विंडीजचा शेय होप पाचव्या स्थानी

0
119

>> ‘टॉप १०’ अष्टपैलूंत नाही एकही भारतीय

विंडीजचा यष्टिरक्षक फलंदाज शेय होप याने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ‘अव्वल पाच’मध्ये प्रवेश केला आहे. पाच स्थानांची उडी घेत त्याने चौथे स्थान प्राप्त केले आहे. आयर्लंडमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील दमदार कामगिरीच्या बळावर त्याने हे यश संपादन केले आहे. आघाडी फळीतील या फलंदाजाचे ८०८ गुण झाले आहेत. तिरंगी मालिकेत त्याने २ शतके व २ अर्धशतकांसह ९४.००च्या सरासरीने ४७० धावा जमवल्या होत्या. पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान याने ‘टॉप १०’ मध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १३८ व ५७ धावांच्या खेळींमुळे त्याने नववे स्थान आपल्या नावे केले आहे.

आघाडीच्या ५० खेळाडूंचा विचार केल्यास पाकिस्तानचा इमाम उल हक (१४वे स्थान, + ८) व सर्फराज अहमद (४७वे स्थान, + ९), बांगलादेशचा सौम्य सरकार (२८वे स्थान, + १०) व आयर्लंडच्या अँडी बालबिर्नी (५०वे स्थान, + ८) यांचा समावेश आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांनी अनुक्रमे आपले पहिले व दुसरे स्थान कायम राखले आहे. पन्नास षटकांचा आपला चौथा विश्‍वचषक खेळण्यास सज्ज झालेला न्यूझीलंडचा रॉस टेलर तिसर्‍या स्थानी आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत चार सामन्यांत १० बळी घेतलेल्या इंग्लंडच्या ख्रिस वोक्स याने इंग्लंडच्या या अष्टपैलूने नऊ स्थानांची मोठी उडी घेत ६५७ गुणांसह नववे स्थान आपल्या नावे केले आहे. भारताचा जसप्रीत बुमराह, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट व अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या तीन स्थानांवर असून त्यांचे अनुक्रमे ७७४, ७५९ व ७२६ गुण आहेत.

बांगलादेशचा ऑफस्पिन गोलंदाज मेहदी हसन मिराझ याने आठ स्थानांची सुधारणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कसह तो संयुक्तपणे २२व्या स्थानावर विराजमान आहे. बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझा २४व्या (+ ४), पाकिस्तानचा इमाद वासिम नऊ स्थानांची सुधारणा करत २८व्या स्थानावर पोहोचला आहे.

अष्टपैलूंत शाकिब अल हसन अव्वल
बांगलादेशचा अनुभवी फिरकीपटू शाकिब अल हसन याने वनडे क्रिकेटमध्ये अष्टपैलूंच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळविले आहे. आयर्लंडमधील मालिकेतील कामगिरीमुळे त्याला पुन्हा प्रथम स्थान मिळविणे शक्य झाले. मालिकेतील तीन लढतीत शाकिबने दोन नाबाद अर्धशतकांसह १४० धावा करताना गोलंदाजीत दोन बळी मिळविले होते. शाकिबचे ३५९ गुण झाले असून दुसर्‍या स्थानावरील राशिदपेक्षा त्याचे २० गुण अधिक आहेत. टॉप १० मध्ये एकही भारतीयाचा समावेश नाही. १२व्या स्थानावरील केदार जाधव हा सर्वोत्तम स्थानावरील भारतीय आहे.