विठू माझा लेकुरवाळा

0
839
  •  मीना समुद्र

‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ अशीच सार्‍यांची स्थिती असते. कारण विठ्ठल ही सार्‍या जगाची माऊली, त्यांना आश्रय देणारी साऊली; ममतेच्या दुग्धधारा त्यांच्या मुखी घालणारी ही गाऊली. तिला किती गावे, तिला किती घ्यावे, किती वर्णावे?

‘आषाढी’ आली की सार्‍यांनाच पंढरीचे वेध लागतात. आषाढी शुक्ल एकादशी ही तिथी ‘आषाढी’ नावानेच ओळखली जाते. या दिवसात आषाढधारा बरसत असतात, माती पाण्याने भिजत असते आणि सगळ्यांचीच मने अतिशय ‘अळुमाळु’ होऊन जातात. विशेषतः वारकर्‍यांची. दरवर्षी पांडुरंगाच्या वारीसाठी निघणारे हे वारकरी हे भक्त भागवत. गळ्यात तुळशीच्या मण्यांच्या माळा, कपाळी बुक्क्याचा टिळा, हाती भगव्या पताका, टाळ-वीणा वाजवीत अनवाणी पावलांनी ऊन-पावसाची पर्वा न करता अशा लाखो भाविकांची दिंडी नाचत, गात पंढरपुरी निघते. बायाबापड्याही तुळशीवृंदावने डोक्यावर घेऊन हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या दर्शनाला निघतात. ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ अशीच सार्‍यांची स्थिती असते. कारण विठ्ठल ही सार्‍या जगाची माऊली, त्यांना आश्रय देणारी साऊली; ममतेच्या दुग्धधारा त्यांच्या मुखी घालणारी ही गाऊली. तिला किती गावे, तिला किती घ्यावे, किती वर्णावे?
सावळ्या विठ्ठलाला आणि साजिर्‍या रुक्मिणीला सर्व संतांनी ‘मायबाप’ ‘मायतात’ असे संबोधले असले तरी एकट्या विठ्ठलालाही ‘आई’ अशीच हाक घातली आहे. आणि ही त्यांची ‘माय’ जिथे आहे ते ठिकाण त्यांचे मायेचे ‘माहेर’ झाले आहे. भीवरेच्या तीरावर असणार्‍या अशा पंढरीला- त्यांच्या माहेराला भेटण्यासाठी त्यांचे मन आतुर न झाले तरच नवल! विशेष म्हणजे लग्न झालेल्या मुलींना माहेरची ओढ असते. त्या लेकीबाळी सासरी सुखात नांदत असूनही आईच्या भेटीसाठी उत्सुक असतात. पण येथे तर पुरुष-स्त्रिया असा भेदभावच नाही. सर्वांचे आहेत ते दर्शनासाठी आतुर डोळे आणि भेटीसाठी व्याकूळ-आकुळ-पिकुळ झालेले मन; पायी डोई ठेवण्यासाठी, ते बरवे रूप उरात साठवण्यासाठी चाललेली त्यांची धडपड.

विठूचा गजर करीत, रिंगण घालीत चाललेली ही दिंडी पाहाणे हाही एक अपूर्व नयनोत्सव असतो. नामयाची दासी जनाबाई ही विठोबाची परमभक्त. तिने एका अभंगात ‘ये ग ये ग विठाबाई| माझे पंढरीचे आई|’ अशी आर्त हाक तिला घातली आहे. ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी’ तसे तू लक्ष ठेव असे विठूमाऊलीला विनवणार्‍या जनाबाईने एक अतिशय गोड अभंग लिहिला आहे. त्याची अनंत आवर्तने लोकांच्या तोंडून निघालेली आहेत. विठूमाऊलीचे एक सुंदर चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे ठाकावे अशी सुंदर चाल त्या गीताला दिलेली आणि आशाबाईंनी अतिशय लडिवाळ सुरात ते गायलेले आहे- ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा…’ ही लेकरे तरी आहेत काण? खांद्यावर निवृत्ती बसलेला आहे. त्या माऊलीने सोपानाचा हात धरलेला आहे. ज्ञानेश्‍वर पुढे चालत आहेत. त्या ज्ञानप्रकाशात उजळून निघालेल्या मार्गावर मागे मुक्ताई चालते आहे. विठूमाऊली बसली की तिच्या मांडीवर गोरा कुंभार बसलाच म्हणून समजावे. चोखामेळा आणि जीवाही सोबत आहेत. बंका कडेवर बसलेला आहे आणि नामयानं त्याची करांगुळी (करंगळी) पकडलेली आहे. माहेरी आलेल्या लेकीबाळींनी घर गजबजून जाते, नातवंडा-पतवंडांनी गुंजत राहते आणि प्रत्येक क्षण हा एक सुखद सोहळा होऊन जातो तसे या विठाईचे घर आणि संतांचे माहेर गजबजून गेले आहे आणि सारेजण तिच्या अवतीभवती आहेत. निकट सान्निध्यात आहेत. मायेच्या हळव्या स्पर्शाला आसुसलेले आहेत.

