विधानसभेचे कामकाज : जावे आमदाराच्या वंशा, तेव्हा कळे…!

0
290

– विष्णू सुर्या वाघ 

( भाग-४)
आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मतदार विधानसभेत आमदारांना व लोकसभेत खासदारांना निवडून देतात. मात्र या लोकप्रतिनिधींचे काम नक्की काय असते याची बर्‍याच लोकांना यत्किंचितही कल्पना नसते. खासदारांचे तरी एकवेळ बरे आहे. कारण त्यांचा बहुतांश वेळ दिल्लीत जातो. बिचार्‍या आमदारांना मात्र रोज आपल्या मतदारांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकारची कामे घेऊन लोक आमदाराच्या घरी थडकतात. आमदाराने हे काम केलेच पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. मतदारांना आपल्या आमदाराकडून काय काय अपेक्षित असते त्याची यादी केली तर खालील गोष्टी ठळकपणे लक्षात येतात.
१. आमदाराने आपल्या बेकार मुला-मुलींना सरकारी नोकरी मिळवून दिली पाहिजे ही लोकांची पहिली अपेक्षा असते. कुठल्याही सरकारी कार्यालयातून नोकरीचा कॉल आला की लोक पहिली धाव आमदाराकडे घेतात. राजकीय वजन असल्याशिवाय सरकारी नोकरी मिळत नाही हा समज आता जनतेमध्ये दृढ झाला आहे. त्यामुळे नोकरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे किंवा संबंधित मंत्र्याकडे आमदाराने शब्द टाकावा ही मतदारांची अपेक्षा असते. ‘पात्रांव, हें तुमच्याच हातीन आसा. तुमी मनार घेयत जाल्यार जातलें’ असे प्रत्येकजण सांगतो ते या अपेक्षेपोटीच!
२. मतदार अगोदरच सरकारी नोकर असेल तर बदली करून घेणे किंवा बदली रद्द करणे या दोन्ही कामांसाठी त्याला पहिली आठवण होते ती आपल्या आमदाराची. एखादा माणूस सरकारी नोकरीत चिकटला की राहत्या ठिकाणापासून दूरच्या ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही. सरकारी नोकरीत अनेक माणसे एका जागी छानपैकी ‘स्थिरावतात.’ त्यांनाही आपले स्थलांतर इतरत्र झालेले परवडत नाही. काहीजणांसाठी विशिष्ट पोस्टींग हे मिळकतीचे साधन असते. तिथून दुसर्‍या जागी हाकलले की त्यांचा ‘बॅलन्स’ हलतो. काहीजणांच्या अडचणी खरोखर जटिल असतात. या परिस्थितीत बदली करून घेण्यासाठी किंवा झालेली बदली रद्द करण्यासाठी लोकांना आमदाराचा आधार हवा असतो.
माझ्याबाबतीत घडलेली एक मजेशीर गोष्ट. मतदारसंघातील एक जवळचा माणूस एक दिवस आपली ट्रान्सफर ऑर्डर घेऊन आला. आल्या आल्या रडायला लागला. म्हणाला- ‘साहेब, गेली दहा वर्षे मी इमानेइतबारे काम करतोय. कामात कधी खोटी केली नाही. पण डिपार्टमेंटमध्ये नवा साहेब आला आणि दुसर्‍या दिवशी माझी बदली केली! काही करा पण तुम्ही शब्द टाका आणि बदली रद्द करून घ्या. इज्जतीचा प्रश्‍न आहे साहेब!’
