विधानसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधकांनी एकत्र यावे

0
160

राज्य विधानसभेची निवडणूक दीड वर्षावर येऊन ठेपल्याच्या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच निवडणुकीसाठीचे डावपेच आखण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. काल त्यासंबंधी बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, २०२२ साठीच्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे. तसेच ते येऊ शकतात. शुक्रवारी एका केबल वाहिनीसाठीच्या मुलाखतीतून बोलताना त्यांनी वरील शक्यता व्यक्त केली.

यावेळी बोलताना त्यांनी, येणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी सर्व शक्तींनी एकत्र यायला हवे, असे मत व्यक्त केले. मात्र, त्याचबरोबर हे आपले वैयक्तिक मत असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. आपले हे मत आपण निवडणुकीपूर्वी पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कॉंग्रेस नेत्यांनी २०२२ साली होणार असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. हे महागठबंधन असेल का, असे विचारले असता महागठबंधन असे नाही. विविध पक्षांमध्ये युती जागांचे वाटप असा समझोता असू शकतो, असे स्पष्टीकरण कामत यांनी दिले. या आघाडीसाठी कॉंग्रेसला मगो, गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांचा विचार करणे शक्य असल्याचे कामत म्हणाले.

कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना त्यांची जागा मतदार पुढील निवडणुकीत दाखवून देणार असल्याचेही कामत म्हणाले.