विठ्ठलाची ‘विठाई’ होण्यामागे हेच तर कारण आहे. त्याचं काळीजच मातेच्या ममतेचं आहे. माता सार्‍यांचे कुशलमंगल पाहते. पडता-झडता-रडता कडेवर उचलून घेते. त्यांचे दुःख-कष्ट जाणते. त्यांचा प्राणविसावा असते. तीच त्यांची भूपाळीही आणि अंगाईही असते. ती त्यांना जोजवते, धीर देते, त्यांच्यासाठी तिचा जीव करुणा होऊन वाहतो, माया होऊन स्रवतो, अष्टौप्रहर तिला आपल्या संतानाचीच काळजी असते, त्याला जीवापाड जपणे हेच तिचे प्रेय आणि श्रेय असते. लेकरू शहाणंसुर्तं असो की वेडंबागडं, स्वच्छ असो की चिखलमातीनं लडबडलेलं, सुरूप-कुरूप, स्वस्थ-अशांत कुठल्याही लेकराबद्दल तिच्या मनात भेदभाव नसतो. त्याच्या लीला ती कौतुकाने पाहते, आगळीक घडली तर वत्सलतेने समजावते, धीर देते, आधार होते. येथे फक्त वत्सलतेचाच अवघा रंग एकवटलेला आहे.

विठाई माऊली भक्तांची, आर्तांची, अपंगांची काळजी घेते. जनाबाईची लुगडी धुते. केरवारा करते. तिला मायेने झोपवते. सखूसारख्या गरीब जीवावर आलेला माळेतील पदकाच्या चोरीचा आळ दूर करते. सावता माळ्याला तर ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ असेच तिचे स्वरूप दिसते. नामदेव ‘घास घेई नारायणा’ म्हणून हट्ट करतात. ज्ञानेश्‍वर ‘बहुत सुकृताची जोडी’ म्हणून या विठ्ठलाची आवड निर्माण झाल्याचे सांगतात. चोखा मेळा ‘धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती आता काही नसे अपराध’ असे म्हणून हाका घालतो. जनार्दनशिष्य एकनाथ ‘आणिका देवासी नेघे माझे चित्त| गोड गाता गीत विठोबाचे’ म्हणत भागवत ग्रंथ लिहितात. ‘ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा’ म्हणत चोखा मेळा वरलीया रंगाला न भुलता आत्मरंगी लीन होण्यासाठी विठ्ठलाचे पायी लीन होण्यास सांगतात. ‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची’ म्हणत पताकांचे अपार भार एकत्र येऊन भीमातीर जयजयकारानं गर्जत असल्याचे वर्णन करतात. या सार्‍या वारकर्‍यांची विठूमाऊली पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर २८ युगे ‘भक्तांचिया काजा’साठी कटिबद्ध असल्याचे सांगत कमरेवर हात ठेवून उभी आहे. भक्ताची लाथ ही ‘वत्सलांघना’सारखी मिरवीत, कपाळी चंदनटिळा आणि गळ्यात तुळशीमाळा घालून अतिशय साध्या, सोज्वळ रूपात ती उभी आहे. ‘राजस सुंदर मदनाचा पुतळा’ असे हे शब्द विठूचे लावण्य वर्णन करण्यासाठी सार्थ आहेत.

भीमा आणि चंद्रभागा या विठाईच्या चरणीच्या गंगा आहेत. त्यात मनसोक्त डुंबण्यासाठी, भक्तभाविकांची, वारकर्‍यांची दिंडी हे रूप पाहायला पंढरपुरी जाताना त्यांच्या मनी हा एकच भाव असतो-
जाईन गे माये तया पंढरपुरा
भेटेन माहेरा आपुलीया…
यंदा लाखोंची वारी भलेही न होवो, लखलखत्या आठवणींची अभंग वारी तरी करूया.