त्याची ती हवालदिल अवस्था पाहून मला त्याची दया आली. सुदैवाने त्याचा साहेब माझ्या चांगला ओळखीचा होता. मी फोन लावून त्याला या महाभागाच्या बदलीबाबत विचारलं. त्यानं दिलेलं स्पष्टीकरण ऐकून मी उडालो. तो अधिकारी म्हणाला- ‘सर, त्याला एवढंच विचारा की त्याची बदली कुठं झालीय? मी काय त्याला पणजीवरनं काणकोणला टाकलाय का? अहो एका सेक्शनमधनं दुसर्‍या सेक्शनमध्ये पाठवलाय, तेसुद्धा तो सध्या काम करतोय त्याच बिल्डिंगमध्ये! फरक एवढाच की तो दुसर्‍या मजल्यावर होता, मी त्याला आता चौथ्या मजल्यावर पाठवलाय,’
अधिकार्‍याचं स्पष्टीकरण ऐकून माझा चेहरा खर्रकन् उतरला. कसंबसं त्याला ‘सॉरी’ म्हणून मी फोन ठेवला. बदलीसाठी वशिला मागायला आलेल्या मतदाराकडं रागानं बघितलं. ऑफिसरनं काय सांगितलं ते बहुधा त्यानं ताडलं असावं. मी चिडून काहीतरी बोलण्याआधीच तो म्हणाला- ‘साहेब, मला ठाऊक आहे तो काय सांगणार. सेकंड फ्लोअरवरून फोर्थ फ्लोअरला टाकलंय म्हणून बोलला ना? पण माझी अडचण माहीत आहे का त्याला साहेब? हे बघा, गुडघ्यावर ऑपरेशन झालं गेल्या वर्षी. अपोलोत केलं. तीन लाख रुपये खर्च आला. हा असला गुडघा घेऊन चार मजले कसे चढणार? …प्लीज साहेब… काही करा, पण…’
त्याचा तो दीनवाणा चेहरा बघून त्याची दया येत असतानाच मला चटकन आठवलं. ज्या इमारतीत या माणसाचं डिपार्टमेंट आहे त्या इमारतीत तर लिफ्टची सोय आहे. चार मजले चढून जाण्याची गरजच काय?
मी त्याला यासंबंधी विचारलं तर त्याचं उत्तर तयारच होतं. ‘साहेब, लिफ्ट आहे खरी, पण तिचा काय भरवसा? शिवाय पुन्हा पुन्हा पॉवर कट. लिफ्ट मध्येच अडकते. दोन आठवड्यांआधी मीच अडकलो. तब्बल दोन तास! जीव जायची पाळी. तेव्हा कानाला हात लावून शपथ घेतली, पाय मोडले तरी चालतील पण पुन्हा लिफ्टने जाणार नाही. तेव्हापासून मी जिने चढून वर जातो. आता दुसर्‍या मजल्यापर्यंत ठीक आहे, पण चौथ्या मजल्यापर्यंत कसे जाणार? माझ्या डायरेक्टरला जरा सांगा ना साहेब?’..
आता यावर मी काय बोलणार होतो कपाळ?
३. हल्ली शेजार्‍या-शेजार्‍यांत किंवा भावा-भावांत घरावरून, जमिनीवरून, मालमत्तेवरून तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. कुटुंब वाढते, पण जमीन काही वाढत नाही. माणसे वाढत जातात तसा जमिनीचा तुटवडा भासू लागतो. यावरून भांडणे, वितंडवाद होतात. पोलीस स्टेशनवर तक्रार होते. अशावेळी आमदाराने आपल्यासाठी पोलीस स्टेशनवर शब्द टाकावा ही लोकांची अपेक्षा असते. मालमत्तेचे प्रकरण उपजिल्हाधिकार्‍यांपर्यंत गेले तरी आमदाराने तिथे आपले वजन वापरावे असे मतदार मानतात. गुन्हा आपला असला तरी पोलिसांच्या कचाट्यातून आपणाला वाचवणे हे आमदाराचे आद्य कर्तव्य असते अशी लोकांची समजूत असते.
