विदेशी झटका

0
157
  •  बबिता बाबलो गावस

‘‘आज मलाच माझी लाज वाटते. परदेशात कमावणार्‍या मुलाचं कौतुक करत फिरलो आणि सोन्यापेक्षा मौल्यवान पोरीला कवडीमोल ठरवलं. पण आज तू माझे डोळे उघडलेस. परदेशात फक्त पैसा आहे, पण खरी माणुसकीची श्रीमंती आपल्या देशात आहे, आपल्या संस्कारात आहे…’’

अवनी माहेराहून आल्यापासून उदास वाटत होती. ती उदास झालेली आस्तादला आवडत नव्हतं. एरवी तिचा चिवचिवाट कानाचे पडदे फाडून टाकणारा असायचा. पण आज अणु तिने तोंडाला कुलूपच लावलंय. एकदम चिडीचूप झालीय. अवनीची सासू मीराबाय हळूच आस्तादजवळ आल्या आणि म्हणाल्या, ‘‘अरे आस्तू, आज तुझ्या बायकोने मौनव्रत केलंय की काय? एकदम शांतता भरलीय घरात म्हणून म्हटलं. जरा आस्तादला कोपरखळी मारीत तिने इशाराच केला. ‘‘तशी मलाही काही या मौन व्रताची फारशी माहिती नाही, कदाचित असेलही व्रत…’’ असे म्हणत आस्ताद अवनीजवळ गेला.
‘‘मारा हा टोमणे, आज संधी मिळालीय ना तुम्हाला…’’ म्हणत ती आतल्या खोलीत गेली. आस्तादही तिच्या पाठीमागे धावत खोलीत गेला. आत ती कॉटवर बसून रडत होती. ‘‘अगं अशी रडतेस का?’’ आस्तादने तिला जवळ घेत विचारलं.
‘‘काही नाही रे, आज बाबा मला खूप काही बोलले. मला ते अजिबात आवडलं नाही. आता मी जाणारच नाही त्यांची विचारपूस करायला..’’म्हणत ती अजून आस्तादला बिलगली. तिला थोपटत आस्ताद म्हणाला, ‘‘जाऊ दे गं! त्यांना वाटतं आपण कुणीतरी आळशी, अडाणी माणसं आहोत.’’
‘‘मी नाही दादाएवढी शिकू शकले, मला झेपलं तेवढं मी केलं ना? दादा खूप शिकला, मोठा झाला. स्वतःच्या ज्ञानावर लंडनला पोहचला. आज तिथे त्याचं घर आहे, त्यानं आपलं साम्राज्य तयार केलंय. मोठ्या पगाराची नोकरी करतो. सगळं आहे त्याच्याजवळ. म्हणून मी हात पसरले का त्याच्यापुढे, मी जेवढं कमावते तेवढ्यात मी खुश आहे ना. मला नाही पैशाचा मोह. आहे त्यात समाधानी राहणारी बाई आहे मी. तरीसुद्धा हे बाबा मला का ओरडतात तेच मला कळत नाही…’’ म्हणत तिला आणखी रडू आलं. आस्तादने तिचे डोळे पुसले व म्हणाला, ‘‘हे बघ अवनी ते तुझे वडील आहेत. म्हणून त्यांना वाटतं तूही त्यांच्या मुलाप्रमाणे थाटात रहावंस. पैसा-अडका तुझ्याजवळही भरपूर असावा. तुझ्या घरीही नोकर-चाकर असावेत, कसली म्हणून कमतरता तुला असता कामा नये.. हा त्यांचा हेतू असावा.’’

