विठ्ठलवाडी- अन्साभाट येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात साजरे होणारे उत्सव

0
115

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानात चैत्र महिन्यापासून उत्सवांना प्रारंभ होतो. संपूर्ण वर्षभर हे उत्सव देवस्थानात मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने आणि धार्मिक प्रथेनुसार प्रतिवर्षी साजरे केले जातात.

श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानात चैत्र महिन्यापासून उत्सवांना प्रारंभ होतो. संपूर्ण वर्षभर हे उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, गुरुपौर्णिमा, श्रावणी बुधवार, नवरात्रौत्सव, काकड आरती उत्सव, तुकाराम बीज, दत्तजयंती, कोजागिरी पौर्णिमा आदी अनेक उत्सव देवस्थानात मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने आणि धार्मिक प्रथेनुसार प्रतिवर्षी साजरे केले जातात.
गुढी पाडव्याला सकाळी महापूजा, महाआरती, मंदिरावर गुढी उभारणे, पंचांग-वाचन व रात्री महाआरती व तीर्थप्रसाद असा कार्यक्रम असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सार्वजनिक सत्यनारायण पूजा, सकाळी देवस्थानतर्फे स्वहस्ते ‘श्रीं’च्या मूर्तीवर अभिषेक, संध्याकाळी भजन व आरत्या होऊन उत्सवाची सांगता होते. ‘आषाढपौर्णिमा’ किंवा ‘गुरुपौर्णिमे’ला सकाळी अभिषेकादी धार्मिक कार्ये, संध्याकाळी भजन व नंतर ‘श्रीकृष्णाने मुरली वाजवली…’ या गजरात दहीहंडी फोडल्यावर फळारी यांच्या घराजवळील विहिरीवर जाऊन स्नान करून भक्तमंडळी पुन्हा मंदिरात आल्यावर महाआरती व तीर्थप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होते.
आश्‍विन महिन्यातील नवरात्रौत्सवात घटस्थापनेच्या दिवशी कै. महाबळेश्‍वर रघुनाथ मणेरकर यांच्या वतीने त्यांचे जामात श्री. अवधूत नार्वेकर यांच्याकडून लघुरुद्र, महापूजा केली जाते. त्यानंतर नवमीपर्यंत रोज रात्रौ पुराणवाचन व नंतर महाराष्ट्रातील व गोव्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होतात. नंतर महाआरती होऊन तीर्थप्रसाद दिला जातो. कै. महाबळेश्‍वर रघुनाथ मणेरकर यांनी ठेवलेल्या कायम निधीतून हा नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. दसर्‍याच्या दिवशी सकाळी देवस्थानात धार्मिक कार्ये पार पडल्यावर रात्री श्री महारुद्र देवस्थानची नगरप्रदक्षिणेस निघालेली श्री मारुतीरायाची लालखी श्री विठ्ठल-रखुमाईच्या भेटीस मंदिरात येते. यावेळी महाआरतीने संस्थानातर्फे श्री मारुतीरायाच्या लालखीचे स्वागत केले जाते. दसर्‍यानंतर येणार्‍या कोजागिरी पौर्णिमेला सकाळच्या देवकार्यानंतर रात्रौ देवस्थानच्या पुजार्‍याकडून मंदिराच्या महाद्वारावर चंद्रदेवाची पूजा केली जाते. ‘श्रीं’ना दुधाचा नैवेद्य अर्पण केल्यावर महाआरती होऊन भाविकांना दुधाचा प्रसाद दिला जातो. श्री. भानुदास आत्माराम डांगी व बंधू यांनी ठेवलेल्या कायम निधीतूून हा उत्सव साजरा होत असतो. आश्‍विन महिन्याच्या कृष्णपक्ष १४ म्हणजे नरकचतुर्दशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत देवस्थानात रोज सकाळी ५.