४. धार्मिक उत्सव, मनोरंजन, खेळ इत्यादी क्षेत्रात मतदारसंघात जे जे काही घडते त्याला आमदाराने स्पॉंसरशिप दिलीच पाहिजे ही मतदारांची एक प्रमुख अपेक्षा असते. गावागावांत युवकांचे संघ आहेत. ते तिन्ही त्रिकाळ कसली ना कसली स्पर्धा आयोजित करीत असतात. सेवन-ए-साईड फुटबॉल, टेनिस बॉल क्रिकेट, बॅडमिंटन, रस्सीखेच (टग ऑफ वॉर) सारख्या स्पर्धांचे पेवच हल्ली फुटले आहे. या स्पर्धांची बक्षिसे देण्यासाठी परमेश्‍वराने आमदाराला पाठवले आहे अशीच जणू लोकांची धारणा असते. चतुर्थीपासून दिवाळीपर्यंत भजन, घुमट आरती, फुगडी इत्यादी स्पर्धा होतात. या स्पर्धांची बक्षिसे कुणाकडून घ्यावी? आमदाराकडून! दसर्‍याला गरब्याची धूम असते. गरब्याची स्पॉंसरशिप कोण देणार? आमदार! जत्रोत्सवामध्ये नाटके होतात. नाटकांचा प्रायोजक कोण? तो आमदाराशिवाय आहेच कोण? इगर्जीच्या फेस्ताला तियात्र हवा असतो. तोही आमदारानेच द्यावा लागतो. जगात सर्व सोंगे आणता येतात पण पैशांचे सोंग आणता येत नाही अशा आशयाची जुनी म्हण आहे. आमदाराला मात्र रोज नवे सोंग आणावे लागते. देणगी देत नाही म्हटले की झाला त्याच्या इमेजचा सत्यानाश! शिवाय आमदाराच्या या दुर्बलतेचा फायदा घ्यायला त्याचे विरोधक टपलेले असतात ते वेगळेच.
याशिवाय इतरही अनेक कारणांसाठी लोक हक्काने आमदारांकडे पैसे मागायला येतात. काहीजण औषधाची बिले घेऊन येतात. काहीजण वीज व पाण्याचीही बिले आणतात. बायकोला ऍडमिट केलीय, आई सिरीयस आहे, बहिणीचं ऑपरेशन आहे, भावाला ऍक्सीडेन्ट झालाय- जरा मदत करा, ही विनवणी तर रोजचीच झाली आहे. काही वेळा मुलाच्या बारशासाठीही लोक पैसे मागतात.
आमदारांकडे आर्थिक मदत मागायला येणारे सर्वच लोक ‘शुद्ध हेतू’ने येतात असे नाही. काहीजण टोपी घालायलाच येतात. पण काही लोकांची अडचण खरोखर गंभीर स्वरूपाची असते. मागे मतदारसंघातली एक बाई आली. पाच वर्षांपूर्वी तिचा दारुडा नवरा वारला. घरात कर्ता-सवरता कोणी नाही. दोन मुलगे- पण वयाने तसे लहानच. त्यामुळं या बाईनं धुणी-भांडी करून, घरोघर काम करून मुलांना वाढवलं, शिक्षण दिलं. थोरल्या मुलाला यावर्षी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. पण आईची फी भरायची ऐपत नाही. शेवटी अस्मादिकांनी त्या मुलाची फी भरून टाकली तेव्हा बिचारीला जरा दिलासा मिळाला.
हल्ली आमदारांच्या खिशाला भुर्दंड पाडणारा आणखी एक ‘फंडा’ निर्माण झाला आहे. भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठी सध्या जिकडे तिकडे झुंबड उडाली आहे. अशावेळी पैसे कमी पडले की लोकांना आमदार आठवतो. परदेशी जाणार्‍या या माणसाचं एक मत कमी होणार हे ठाऊक असतानाही या लोकांना खूश ठेवावं लागतं कारण तो इंग्लंडला गेला तरीही घरची चार मते मतदारसंघात असतात!