‘‘नाही आस्ताद, त्यांचा हेतू फक्त मला कमी लेखण्याचा असतो. मी कशी फाटकी आहे, अभ्यासात मठ्ठ आहे हे त्यांना वारंवार पटवून द्यायचं असतं. त्यात तुझ्याशी मी प्रेमविवाह केला, त्यांना नाईलाजास्तव करून द्यावं लागलं.. हे त्यांना वारंवार मला पटवून द्यायचं असतं. त्यांना आपणच बरोबर कसं हे माझ्यावरून सिद्ध करायचं असतं म्हणून मला नेहमी टोचून बोलत असतात’’, रागाने अवनी ताडताड बोलत होती.
सकाळची वेळ म्हणजे धावपळीची. अवनी आपल्या दोन्ही मुलांच्या टिफीनच्या तयारीला लागली होती आणि घरातील फोन एकसारखा ट्रिंग ट्रिंग करून हाका मारत होता. कुणीतरी या आणि मला कानाला लावा असेच जणु सांगत होता. अवनी आस्तादला ‘जरा फोन उचला’ म्हणून सांगत होती, पण तो तर अंथरुणातून उठायलाच तयार नव्हता. सासुबाई देवपूजेत रमल्या होत्या. दोन्ही मुलं आपापली तयारी करण्यात दंग होती. फोन वाजून वाजून थकला आणि गप्पच बसला. मुलं शाळेत गेली. आस्तादही उठून ऑफिसची तयारी करत होता. अवनी तयार होऊन चहा, नाश्ता टेबलवर ठेवत होती. एवढ्यात पुन्हा फोन खणखणला. आता अवनीजवळ फोन उचलण्याशिवाय पर्याय नव्हता. ‘‘हॅलो…’’ म्हणत तिने फोन उचलला, ‘‘कोण, दादा? कसा आहेस? आज आठवली वाटतं बहीण…’’ म्हणत टचकन् तिच्या डोळ्यात पाणी आलं. तो पलीकडून काही सांगत होता आणि ही हूं हूं म्हणत मान डोलवत होती. मग एकमेकांना निरोप देत फोन बंद झाला.
‘‘काय गं अवनी, चक्क तुझ्या भाऊरायाने फोन केला तुला, आश्‍चर्य आहे’’, आस्तादचा टोला. ‘‘होय रे. आज दादाला आपल्या बहिणीची आठवण झाली खरी, ती उगाचच नाही. कारणही तसं खास आहे’’, अवनी कोड्यात बोलली. ‘‘म्हणजे? त्याने तिकडे काही भानगडवगैरे केली नाही ना?’’ आस्तादचा प्रश्‍न ऐकून अवनी दचकली. ‘‘नाही नाही, तशी भानगड नाही. पण बाबांना मात्र ही शॉकिंग न्यूज आहे, हे मात्र खरं!’’ ‘‘म्हणजे? मी नाही समजलो. नीट सांगशील का काही…’’ आस्ताद चिडून बोलला. ‘‘नाहीतर काय, बापासारखी लेक म्हणतात तेच खरं, पटकन् सांगेल तर शपथ.’’ सासुबाई चिडल्या.
‘‘माझा बाप काढायची काही गरज नाही. सांगते ऐका. दादाने लंडनला गोर्‍या पोरीशी लग्न केलंय आणि हे त्याला बाबांना सांगायला भीति वाटते म्हणून मला फोन केला. बाबांना सांगून त्यांची समजूत काढायला म्हणाला’’. अवनी एकदम सांगून मोकळी झाली.

‘‘काऽऽय?….’’ आस्ताद आणि मीराबाय आऽऽ वासून बघतच राहिल्या.
अवनीने सांगायच्या आधीच दादाच्या लग्नाची बातमी तिच्या बाबांना समजली होती आणि तसं होऊ शकतं यावर त्याने शिक्कामोर्तब केलं. असा आपल्या एकट्याचाच मुलगा नाही परदेशातील मुलीशी लग्न करणारा… असं अनेक मुलांनी केलंय… म्हणत त्यांनी लग्नाला दुजोरा दिला, हे ऐकून अवनीच शॉक झाली. पुढे मग दादा भारतात एकदाच बायकोला घेऊन आला, सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या, महिनाभर राहिला आणि त्यानंतर पुन्हा फिरकला नाही. एकवेळ आईबाबांना लंडनची वारी करायला लावली. लंडनहून आल्यावर बाबा मुलाचं आणि सुनेचं कौतुक करताना थकत नव्हते. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचं, सुविधांचं कोण कौतुक व्हायचं पण मुलीच्या मुलांचं कौतुक करताना मात्र शब्द संपतील की काय असंच वाटायचं. त्यामुळे मुलांनाही आजोबाचा लळा फारसा नव्हता. पण आजीसाठी नातवंड मामाच्या घरी जायचे, जणु आजी त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकायची.

आता वाढत्या वयामुळे ते थकत चालले होते. आता मात्र मनोमन ते मुलाला घरी परत ये, म्हणून हट्ट धरायचे. आता आम्ही थकलोय रे, तुझ्या आईच्याने आता घर सांभाळले जात नाही. तू आपला परत ये भारतात, आपल्या घरी. येथेच लहानसा उद्योगधंदा कर, नाहीतर नोकरी कर. आता आम्हाला तुझी गरज आहे…. पण दादा थोडाच ऐकणारा, तो उलट त्यांनाच लंडनला या म्हणून सांगायचा. आपल्या मुलांना भारतात चालणार नाही, लंडनचं क्लायमेट कसं स्वच्छ असतं आणि भारतातलं अस्वच्छ, हेच जणु तो पटवून द्यायचा. कधी कधी तर तो- अवनीकडे जाऊन रहा तुम्ही… असंही अप्रत्यक्षपणे सुचवायचा, तेव्हा मात्र बाबा भडकायचे आणि म्हणायचे, ‘‘मुलगा असताना जावयाच्या घरी लोळणं आमच्या संस्कारात बसत नाही’’, आणि चिडून फोन ठेवून देत.
हल्ली दादाही बाबांना फोन करत नसे. फावल्या वेळात अवनीकडे फोन करून विचारपूस करायचा. बाबा-आईला सांभाळ. खर्च मी पाठवीन… असंही एकदा बोलला तेव्हा अवनीचा पारा चढला. ते माझेही आई-बाबा आहेत आणि त्यांचा सांभाळ करायला मला तुझ्या पैशांची गरज नाही, हे लक्षात ठेव… म्हणत फोन ठेवला. तेव्हापासून दादा अवनीलाही फोन करेनासा झाला. आता दोन्ही घरची जबाबदारी अवनीवर येऊन पडली. सासर-आणि माहेर अशा दोन्ही काठांवर ती कसरत करत होती. वडलांची तब्येत हल्ली चांगली नसायची. त्यांना चालायलासुद्धा आधार लागायचा. सकाळी आस्ताद जाऊन त्यांची ऊठ-बस करायचा आणि पुन्हा संध्याकाळी त्यांचं औषधपाणी करूनच घरी यायचा.

