफगाणिस्तान, ३१०), ४. इमाद वासिम (पाकिस्तान, २९९), ५. राशिद खान (अफगाणिस्तान, २८८).