५. पाणी, वीज, रस्ते इ. सुविधांबाबतच्या तक्रारी या सार्वत्रिक असतात. त्या त्या खात्याच्या अधिकार्‍यांकडे जाऊन या समस्या सोडवणे तसे कठीण नाही. पण आमदाराकडे जाऊन त्याच्या कानावर ही गोष्ट घातल्याखेरीज लोकांचे समाधान होत नाही. दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ वीजप्रवाह खंडित झाला तर आमदाराचा फोन खणखणू लागतो. एक दिवस नळाला पाणी आलं नाही की कैफियत त्याच्या दरबारात पोचते. रस्त्याचं काम तर आमदारानं हिरवा सिग्नल दिल्याशिवाय सुरूच होऊ शकत नाही.
६. सरकार लोकांसाठी कल्याणकारी योजना आखतं. सामाजिक सुरक्षा योजना, गृहआधार, लाडली लक्ष्मी, आदिवासी कल्याण, ओबीसी साहाय्यता अशा अनेकविध योजना सरकारमार्फत राबवल्या जातात. त्या लोकांपर्यंत नेण्याचे कामही आमदाराला करावे लागते. वास्तविक या योजना घरोघर पोचवण्याचे काम संबंधित खात्यांचे असते, पण फॉर्म वाटण्यापासून ते फॉर्मवर सही करण्यापर्यंतची सर्व कामे आमदारांना करावी लागतात. त्यासाठी स्वतंत्र स्टाफ ठेवावा लागतो. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना वित्त सहायता (फायनांशियल सपोर्ट) द्यावी लागते. त्याचप्रमाणे प्रोव्हेदोरीया, मुख्यमंत्री मदत निधी याद्वारे गरजूंना आर्थिक मदत करावी लागते.
७. आपल्या आमदारांकडून लोकांची फार मोठी अपेक्षा असते की आपल्या घरी होणार्‍या प्रत्येक कार्य-समारंभाला आमदाराची उपस्थिती असलीच पाहिजे. मग ते लग्न असो, मुंज असो, बारसं असो, वाढदिवस असो किंवा विवाहाचा वर्धापनदिन असो- आमदार हवाच! ख्रिश्‍चन मतदारांच्या बाबतीतही काजार, बर्थ डे, ऍनिव्हर्सरी, ज्युबिली सेलिब्रेशन, बाप्तिस्मा, कम्युनियम, फेस्त वगैरे सणांना आमदार उपस्थित राहतात. सुखाच्या क्षणात आमदारानं सहभागी व्हायला हवं तसंच दुःखाच्या प्रसंगातही आधार द्यायला धावून जायला हवं. मतदारसंघात कोणाचाही मृत्यू झाला तरी आमदाराला तिथं उपस्थिती लावावी लागते. एका अर्थी हे त्याचे सामाजिक कर्तव्य असते.
८. गोवा मेडिकल कॉलेज किंवा कोणत्याही सरकारी इस्पितळात आपल्या घरच्या माणसांना किंवा नातेवाइकांना ऍडमिट केल्यानंतरही लोक आमदारांची मदत मागायला येतात. तुम्ही अमुक डॉक्टरना फोन केला तर बरं होईल, अमुक वॉर्डमध्ये बेडच नाही, आमच्या माणसाला जमिनीवर झोपवलंय, साहेब सगळी औषधं बाहेरून विकत आणायला लावतात- जरा त्यांना सांगा, चार दिवस झाले ऍडमिट करून- पेशंटची कोणीच वासपूस करीत नाही, पेशंट बरा झाला नाही तरी डिस्चार्ज देतायत… जरा फोन करून दोन दिवस जास्ती ठेवायला सांगा ना… अशा विनंत्या करणारे फोन आमदारांना सतत येत असतात. या फोनची, अर्ज-विनंत्यांची दखल आमदारांना घ्यावीच लागते. तशीच वेळ आली तर हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती लावून रुग्णाच्या घरच्यांना, नातेवाइकांना धीर द्यावा लागतो.
