विधानसभेत जॅक सिक्वेरांच्या पुतळ्यासाठी कॉंग्रेसचा ठराव

0
99

>> सर्व आमदार एकत्रित ठराव मांडणार ः कवळेकर

गोवा विधानसभा परिसरात जनमत कौलाचे नेते जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करणारा खासगी ठराव पुढील विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेस पक्षातर्फे मांडण्यात येणार असून पक्षाचे सर्व १६ आमदार एकत्रितपणे हा ठराव मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी काल कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

जनमत कौलाचे एक प्रमुख नेते जॅक सिक्वेरा यांचा गोवा विधानसभा परिसरात पुतळा उभारण्यात यावा ही कॉंग्रेस पक्षाची मागणी आहे. आणि या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाचे सर्व आमदार एकत्रितपणे आवाज उठवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पक्षाने यापूर्वीच वरील मागणी केलेली असून आता अधिवेशनात रितसरपणे त्यासाठी खासगी ठराव मांडण्यात येणार असल्याचे कवळेकर म्हणाले.

विविध आश्‍वासनांसंबंधी
सरकारला जाब विचारणार
मनोहर पर्रीकर यांचे सरकार सत्तेवर आले त्याला येत्या मार्च महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार असून या एका वर्षाच्या काळात सरकारने जनतेला जी विविध आश्‍वासने दिली होती त्यापैकी किती आश्‍वासने पूर्ण केली त्यासंबंधी कॉंग्रेस पक्ष या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचेही कवळेकर यानी यावेळी नमूद केले.
कॅसिनो धोरणाचे काय झाले
सरकारने गेल्या अधिवेशनात कॅसिनो धोरणासंबंधीचे आश्‍वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही.

कोळसा प्रदूषण व राज्यातील सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा प्रश्‍नही ऐरणीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या प्रश्‍नावर आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र लिहिले होते. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. वरील सर्व प्रश्‍नांवर पक्षाचे सर्व आमदार विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील दर्यावर्दी लोकांचाही एक प्रश्‍न असून त्यांना सीडीसीचे नूतनीकरण करण्यासाठी (जहाजावर नोकरीसंबंधीची परवानापत्रे) दहावी उत्तीर्ण असायला हवे अशी नवी अट घालण्यात आलेली आहे. एवढी वर्षे जहाजावर नोकरी करणारे व दहावी उत्तीर्ण नसलेले हे लोक आता दहावीची परीक्षा देऊ शकतील काय, असा सवाल कवळेकर यांनी यावेळी उपस्थित केला