३० वाजता काकड आरती होतात. या काकड आरती उत्सवात रोज ‘श्री’स लोणी, दही, तूप, दूध, मध. साखर यांचा अभिषेक केला जातो. गाभार्‍यात पूजाकार्य सुरू असताना मंदिराच्या सभामंडपात काकड आरत्या म्हटल्या जातात व त्यानंतर महाआरती होऊन उपस्थित भाविकांना तीर्थप्रसाद दिला जातो. या काकड आरती उत्सवातील पहिला दिवस कै. नारायण सोमा वेंगुर्लेकर यांनी ठेवलेल्या कायम निधीतून साजरा होतो, तर राहिलेल्या इतर दिवसांतील उत्सव इच्छुकांनी दिलेल्या नावाच्या चिठ्‌ठ्या काढून साजरा केला जातो. या उत्सवाचे यजमानपद आपणास मिळावे म्हणून असंख्य इच्छुक भाविक आपलं नाव चिठ्ठीसाठी देवस्थान समितीकडे देत असतात. कार्तिक दशमीच्या दिवशी सकाळी काकड आरती व नंतर संस्थानतर्फे सार्वजनिक लघुरुद्र व रात्रौ ‘श्रीं’स सांगणे सांगून सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर कार्तिक एकादशीपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते.
कार्तिकी एकादशी उत्सव
कार्तिकी एकादशी उत्सवाच्या दिवशी सकाळी काकड आरतीचा कार्यक्रम संपल्यावर कै. महाबळेश्‍वर रघुनाथ मणेरकर यांच्यातर्फे त्यांचे जावई श्री. अवधूत नार्वेकर यांच्यातर्फे ‘श्रीं’स सार्वजनिक सांगणे घालून झाल्यावर आरती होते व श्री विठ्ठल-रखुमाईची लालखी वार्षिक वहिवाटीनुसार वाद्यवृंदांच्या साथीत नगरप्रदक्षिणेस निघते. नगरप्रदक्षिणेनंतर रात्री लालखी मंदिरात आल्यावर फळा-फुलांची ‘पावणी’ होते व त्यानंतर महाआरती होऊन उत्सवाची सांगता होते.
हल्ली या उत्सवाप्रीत्यर्थ विठ्ठलवाडी युथ असोसिएशन या युवकांच्या सांस्कृतिक संघटनेकडून भव्य रांगोळी स्पर्धा, ‘नवरो सजावट’ स्पर्धा व आकाशकंदील स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. या दिवशी ज्या वहिवाटीच्या मार्गावरून लालखी प्रदक्षिणेस निघते त्या वाटेवर जे वाडे येतात त्या वाड्यांवरील नागरिक श्री देवी रखुमाईची खणा-नारळाने ओटी भरतात आणि ‘श्रीं’स नारळ-फळांचा नैवेद्य देतात व आरती ओवाळतात. इ.स. २००२ साली श्री. गजानन विष्णुदास डांगी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीने अंदाजे तीन लाख रुपये खर्चून नवीन लालखी व रथ करून घेतला आहे.
पुनर्प्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन
‘श्री’च्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या वर्धापनदिनानिमित्त माघ शु. चतुर्दशी व माघ पौर्णिमा या दोन दिवसांत गेली वीस वर्षे श्री विष्णुयाग अनुष्ठानाचे आयोजन केले जाते आहे. पहिल्या दिवशी सकाळी पुण्याहवचन, संभारदान, पवमान, पंचसूक्त जप, अभिषेक, महापूजा झाल्यावर उत्सवमूर्तीचे खास उभारलेल्या सभामंडपामध्ये आगमन होते आणि नंतर आरती होऊन तीर्थप्रसाद दिला जातो. संध्याकाळी श्री पांडुरंग भजनी मंडळातर्फे भजन, आरती झाल्यावर रात्रौ दशावतारी नाटक सादर केले जाते. दुसर्‍या दिवशी वर्धापनानिमित्ताने सकाळी धार्मिक कार्ये झाल्यावर पूर्णाहुती, महिलांतर्फे कुंकुमार्चन, आशीर्वचन, आरत्या व नंतर महाप्रसाद (समराधना) होते. संध्याकाळी भजन, आरत्या व नंतर रात्रौ नाटक सादर केले जाते. नाटक संपल्यावर पुन्हा ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती मंदिरात आणून स्थानापन्न केली जाते.