आपल्या मतदारसंघातील आमदाराबद्दल लोकांना असलेल्या अपेक्षांचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. ती म्हणजे, यातल्या बहुतेक अपेक्षा ज्या व्यक्तिसापेक्ष आहेत. माझी बदली, माझी बढती, माझं कार्य, माझी अडचण असे व्यक्तीभोवती केंद्रित झालेले हे विषय आहेत. आणि समाजाला या विषयांच्या सोडवणुकीतच अधिक रस आहे. क्वचित प्रसंगी यात स्वार्थाचाही भाग आहे. सांत आंद्रे मतदारसंघातून निवडून आल्यानंतर स्वतःला पक्षाचा बुजुर्ग कार्यकर्ता म्हणवणार्‍या एका महाभागाच्या घरी चहापानाला गेलो. चहा दिल्यानंतर त्याची बायको म्हणाली, ‘‘बरे झाले बाबा, तुमी आमदार जाले. आता पयली आमच्या बाबूचे शिर्विसाचे काम करपाचें आनी कोण्णाचे करीना जाल्यार जाता…’’
मतदार हेसुद्धा शेवटी माणूसच आणि स्वार्थ हा तर माणसाचा स्थायिभाव. साहजिकच आमदारांकडून अपेक्षा बाळगताना माणूस स्वार्थपरायण होतो. तोे ‘मी’च्या पलीकडे जाऊ इच्छित नाही. याउलट आमदाराची परिस्थिती असते. निवडून येण्यापूर्वी तो स्वतःचा, स्वतःपुरता असतो. पण एकदा निवडून आला की आमदार सर्वांचा बनतो. मते दिलेल्या माणसांचा आणि मते न दिलेल्या माणसांचाही. शेवटी मतदारसंघातल्या प्रत्येकाचा तो विधानसभेतील प्रतिनिधी आहे याच निःस्पृह भावनेने आमदाराने काम करायचे असते. पण भोवतालची परिस्थिती त्याला असे काम करू देते का? निवडणुकीत ज्याने आपणाविरुद्ध प्रचार केला तोच माणूस एखादे काम घेऊन आला तर त्याला मदत करण्याचे औदार्य आजचे आमदार दाखवू शकतील का? समजा त्याने ते धाडस केले तर त्याचे कार्यकर्ते या कृतीला समर्थन देतील का? त्याच्या पक्षातले वरिष्ठ लोक मनाचा हा मोठेपणा खपवून घेतील का? मला तरी शंका वाटते. कारण गोव्याच्या राजकारणात कोत्या मनोवृत्तीचे लोक अधिक प्रमाणात आहेत. कोलवाळ येथे विरोधी पक्षाच्या नेत्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजर राहिलो म्हणून माझ्याच पक्षातील एका नेत्याने काही कार्यकर्त्यांना चिथवून माझ्यावर हल्ला करायला लावला. हे अनुदार वृत्तीचे उदाहरण आहे. याउलट अनेक वेळा माझ्या मतदारसंघात मी आणि माझे प्रतिस्पर्धी माजी उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा कार्यक्रमांसाठी एका मंचावर खांद्याला खांदा लावून बसतो. मला त्यात काहीही गैर वाटत नाही. पण स्वतःला पक्षाचे नेते, कार्यकर्ते म्हणवणारे जे कट्टर लोक असतात त्यांना हे चित्र बघवत नाही. लोकशाही सर्वसमावेशक असते. सत्ताधारी व विरोधक दोघांनाही कवेत घेऊन तिने मार्गक्रमणा करायची असते. पण लोकशाहीचा मूळ अर्थच ज्यांना समजून घेता आला नाही त्यांच्याकडून अपेक्षा कोणती बाळगणार? म्हणून सुरुवातीलाच म्हटले- ‘जावे आमदाराच्या वंशा, तेव्हा कळे!’