विंडीज लिजंड्‌सचा सलग दुसरा पराभव

0
114

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिका लिजंड्‌सने शानदार विजयी सलामी दिली. बुधवारी जगप्रसिद्ध क्षेत्ररक्षक जॉंटी र्‍होडसने फलंदाजीतील कौशल्यही सादर केले. त्याने कर्णधारपदास साजेशी खेळी केली आणि त्याला ऍल्बी मॉर्कलची साथ मिळाली. त्यामुळे आफ्रिकेने वेस्ट इंडीज लिजंड्‌सला सहा गडी राखून हरविले.
डी. वाय पाटील स्टेडियमवरील लढतीत विंडीजने आफ्रिकेसमोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यांनी हे लक्ष्य नऊ चेंडू राखून गाठत बाजी मारली. जॉंटीने अष्टपैलू ऍल्बी मॉर्कलच्या साथीत पाचव्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. दोघांनी नाबाद अर्धशतके झळकाविली. त्यांनी आवास्तव धोका न पत्करता विजय साकार केला. मॉर्कलने कार्ल हुपरला चौकार मारून विजयावर धडाक्यात शिक्कामोर्तब केले. आफ्रिकेची मदार हर्शल गिब्जवर होती, पण दुसर्‍या षटकात टिनो बेस्टच्या चेंडूवर तो चकला आणि पायचीत झाला. तेव्हा त्याची एकच धाव झाली होती. नवव्या षटकात ४ बाद ४२ अशी घसरण झाली असताना आफ्रिकेवर दडपण आले होते. अशावेळी जॉंटी-मॉर्कल यांची जोडी जमली.

त्याआधी विंडीजच्या डावाची सुरवात नाट्यमय झाली. योहान वॅन डर वॅथने डॅरेन गंगाला टाकलेले पहिले षटक निर्धाव गेले. दुसर्‍या षटकात गार्नेट क्रुगरला चंदरपॉलने तीन चौकार मारले. गंगाने चौथ्या षटकात ऍल्बी मॉर्कलचे सलग तीन चेंडू सीमापार केले.
या मालिकेत चांगला फॉर्म गवसलेल्या चंदरपॉलला बाद करून पॉल हॅरीसने आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. पुढील षटकात हॅरीसने गंगाचा त्रिफळा उडविला. प्रतिस्पर्धी कर्णधार ब्रायन लाराचा बचावही भेदत त्याने दांडी गुल केली. रिकार्डो पॉवेलने मग प्रतिआक्रमण रचले. त्याने अँड्रयू हॉल, हॅरीस आणि क्रुगर या तिघांना षटकार खेचत विंडीजची आगेकूच कायम ठेवली.
मॉर्कलने टाकलेले १५वे षटक सनसनाटी ठरले. पहिल्या चेंडूवर हयात परतला. दुसरा चेंडू पॉवेलने सीमापार केला. तिसर्‍या चेंडूवर तो धावचीत झाला, तर चौथ्या चेंडूवर रिडली जेकब्ज शून्यावर परतला.

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज लिजंड्‌स ः २० षटकांत ८ बाद १४३ ः डॅरेन गंगा ३१ (३२ चेंडू, ५ चौकार) शिवनारायण चंदरपॉल २१ (१७ चेंडू, ४ चौकार) ब्रायन लारा ४, रिकार्डो पॉवेल ३० (१७ चेंडू, १ चौकार, २ षटकार), कार्ल हुपर नाबाद २३ (१८ चेंडू, १ चौकार, १ षटकार), टिनो बेस्ट ११, ऍल्बी मॉर्कल ३१-२, पॉल हॅरीस २१-३) पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लिजंड्‌स ः १८.३ षटकांत ३ बाद १४६ ः जॉंटी र्‍होडस नाबाद ५३ (४० चेंडू, ६ चौकार, १ षटकार), ऍल्बी मॉर्कल नाबाद ५४ (३० चेंडू, ६ चौकार, २ षटकार) टिनो बेस्ट १२-२, सुलेमान बेन २१-१