विद्यार्थ्यांना आधारकार्डद्वारे जोडण्याचे काम पूर्णत्वाकडे

0
110

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आधार कार्डाद्वारे जोडण्याचे काम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी काल सांगितले. सध्या ९६ टक्केे विद्यार्थ्यांना यापूर्वीच आधार कार्डाद्वारे जोडण्यात आलेले असून केवळ ४ टक्के विद्यार्थ्यांना जोडण्याचे काम शिल्लक राहिले असल्याचे भट यांनी सांगितले. सांगे व काणकोण तालुक्यातील १०० टक्के विद्यार्थ्यांना आधारद्वारे जोडण्यात आलेले आहे. तर सासष्टी, बार्देश, फोंडा आदी तालुक्यांतील काही विद्यार्थ्यांना जोडण्याचे काम शिल्लक राहिले आहे. काही विद्यालयांतील १० ते १५ एवढ्या विद्यार्थ्यांना आधारद्वारे जोडणे शिल्लक राहिले आहे. ते काम पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे भट यांनी स्पष्ट केले.

गोवा सरकारच्या नियोजन आणि सांख्यिकी ह्या खात्यातर्फे हे काम करण्यात येते. खात्याने हे काम पूर्ण करण्याचे कंत्राट एका कंपनीला दिलेले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात केंद्रे उघडण्यात आलेली आहेत. शिल्लक राहिलेले काम पूर्ण व्हावे यासाठी शिक्षण खात्याने नियोजन आणि सांख्यिकी खात्याकडे त्यासाठीच्या ‘किट्‌स’ची मागणी केली होती. ही ‘किट्‌स’ मिळाली असती तर खाते स्वत:च हे काम पूर्ण करणार होते. पण ती किट्‌स खात्याला अद्याप देण्यात आली नसल्याचे भट यांनी स्पष्ट केले.