वाहतूक खाते आता पूर्णपणे ऑनलाईन व कॅशलेस

0
112

>> वाहतूक संचालक निखिल देसाईंची माहिती; रोख रकमेचा पर्यायही खुला

पूर्णपणे ऑनलाईन व ‘कॅशलेस’ व्यवहार करू देण्याची सुविधा असलेले वाहतूक खाते हे राज्यातील पहिले सरकारी खाते बनले आहे. त्यासाठी नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या खात्याच्या वेबसाईटचा काल मंत्रालयात मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.

यापुढे रस्ता कर, प्रवाशी कर, चेक नाक्यांवरील कर आदी करांसह, वाहन नोंदणी शुल्क, वाहन परवाना शुल्क, परवाना नूतनीकरण शुल्क आदीचा भरणा ऑनलाईन अथवा क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून करता येईल. तसेच रोख रकमेचा पर्यायही खुला ठेवण्यात येणार आहे, असे वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी सांगितले. जे ग्राहक ऑनलाईन पद्धतीने पैसे भरतील. त्यांचे पैसे ताबडतोब ‘अपलोड’ होतील व दुसर्‍या दिवशी ते सरकारी तिजोरीत जमा होतील, अशी माहितीही देसाई यांनी दिली.

डिजिटल बँकिंगसाठी
एचडीएफसी बँक
दरम्यान, डिजिटल बँकिंगसाठी वाहतूक खात्याने एचडीएफसी बँकेची मदत घेतली आहे. ‘वाहन’ या सॉफ्टवेअरच्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी, ‘सारथी’ या सॉफ्टवेअरचा चालकांना परवाने देण्यासाठी तर ‘ई-ट्रान्स’चा वापर हा ‘परमीट’शी संबंधित व्यवहारासाठी करण्यात येणार असल्याची माहितीही देसाई यांनी यावेळी दिली.

३० ‘पॉस’ मशीन्स
वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहनचालकांना जागच्या जागी क्रेडिट अथवा डेबिट कार्डाद्वारे दंड भरता यावा यासाठी आरटीओंना ३० पॉस मशिन्स पुरवण्यात आली असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.

‘ऍप’ संलग्न टॅक्सीसेवा लवकरच

मोबाईलवरील ऍपशी संलग्न अशी टॅक्सी सेवा पुढील महिन्यापासून राज्यात सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची सगळी तयारी वाहतूक खात्याने यापूर्वीच केली आहे, असे वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी काल सांगितले. राज्यातील ज्या टॅक्सीवाल्यांना या ऍपवरील टॅक्सीसेवेत सहभागी व्हायचे आहे त्यांना पुढील १० दिवसांत वाहतूक खात्याशी संपर्क साधण्यास कळवण्यात आले आहे, असे देसाई यांनी पुढे बोलताना सांगितले. मे महिन्यात ही ऍपवरील टॅक्सीसेवा सुरू करण्याचे वाहतूक खात्याने ठरवले असल्याचे देसाई यांनी नमूद केले.
ऍपवरील ही टॅक्सीसेवा वाहतूक खाते सुरू करणार असल्याने टॅक्सी भाड्याचे दरही खातेच ठरवणार आहे. या टॅक्सीसेवेमुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे हे खरे असले तरी टॅक्सीवाल्यांचेही नुकसान होणार नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. राज्यातील टॅक्सीवाल्यांचा या ऍपवरील टॅक्सीसेवेला विरोध आहे काय, असे विचारले असता देसाई म्हणाले की या टॅक्सीवाल्यांचा परराज्यातील ‘ओला’ व ‘उबेर’ ही टॅक्सीसेवा गोव्यात आणण्यास विरोध होता. मात्र, वाहतूक खात्याच्या ऍपवरील टॅक्सीसेवेला त्यांचा विरोध नाही व तो असण्याचे कारणच नसल्याचे देसाई यांनी नमूद केले.