विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनांवर भर द्यावा ः नोबेल विजेत

0
120

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पना, विचारांचे प्रगटीकरणावर भर द्यावा, दुसर्‍याचे अनुकरण करू नये, असा सल्ला नोबेल विजेत्यांनी विद्यार्थ्यांना काल दिला. नोबेल मीडिया एबी स्वीडन, केंद्र सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान खाते आणि गोवा सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याने कला अकादमीच्या आवारात आयोजित नोबेल पारितोषिक भारत २०१८ च्या निमित्ताने नोबेल विजेत्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पहिल्या सत्रात नोबेल मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मतायश फायरकेनियस यांनी नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड जे. रॉबट्‌र्स आणि क्रिस्तियन न्यूसेलिन व्होलार्ड यांच्याशी संवाद साधला. यात नोबेल फाऊंडेशनचे चेअरमन प्रा. कार्ल हॅरिस यांनीही सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव बालपणापासून जागृत करण्याची गरज आहे. विद्यार्थ्याना संशोधनाकडे आकर्षिक करण्यासाठी मजबूत शिक्षण प्रणालीवर भर दिला पाहिजे. तसेच शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्मिती केली पाहिजे. शिक्षणासाठी दुसर्‍याकडे लक्ष देऊ नका, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रणालीतून शिकले पाहिजे. भारतात संशोधनासाठी पोषक वातावरण आहे. भारत जगातील सर्वोत्तम विद्यापीठाचे केंद्र आहे. संशोधनासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. फक्त संशोधनाची रूची असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. मुलांनी आत्मविश्‍वास अंगी बाणण्याची गरज आहे. आत्मविश्‍वासाच्या जोरावर नवनवीन कल्पना सुचतात. तसेच वाचन, मुलभूत माहिती मिळविली पाहिजे. मूळात विज्ञान शिक्षणाची आवड असली पाहिजे. या गोष्टीतूनच यश मिळू शकते, असे क्रिस्तियन व्होलार्ड यांनी सांगितले. भारतातील संसाधनाचा विज्ञान जाणीव वाढविण्यासाठी सर्वोत्तम वापर करण्याची गरज आहे. जीवनात यश मिळविण्यासाठी कष्ट, मेहनत घ्यावी लागते. थोडासा त्यागसुध्दा करावा लागतो, असे प्रा. रॉबट्‌र्स यांनी सांगितले. दुसर्‍या सत्रात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव डॉ. के. विजयराघवन यांनी नोबेल विजेते टॉमस लिंडाहल आणि सर्गे हारोज यांच्याशी संवाद साधला. संशोधनाला चालना देण्यासाठी शिक्षण प्रणाली आणि नवकल्पना यांच्यावर भर देण्याची गरज आहे, असे सर्गे हारोज यांनी सांगितले.

शिक्षकंानी मुलांच्या कल्पना आणि मनाच्या विकासावर भर दिला पाहिजे. शिक्षक मुलांच्या सर्जनशिलतेला चालना देऊ शकतो. शिक्षकांमध्ये संवाद साधण्याची महत्वपूर्ण ताकद आहे. संशोधक नागरिकांशी योग्य प्रकारे संवाद साधू शकत नाही. त्यामुळे संशोधन लोकापर्यत नेण्यास अडचणी येतात, असे प्रा. रिचर्ड यांनी सांगितले.

शिक्षकांशी संवाद
संध्याकाळच्या सत्रात नोबेल विजेत्यांनी राज्यातील शिक्षकांशी संवाद साधला. मुलांच्या सर्वांगिण विकासात शिक्षकाचे स्थान महत्वाचे आहे. मुलाच्या अंगातील सुप्त गूण ओळखून योग्य मार्गदर्शन करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे, असे नोबेल विजेत्या व्होलार्ड यांनी सांगितले. आजच्या काळात ज्ञान मिळविण्यासाठी विविध पर्याय खुले आहेत. या पर्यायांचा योग्य वापर करून मुलांची जडणघडण केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. शिक्षणासाठी मुक्त वातावरण असलेल्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तसेच संस्थेतून अंगातील गुणांच्या विकासाची संधी मिळाली, असे प्रा. सर्गे हारोज यांनी सांगितले.

नोबेल प्रदर्शनासाठी
तालुकास्तरीय वेळापत्रक
शिक्षण खात्याने कला अकादमीच्या आवारात १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या नोबेल प्रदर्शनाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका पातळीवर वेळापत्रक तयार केले आहे.
यासंबंधीचे परिपत्रक शिक्षण खात्याने जारी केले आहे. सरकारी आणि सरकारी अनुदान प्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्यवस्थापनांनी जास्तीत जास्त मुलांना या प्रदर्शनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. मुलांच्या वाहतुकीसाठी बालरथ उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या ठिकाणी एकाचवेळी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. हे नोबेल प्रदर्शन २८ फेब्रुवारीपर्यत खुले ठेवण्यात येणार आहे. ५ रोजी पणजी शहर आणि कुजिरा बांबोळी येथील विद्यालये, ६ रोजी तिसवाडी तालुक्यातील इतर विद्यालये, ७ रोजी म्हापसा शहरातील विद्यालये, ८ रोजी बार्देश तालुक्यातील शिल्लक विद्यालये, ९ रोजी मडगाव शहरातील विद्यालये, १० रोजी सालसेत तालुक्यातील शिल्लक विद्यालये, १२ रोजी काणकोण तालुक्यातील विद्यालये, १४ रोजी केपे तालुक्यातील विद्यालये, १५ रोजी पेडणे तालुक्यातील विद्यालये, १६ रोजी सत्तरी तालुक्यातील विद्यालये, १७ रोजी धारबांदोडा तालुक्यातील विद्यालये, १९ रोजी डिचोली तालुक्यातील विद्यालये, २० रोजी फोंडा तालुक्यातील विद्यालये, २१ रोजी मुरगाव तालुक्यातील विद्यालये, २२ रोजी सांगे तालुक्यातील विद्यालयांना प्रदर्शन पाहण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.