बाबांनाही आता खूप लाजिरवाणं वाटायचं… आपण आपल्या लेकीला, जावयाला नेहमी पाण्यात बघत आलो, त्यांच्याशी नीट वागलो नाही की नीट बोललो नाही, मुलाचा तोरा, त्याच्या श्रीमंतीचा थाट यापुढे ही दोघं मला कवडीमोल वाटायची. सोन्यासारखी नातवंडं आहेत, त्यांना कधीच प्रेमाने जवळ केलं नाही की त्यांना हक्काने खेळणं दिलं नाही आणि आज मुलापेक्षा आपली जबाबदारी समजून आस्ताद माझं किती करतोय… म्हणत मनातल्या मनात त्यांना रडायला येऊ लागलं.
अवनी आणि आस्तादने मिळून एक निर्णय घेतला होता, तो आज त्यांना बाबांना सांगायचा होता म्हणून ते दोघेही आज सुट्टी काढून बाबांकडे गेले. ‘‘आई-बाबा आम्हाला वाटतं की तुम्ही आता आमच्या घरीच राहायला यायला पाहिजे’’, गंभीर आवाजात आस्ताद बोलला. ‘‘नाही बाळा, आमच्यासाठी तू खूप करतो आहेस, याचीच आम्हाला लाज वाटते आहे’’, आई संथपणे बोलली. ‘‘आई, मला बाळा म्हणतेस आणि लाज वाटते… हे काय? मी तुम्हाला माझ्या आईबाबांप्रमाणेच मानतो म्हणून सांगतो. तुम्हा दोघांना रोज रोज एकटं सोडून आम्ही घरी जातो खरं, पण रात्र रात्र आम्हाला झोप येत नाही. फक्त तुमचाच विचार येत असतो. त्यापेक्षा तुम्ही दोघंही आमच्या घरी आमच्या डोळ्यासमोर असाल तर आम्हीही निश्‍चिंत होऊ आणि मुलांबरोबर तुमचा वेळही छान जाईल. म्हणून सांगतो, ऐका माझं’’, आस्ताद हात जोडून म्हणाला. ‘‘बाबा, तुम्ही प्लीज, मी मुलगी म्हणून नका परकं करू. जावई तुमचा मुलगा बनून सांभाळेल तुम्हाला याची खात्री देते. चला आमच्याबरोबर आपल्या घरी…’’ म्हणत आवनी बाबांच्या पायाजवळ बसली. बाबांनाही अश्रू आवरत नव्हते. ‘‘अवनी ऊठ, तुझी जागा पायाजवळ नाही, काळजात आहे. बापाचे हाल होताहेत हे तुला आणि माझ्या जावयाला बघवत नाही, म्हणूनच तुम्ही आम्हा दोघा म्हातार्‍यांना आपल्या घरी न्यायला आलात ना, किती तुच्छ लेखत होतो मी तुम्हाला! पैशांचा आणि विदेशी मालाचा गर्व झाला होता मला… ’’ म्हणत रडत होते बाबा. ‘‘असं रडू नका बाबा, आम्ही विसरलो आहोत आणि दादालासुद्धा काही बोलू नका. आम्ही आहोत ना तुमची काळजी घ्यायला, मग झालं!’’ म्हणत अवनीने बाबांचे डोळे पुसले.

‘‘होय गं माझ्या बाळा, तुला मी परदेशात पाठवायला बघत होतो, तू गेली नाहीस म्हणून बरं झालं. नाहीतर आम्ही बेवारशी झालो असतो. तू खरंच शहाणी निघालीस. पैशाच्या पाठी लागली नाहीस. आज मलाच माझी लाज वाटते. परदेशात कमावणार्‍या मुलाचं कौतुक करत फिरलो आणि सोन्यापेक्षा मौल्यवान पोरीला कवडीमोल ठरवलं. पण आज तू माझे डोळे उघडलेस. परदेशात फक्त पैसा आहे, पण खरी माणुसकीची श्रीमंती आपल्या देशात आहे, आपल्या संस्कारात आहे…’’ म्हणत अवनीच्या डोक्यावरून हात फिरवला.

‘‘मग येताय ना आपल्या घरी हक्काच्या नातवंडांबरोबर रहायला?…’’ आस्तादने विनोदात्मक टोला मारला. ‘‘हो, हो जावयबापू. आता तुमच्याशिवाय कोणी नाही. तूच मुलगा नि तूच जावई..’’ म्हणत सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले!!