वास्को रेल्वे स्थानकावर सराईत चोरट्याला अटक

0
113

>> सुवर्णालंकारासह साडेसहा लाखांचा माल जप्त

वास्को रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत जयराज पाटील (१९, रा. बेळगाव) या सराईत चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील ६ लाख रुपये किंमतीचे सोने तसेच १७,६०० रुपये रोख व चार मोबाइल फोन (१८ हजार किंमतीचे) हस्तगत केले. रेल्वे पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईबद्दल दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी रेल्वे पोलीसांना पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
वास्को रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती-वास्को या रेल्वेमधून प्रवास करीत असलेल्या जयराज पाटील या युवकाला रेल्वे पोलिसांनी संशयावरून हटकले असता तो गोंधळला. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ सोनसाखळ्या, १ सोन्याचा हार, ४ बांगड्या, ९ कानातील रिंगा मिळून २४० ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले. त्यांची किंमत सहा लाख एवढी तसेच चार मोबाइल फोन (सर्व मिळून १८ हजार रुपये), एक पावर बॅन्क (२००० रुपये), एक घड्याळ (२००० रुपये) व १७,६३६ रोख रक्कम साडपली. सर्व मिळून ६ लाख ३९,६३६ रुपयांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत केला. रेल्वेतून प्रवास करत असताना तो चोर्‍या करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वास्को पोलिसांच्या हवाली केले असून वास्को पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मोबाईल चोरटे वागातोर येथे जेरबंद

वागातोर येथे सुरू असलेल्या ‘टाइम आउट ७२’ या संगीत महोत्सवाच्या ठिकाणी दोघा मोबाईल चोरट्यांना अटक पोलिसांनी अटक करून ३ लाख रुपयांचे मोबाईल त्यांच्याकडून जप्त केले. सय्यद अब्बास (२१) व फुरखान अली (२३) अशी संशयितांची नावे आहेत. दोघेही मुंब्रा, महाराष्ट्र येथील आहेत. हणजूण पोलिसांनी गुरुवारी रात्री सापळा रचून ही कारवाई केली. म्हापसा न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.