विनोद देसाई आपला कर्मचारी कधीच नव्हता!

0
119

>> फसवणूक प्रकरणात आयुष मंत्र्यांची साक्ष

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल पणजीच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात हजर राहून त्यांच्या कार्यालयातील कथित माजी कर्मचारी विनोद देसाई यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणी न्यायालयापुढे साक्ष दिली.
विनोद देसाई यानी आपणाला गोवा सचिवालयात नोकरी देण्याचे आश्‍वासन देऊन आपणाकडे सहा लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच आपणाकडे आगाऊ २ लाख रुपये घेतले होते, अशी तक्रार गेल्या सप्टेंबर महिन्यात मर्विन फर्नांडिस याने जुने गोवे पोलिसात केली होती. यावेळी विनोद देसाई यांना पोलिसांनी समन्स पाठवल्यानंतर त्यांनी फर्नांडिस यांना ३ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, तो न वठल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली होती.

या प्रकरणी जेएमएफसीने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना समन्स पाठवून त्यांना आरोपीवर असलेल्या आरोपांविषयी काय माहिती आहे ती न्यायालयाला द्यावी, अशी सूचना केली होती. काल न्यायालयात साक्ष देताना आपण आरोपीला गेल्या १०-१५ वर्षांपासून ओळखत आहे. तो कधी कधी आपल्या घरी यायचा. मात्र, आपणाकडे कधीही कामाला नव्हता. मात्र, त्याचे वडील आपणाकडे कामाला होते, असे नाईक यांनी कोर्टात साक्ष देताना सांगितले.
विनोद देसाई हा आपला कर्मचारी नसल्याचे आपण २६ सप्टेंबर रोजीच जुने गोवे पोलिसांना कळवले होते, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले.