वाहतूक परवाने, आरसी बूक आजपासून मिळणार घरपोच

0
97

>> वाहतूक मंत्र्यांहस्ते योजनेचा शुभारंभ

वाहनचालकांना त्यांचे आरसी बुक (वाहन नोंदणी पुस्तिका) व ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना) स्पिड पोस्ट सेवेद्वारे घरपोच देण्यात येणार असून काल या योजनेचा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते पर्यटन भवनमध्ये आयोजित खास सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला. यावेळी ढवळीकर यांनी स्पिड पोस्टद्वारे ग्राहकांना घरी पाठवण्यासाठीच्या आरसी बुक व ड्रायव्हिंग लायसन्सचा एक शुभारंभी गठ्ठा टपाल खात्याचे पोस्टमास्टर जनरल डॉ. विनोद कुमार यांच्या हवाली केला. आतापर्यंत कुठल्याही राज्यात वाहनचालकांना आरसीबुक व लायसन्स घरपोच मिळण्याची सोय नाही. ही सेवा देणारे गोवा हे पहिले राज्य ठरले असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले. खात्याने स्मार्ट कार्डे (आरसी बुक व वाहनचालक परवाने) तयार करण्याचे कंत्राट जीईएल कंपनीला दिले असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी सांगितले. वाहनचालकांना त्यांचे आरसीबुक व परवाने नेण्यासाठी वाहतूक खात्यात ते तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा यावे लागत होते. त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. आता ग्राहकांना ते घरपोच मिळणार असल्याने त्यांची गैरसोय होणार नाही, असे ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
महसूल १७५ कोटींवर
राज्यातील लोकांना वाहतूक खात्यातर्फे चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आपण २००८ साली खात्याचे संगणकीकरण करून महसुलात वाढ व्हावी यासाठीही पावले उचलली. परिणामी खात्याचा २००८ साली जो ८६ कोटी रु. एवढा महसूल होता तो आता १७५ कोटींवर पोचला असल्याचे ढवळीकर म्हणाले. चांगले प्रशासन, खाणीद्वारे मिळणारा महसूल व लोकांकडून तात्काळ केला जाणारा पैशांचा भरणा यामुळे खात्याचा महसूल वाढल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लायसन्स व आरसीबुक आता स्मार्ट कार्ड रुपात देण्यात येत असल्याने खात्याने त्यासाठीचे प्रक्रिया शुल्क ५० वरून ८० रु. वर नेले आहे.