विधिमंडळ वार्तांकनासाठीचा ‘तो’ मसुदा कच्चा : सभापती

0
85

विधानसभा कामकाजाच्या वार्तांकनाबाबत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे हा केवळ कच्चा मसुदा आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊन वार्तांकनासाठी अंतिम मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली जाणार आहेत, अशी माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

विधानसभा वार्तांकनासाठी मार्गदर्शक तत्त्वाच्या प्रश्‍नावर माघार घेणार नाही. पत्रकार संघटना, पीएसीकडून याबाबत योग्य सूचना घेऊन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक तत्त्वांची नितांत गरज आहे, अशी माहिती डॉ. सभापती सावंत यांनी दिली.

विधानसभेच्या वार्तांकनासाठी विधानसभेच्या संकेतस्थळावर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे जाचक असल्याने पत्रकारांकडून त्याच्या विरोधात आवाज उठविण्यात आला आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना विधानसभेच्या माध्यम सल्लागार समितीला (पीएसी) विश्‍वासात घेण्यात आलेले नाही, असे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेच्या पीएसीच्या कालच्या बैठकीत मार्गदर्शक तत्त्वांसंबंधीचा मुद्दा उपस्थित झाला. विधिमंडळ वार्तांकनाच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत पीसीएला अंधारात ठेवल्याबद्दल समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पीएसीच्या सदस्यांना मार्गदर्शक तत्त्वांबाबत विधायक सूचना करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली आहे. तसेच गोवा श्रमिक पत्रकार संघटना व इतरांच्या सूचना विचारात घेण्यात येतील. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी जूनपर्यंत मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. पीएसीच्या बैठकीत अंतिम स्वरूपातील मार्गदर्शक तत्त्वे ठेवली जाणार आहेत, असेही सभापतींनी सांगितले.