विकासाच्या मुद्द्यावरच २०१९ ची निवडणूक लढवणार

0
112

>> केंद्रीय मंत्री मुख्तार नक्वी : राम मंदिर, हिंदुत्वाचा मुद्दा नाही

राम मंदिर व हिंदुत्त्व नव्हे तर विकास हाच मुद्दा घेऊन भाजप २०१९ सालची निवडणूक लढवणार आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्रातील मोदी सरकारने गेली चार वर्षे केलेल्या कामाची माहिती नक्वी यांनी यानी यावेळी दिली. गेल्या चार वर्षात सरकारने देशात विकासाबरोबरच जे काही बदल घडवून आणले त्याद्वारे देशात परिवर्तन झाल्याचे ते म्हणाले. विदेशात असलेला भारतीयांचा काळा पैसा परत आणण्यासाठी चौकशी पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी देशभरात व्हीआयपी संस्कृती सर्वत्र रूजलेली होती. सत्तेवर येताच भाजप सरकारने सर्वप्रथम त्याला मूठमाती दिली. त्यानंतर भाजपने देशात गरीब व मध्यमवर्गीयांसाठी योजना राबवून आपले सरकार हे सर्वसामान्य लोकांचे सरकार हे दाखवून दिल्याचा दावा नक्वी यांनी केला.
हज यात्रेसाठी जाण्यास मुस्लिमांना दिली जाणारी सब्सिडी सरकारने बंद केली. त्यासाठीचा १ हजार १७ कोटी रु. एवढा निधी आता सरकार मुस्लिम मुलींच्या शिक्षणावर खर्च करीत आहे.

विकास विरोधकांविरुध्द लढाई
सरकारने गेल्या ४ वर्षांत कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व जाती व धर्मांच्या लोकांचा विकास घडवून आणला व विकासाची फळे सर्वांनाच चाखता यावीत याकडे प्रकर्षाने लक्ष दिले. आमची यापुढील लढाई ही विकासाला विरोध करणार्‍यांविरुध्द आहे, असे ते म्हणाले.
देश व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने ४३१ योजना तयार करून त्या कार्यान्वित केल्या. त्यामुळे जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाल्याचा दावाही नक्वी यांनी केला.

देशात ४.६६ कोटी
अल्पसंख्य मुलींना शिष्यवृत्त्या
सरकारने देशातील ४ कोटी ६६ लाख अल्पसंख्यांक विद्यार्थीनींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडणार्‍या ह्या मुलींची टक्केवारी ७२ वरून ४०-४२ टक्क्यांवर आल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारने गोव्यात ५ लाख ४३ हजार अल्पसंख्यांकाना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हे एक सक्षम असे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुढील निवडणुकीला सामोरा जाणार असल्याचे नक्वी यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.

अल्पसंख्यांक सुरक्षितच
देशात अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत व ते असुरक्षिततेची भावना व्यक्त करीत असल्याचे नक्वी यांच्या नजरेस आणून दिले असता देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित नाहीत. काही छोट्या-मोठ्या घटना सोडल्यास गेल्या ४ वर्षांच्या काळात एकही जातीय दंगल देशात झाली नसल्याचे ते म्हणाले. काही विरोधी पक्षानी चालवलेला तो खोटा प्रचार असल्याचे ते म्हणाले. विदेशात असलेला काळापैसा परत आणण्यासाठी विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

खाणी सुरू करण्यासाठी
गोवा सरकार प्रयत्नशील
गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू व्हावा यासाठी भाजपचे गोव्यातील सरकार सर्व ते प्रयत्न करीत आहे, असे पत्रकारांच्या प्रश्‍नाचे उत्तर देताना नक्वी यांनी सांगितले. यासंबंधीची लोकांची चिंता ही रास्तच आहे. भाजप सरकारलाही याबाबत चिंता असून खाण उद्योग लवकर सुरू व्हावा यासाठी केंद्राच्या मदतीने राज्य सरकार सर्व ते प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने खाण प्रकरणी हस्तक्षेप केलेला असल्याने तातडीने काही गोष्टी करण्यास अडचणी येत आहेत हे जनतेने समजून घेण्याची गरज आहे, असेही नक्वी यांनी यावेळी स्पष्ट केले.
डिझेल व पेट्रोलच्या वाढत्या किंमती हा केंद्र सरकारसाठी निश्‍चितच चिंतेचा विषय आहे असे त्यांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नावर सांगितले.