फाल्गुन शुद्ध १३ या दिवशी मंदिराचा वर्धापनदिनही विविध धार्मिक कार्यांनी संपन्न होत असतो. या महत्त्वाच्या आणि प्रमुख उत्सवांव्यतिरिक्त श्री दत्तजयंती, श्री गणेशजयंती, संत नरहरी सोनार पुण्यतिथी, तुकाराम बीज, श्रावण महिन्यातील त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातील चार बुधवार तथा दोन एकादशी हे उत्सवही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरे होत असतात. उपलब्ध नामावलीनुसार देवस्थानात ‘बुधवार’ साजरा करणारे ६२ भाविक असून श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी बुधवार कै. दिगंबर राजाराम डांगी यांचे कुटुंबीय व दुसरा श्रावणी बुधवार कै. नारायण गोपी वाळके व कुटुंबीय यांनी ठेवलेल्या कायम निधीतून साजरा केला जातो. दर महिन्याला येणार्‍या दोन एकादशी २४ भाविकांकडून तर आषाढ आणि कार्तिक महिन्यात येणारी एकादशी देवस्थानतर्फे साजरी केली जाते.
विठ्ठलवाडी-अन्साभाटचा चेहरा पूर्वीसारखाच
यापूर्वीच विदित केल्याप्रमाणे म्हापसेनगर हे डोंगराच्या उतरणीवर वसलेले, सात वाड्यांमध्ये विभागलेले आहे. या सात वाड्यांपैकी ‘अन्साभाट’ हा एक वाडा. म्हापसानगरीच्या या एका विभागात अननसांची बाग होती आणि येथे अननसांचे पीक घेतले जात होते. यावरूनच या भागाला ‘अननसांचे भाट’ म्हणजेच ‘अन्साभाट’ असे म्हटले जात होते. पोर्तुगीजकालीन म्हापसानगरीतील विविध वाड्यांना दिलेली नावे आजही प्रचलित आहेत. ‘अन्साभाट’ वाड्यावरील ज्या भागात श्री देव विठ्ठल-रखुमाईची स्थापना करून मंदिराची उभारणी करण्यात आली, त्याच भागाचे ‘विठ्ठलवाडी’ असे नामकरण येथील रहिवाशांनी केले. आजही वाड्याचा उल्लेख करताना ‘विठ्ठलवाडी’ असाच केला जातो आहे.
माझ्या बालपणापासून पाहत आलेला या भागाचा चेहरामोहरा आजही पूर्वीसारखाच आहे. म्हापसा पोलीस स्थानकाजवळील जुन्या सारस्वत विद्यालयामागील कै. दामोदर (दामू) नाटेकर यांच्या घराजवळून विठ्ठलवाडीमध्ये जाणार्‍या एका चिंचोळ्या रस्त्याच्या दुतर्फा दगड-मातीची कौलारू बैठी घरे आजही- काही किरकोळ बदल वगळता- जशीच्या तशीच आहेत.
