विंडीजची आजपासून कसोटी

0
76

यजमान न्यूझीलंड व पाहुणा वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून खेळविला जाणार आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज टिम साऊथी व यष्टिरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंग यांच्या अनुपस्थितीत यजमान संघ उतरणार असला तरी घरच्या वातावरणात खेळण्याचा फायदा किवीज संघाला मिळणार आहे. न्यूझीलंडच्या तुलनेत विंडीजचा संघ स्थिरावलेला असून वातावरण व वेगवान खेळपट्‌ट्यांशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या संघाला कसरत करावी लागू शकते. मागील १२ आंतरराष्ट्रीय डावात अर्धशतकी वेस ओलांडण्यात अपयश आलेला विंडीजचा फलंदाज जर्मेन ब्लॅकवूड याला आजच्या कसोटीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

अन्यथा शिमरॉन हेटमायर याला संधी मिळू शकते. काईल होपला वगळल्यामुळे त्याच्या जागेवर सुनील अंबरिसचा समावेश नक्की मानला जात आहे. दुसरीकडे चांगल्या सुरुवातीसाठी न्यूझीलंडला टॉम लेथम व जीत रावल या डावखुर्‍या जोडीवर अवलंबून रहावे लागणार आहे. भारतीय उपखंडात चमक दाखवलेला लेथम यष्टिरक्षणाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याने त्याला अधिक मुक्तपणे फलंदाजी करणे शक्य होणार आहे. दुसरीकडे रावलने आपल्या पहिल्या सात कसोटींत पाच अर्धशतके लगावून आपल्या भक्कम बचावतंत्राचे दर्शनही घडविले आहे. त्यामुळे या दुकलीला लवकर माघारी पाठविले तरच विंडीजला न्यूझीलंडमध्ये यश मिळविणे शक्य होणार आहे.

न्यूझीलंड संभाव्य ः टॉम लेथम, जीत रावल, केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, मिचेल सेंटनर, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, नील वॅगनर व ट्रेंट बोल्ट.
विंडीज (संभाव्य) ः क्रेग ब्रेथवेट, कायरन पॉवेल, शेय होप, सुनील अंबरिस, रॉस्टन चेस, जर्मेन ब्लॅकवूड, शेन डावरिच, जेसन होल्डर, केमार रोच, देवेंद्र बिशू व शेन्नन गेब्रियल.