विंबल्डन स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ

0
101

प्रतिष्ठेच्या विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे आयोजक असलेल्या ऑल इंग्लंड क्लबने स्पर्धेच्या बक्षीस रकमेत ११.८ टक्क्यांनी वाढ केली आहे. स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम आता ३८ मिलियन पाऊंड्‌स (४९.४ मिलियन डॉलर्स) असेल. मागील वर्षी एकूण बक्षीस रक्कम ३४ मिलियन पाऊंड्‌स (४४.२ मिलियन डॉलर्स) होती.

पुरुष व महिला एकेरीतील विजेत्याला २.३५ मिलियन पाऊंड्‌स (३.६ मिलियन डॉलर्स) मिळतील. पहिल्या काही फेर्‍यांत पराभूत होणार्‍या खेळाडूंच्या बक्षीस रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. पात्रता फेरीत तसेच एकेरीतील पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या फेरीत पराभूत होणार्‍या खेळाडूच्या बक्षीस रकमेत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत खेळाडूला ४५,००० पाऊंड्‌स मिळणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत कोर्ट नंबर वनवर छप्पर पहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये वापरण्यात आलेल्या ‘शॉर्ट क्लॉक’चा वापर मात्र पुढील वर्षापासून केला जाणार असल्याचे स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड लुईस यांनी सांगितले आहे. बक्षीस रकमेत मोठी वाढ केल्यानंतरही युएस ओपनच्या बक्षीस रकमेच्या जवळपासही त्यांना जाता आलेले नाही. युएस ओपनमध्ये एकेरीतील विजेत्याला ३.८९ मिलियन डॉलर्स (२.९९ मिलियन पाऊंड्‌स) दिले जातात.