कै. भाऊसाहेबांचा जन्म याच वाड्यावर
हीच ती विठ्ठलवाडी जेथे गोव्याचे भाग्यविधाते कै. भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म झाला. हाच तो वाडा जेथे मराठी रंगभूमीवरील नाट्यकर्मी सावकार घराण्यातील कुटुंबीयांचं वास्तव्य होतं. हाच तो विभाग जेथे स्वातंत्र्यसैनिक कै. वासुदेव गवंडळकर यांचे कुटुंबीय राहत होते. म्हापसा नगरपालिकेत या भागाचे प्रतिनिधित्व करणारे पत्रकार तुषार हनुमंत टोपले यांचे आजोबा कै. अनंत टोपले व चुलते म्हापशाचे माजी आमदार कै. रघुनाथ (बाप्पा) टोपले यांचे शिक्षण, नाट्यलेखन व समाजकार्य या क्षेत्रातील योगदान तर वादातीत होते. त्यांचे वडील कै. हनुमंत अनंत टोपले व भगिनी कु. मंजिरी हनुमंत टोपले यांचे नाट्यक्षेत्रातील योगदानही लक्षात ठेवण्यासारखे! हे टोपले कुटुंबीयही याच वाड्यावरचे. श्री महारुद्र प्रासादिक संगीत मंडळीचे एक बिन्नीचे नाट्यकलाकार कै. अर्जुन बाळकृष्ण कर्पे, नेपथ्यकार व मूर्तिकलाकार कै. भालचंद्र नाटेकर व कै. सोनू वसंत नाटेकर हे बंधुद्वय तथा कै. सुब्राय दिवकर, गायक व हार्मोनिअमवादक श्री. गोपिनाथ वाळके, फलकांचे रंगकाम करणारे कै. रामदास डांगी, समाजकार्यकर्ते व व्यापारी कै. महादेव पिळणकर आदी विविध क्षेत्रांतील नामवंत मंडळी याच वाड्यावरील. श्री विठ्ठल-रखुमाईच्या आशीर्वादाने नामवंत व कीर्तिवंत झाले. याच विठ्ठलवाडीत आमच्या वाडवडिलांचं एक जुनं घर आहे. या घराला लागूनच कै. राजाराम नाटेकर यांचं एकमजली घर आहे. घराच्या तळमजल्यावर प्रवेशद्वारासमोरच भिंतीला एक श्री राष्ट्रोळी देवाची घुमटी आहे. पूर्वी याच ठिकाणी गोमंतकीय पारंपरिक ‘धालो’ खेळला जायचा. वाड्यावर कुणाची वक्रदृष्टी पडू नये आणि वाड्यावरील रहिवाशांवर ईश्‍वराची कृपा असावी म्हणून राष्ट्रोळी देवाला सांगणे करून देवचारास पूर्वी कोंबड्याचा बळी दिला जायचा. आजच्या सुशिक्षित पिढीने कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा बंद केलेली असून फक्त कोंबड्याचं एक पीस काढून टाकलं जातं आणि कोंबड्याला सोडून दिलं जातं. ‘धालो’ व ‘कोंबडा’ सोडून देण्याची ही जुनी प्रथा आजही सुरू आहे.
अशा या विठ्ठलवाडीतील सुंदर व सुबक असं श्री विठ्ठल-रखुमाईचं मंदिर म्हापसानगरीतील रहिवाशांचं श्रद्धास्थान बनलं आहे. बालपणी त्या देवस्थानच्या प्रांगणातील रंगमंचावर पाहिलेल्या वाड्यावरील बुजूर्ग कलाकारांची जागा ऑर्केस्ट्रा, दशावतारी नाटकांनी घेतली आहे. तरीसुद्धा वाड्यावरील युवापिढी देवळाच्या कारभारात सक्रिय सहभाग घेऊन विविध प्रकारच्या स्पर्धा, धार्मिक उत्सव मोठ्या उमेदीने साजरे करीत असतात ही एक सुखावह व आशादायी बाब आहे. आजचा तरुण चुकीच्या मार्गाने चालला आहे, वाहवत चालला आहे, व्यसनात बुडाला आहे अशा प्रकारच्या तक्रारी वडीलधार्‍यांकडून सतत कानी पडत असताना विठ्ठलवाडीतील युवक श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी लीन होऊन योग्य दिशेने वाटचाल करीत आहे असं म्हटलं तर ते अनाठायी होणार नाही!