विक्रम लँडरचे ठिकाण सापडले : के. सिवन

0
118

चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असतानाच चांद्रयान-२ मोहीमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने इस्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वांचा विरस झाला होता. मात्र काही तासांच्या जोरदार प्रयत्नांनंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यानी ही माहिती दिली आहे. ऑर्बिटरने लँडरची छायाचित्रे घेतली असून संपर्क झालेला नाही अशी माहिती सिवन यांनी दिली आहे. लँडरशी संपर्काचे आमचे प्रयत्न सुरुच असून लवकरच त्यात यश येईल असे त्यांनी म्हटले आहे.

विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतरही भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेबद्दल जगभरातून इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला विक्रम लँडरचा संपर्क तुटलेला असला तरी पुढील १४ दिवस त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न चालूच राहतील असे सिवन यांनी स्पष्ट केले होते. इस्रोच्या कामगिरीचे नासाने कौतुक करून या कामगिरीमुळे नासालाही स्फूर्ती मिळाल्याचे म्हटले आहे.

चांद्रयान मोहिमेमुळे
आम्हाला प्रेरणा : नासा
इस्रोच्या या देदिप्यमान कामगिरीची दखल घेत नासाने म्हटले आहे, ‘चांद्रयान – २ मोहिमेचा तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे’ तसेच भविष्यात अवकाश संशोधन क्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याची इच्छाही नासाने व्यक्त केली आहे.