विजेतेपदाच्या इराद्याने उतरणार सिंधू

0
102

>> कोरिया ओपन वर्ल्ड टूर सुपर ५०० आजपासून

चायना ओपनमधील सुमार कामगिरीनंतर भारताची पी.व्ही. सिंधू आजपासून सुरू होणार्‍या कोरिया ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूपर सुपर ५०० स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मागील स्पर्धेतील अपयश मागे टाकून ४००,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत भरारी घेण्यासाठी तिने कंबर कसली आहे.

विश्‍व अजिंक्यपद स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर सिंधूला चायना ओपन वर्ल्ड टूर सुपर १००० स्पर्धेच्या दुसर्‍याच फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचुवांग हिच्याकडून मागील आठवड्यात धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता.
२४ वर्षीय सिंधूने २०१७ साली कोरिया ओपन स्पर्धा जिंकली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा तिचा इरादा असेल. अमेरिकेच्या बिवन झांग या बेभरवशी खेळाडूविरुद्ध सिंधूला आपली मोहीम सुरू करावी लागणार आहे. विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील आपल्या वाटचालीत सिंधूने चीनी वंशाच्या झांगला नमविले होते. परंतु, सिंधूला इंडिया ओपन व डेन्मार्क ओपनमध्ये झांगकडून पराभव पत्करावा लागला होता. अखेरच्या तीन लढतीत सिंधू झांगवर वरचढ ठरली असून तिच्याविरुद्धचा जय-पराजयाचा रेकॉर्ड ५-३ असा केला आहे. पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यास सिंधूसमोर पोर्नपावी चोचुवांग असेल. त्यामुळे चायना ओपनमधील पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी सिंधूला लाभू शकते. मलेशिया ओपन, न्यूझीलंड ओपन, सुदिरमन चषक व चायना ओपनच्या पहिल्याच फेरीत झालेल्या पराभवानंतर भारताची लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे. स्पर्धेसाठी आठवे मानांकन लाभलेली सायना कोरियाच्या किम गा इयून हिच्याशी पहिल्या फेरीत झुंजेल.

हैदराबादच्या २९ वर्षीय सायनाचा किमविरुद्धचा रेकॉर्ड २-० असा आहे. किमविरुद्धचा अजून एक विजय सायनाला दुसर्‍या फेरीत इंडोनेशियाच्या ग्रिगोरिया मरिस्का तानजुंग हिच्याविरुद्ध उभा करू शकतो. विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता व चायना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेला बी. साई प्रणिथ पुरुष एकेरीत पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्याच फेरीत त्याच्यासमोर विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता डेन्मार्कचा अँडर्स आंतोनसेन असेल. माजी राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यपला पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या खेळाडूशी आपला पहिला सामना खेळावा लागेल. मागील महिन्यात झालेल्या थायलंड ओपन स्पर्धेतील यशानंतर बीडबल्यूएफ क्रमवारीत ‘अव्वल १०’मध्ये दाखल झालेल्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांचा सामना पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत चौथ्या मानांकित ताकेशी कामुरा व केगो सोनोडा यांच्याशी होणार आहे. मनू अत्री व सुमिथ रेड्डी यांना पात्रता स्पर्धेतून पुढे सरकलेली जोडी प्रतिस्पर्धी म्हणून लाभेल.