विनानोंदणी प्लॅस्टिक पिशव्याविक्री करणार्‍यांवर १ एप्रिलपासून कारवाई

0
63

>> पणजी मनपा ः मासिक ४ हजार रुपये शुल्क

पणजी महापालिकेकडे नोंदणी न करता महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करणार्‍यांवर येत्या १ एप्रिलपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अजित रॉय यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ज्या दुकानदारांना प्लॅस्टिकच्या पिशव्या विकायच्या असतील त्यांना पणजी माहपालिकेकडे रितसर त्यासाठीची नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी करणार्‍यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या विकण्यासाठीचा परवाना म्हणून नंतर दर महिन्याला त्यासाठीचे ४ हजार रुपये एवढे शुल्क भरावे लागणार असल्याचे रॉय यांनी ह्या वेळी स्पष्ट केले.

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन कायद्या खाली २०१७ खाली नोंदणी करणे बंधनकारक असून जे दुकानदार ही नोंदणी करत नाहीत त्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूदही कायद्यात असल्याची माहितीही रॉय यांनी ह्या वेळी दिली.

पणजीत सात ठिकाणी
फेरीवाल्यांसाठी विक्री विभाग
फिरते विक्रेते व हातगाडेवाले यांना एकाच ठिकाणी बसून आपला माल विकता यावा यासाठी पणजी महापालिका क्षेत्रात त्यांच्यासाठी सात ठिकाणी विक्री विभाग (हॉकर्स झोन) स्थापन करण्याचा महापालिकेचा विचार आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत हे विभाग स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन विक्री विभाग सुरू करण्यात येणार असून ते डॉनबॉस्को हायस्कूलजवळ व मिरामार येथे असतील, अशी माहिती रॉय यानी दिली.

महापालिका महसूल
१२ टक्क्यांनी वाढणार
पणजी महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेकडून परवाना न घेता अथवा परवान्यांचे नूतनीकरण न कता व्यवसाय करणार्‍या दुकानदारांचे सर्वेक्षण पणजी महापालिकेने केलेले असून परवान्यांशिवाय व्यवसाय करणार्‍यांवर मोहीम उघडण्याची तयारी पणजी महापालिकेने केली आहे. एकदा ही मोहीम सुरू झाली की पणजी महापालिकेच्या महसूलात १२ टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहितीही रॉय यानी दिली.