विराटचे अव्वलस्थान भक्कम

0
76

>> वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा ‘टॉप २०’मध्ये

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी कसोटी क्रमवारीतील आपले पहिले स्थान अधिक भक्कम केले आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तीन स्थानांची झेप घेत गोलंदाजांच्या यादीत पुन्हा ‘अव्वल २०’मध्ये प्रवेश केला आहे. साऊथहॅम्पटन कसोटीतील ४६ व ५८ धावांच्या बळावर कोहलीने कारकिर्दीतील सर्वोत्तम ९३७ रेटिंग गुण मिळविले आहेत. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या ८ डावांत ५४४ धावा लुटलेला कोहली सर्वाधिक रेटिंग मिळविलेल्या खेळाडूंमध्ये ११व्या स्थानी आहे.

गॅरी सोबर्स, क्लाईड वॉलकॉट, व्हिवियन रिचडर्‌‌स व कुमार संगकारा ही चौकडी केवळ एका गुणाने पुढे आहे. फलंदाजांमध्ये चेतेश्‍वर पुजारा भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून कायम आहे. चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात केलेल्या नाबाद १३२ धावांच्या जोरावर त्याचे सहावे स्थान कायम आहे. त्याचे गुण मात्र ७६३ वरून ७९८ झाले आहेत.

गोलंदाजांमध्ये शमी ‘अव्वल २०’मध्ये परतला आहे. सहा बळींच्या जोरावर त्याने १९वे स्थान मिळविले आहे. इशांत शर्माने एका स्थानाने वर सरकताना २५वे स्थान प्राप्त केले आहे. जसप्रीत बुमराहने अल्पावधीत ४८७ गुणांपर्यंत पोहोचताना ३७वे स्थान आपल्या नावे केले आहे.

इंग्लंडचा विचार केल्यास सॅम करन व मोईन अली या अष्टपैलूंनी मोठी उडी घेतली आहे. २० वर्षीय करन याने फलंदाजांमध्ये २९ क्रमांकांची सुधारणा करत ४२वे स्थान मिळविले आहे. करनने गोलंदाजीतही ११ स्थानांची प्रगती करत ५५वे व अष्टपैलूंमध्ये १५वे स्थान आपले केले आहे. चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरलेल्या मोईन अली याने गोलंदाजीत तीन स्थानांनी वर सरकताना ३३वा क्रमांक मिळविला आहे. त्याने आपल्या ९ बळींच्या जोरावर ६६ गुणांची कमाई करताना आपली गुणसंख्या ५४३ केली आहे. फलंदाजीत जोस बटलर (+ १५, ३२वे स्थान), बेन स्टोक्स (+ ३, २९वे स्थान), किटन जेनिंग्स (+ ४, ८६वे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे.