वास्कोत एटीएम, दोन दुचाक्या आगीत खाक

0
61

वास्को (न. प्र.)
सासमोळे बायणा येथे रॉबिनयन रेसिडेन्सी इमारतीतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला आग लागून एटीएम खाक झाले. तेथे पार्क करून ठेवलेल्या एक स्कूटर व एक मोटरसायकलही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. तसेच ३ चारचाकी वाहने किरकोळ स्वरुपात जळली. सदर घटना रविवारी रात्री १.२० वा. घडली. आगीमुळे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या इमारतीतील दोन दुकाने आगीतून बचावली.
दरम्यान, आगीची घटना लक्षात येताच नागरिकांनी अग्नीशमन दलाला पाचारण केले. तसेच वास्को पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. दलाच्या जवानानी तसेच वास्को पोलिसांनी या इमारतीतील आठही फ्लॅटधारकांना फ्लॅट खाली करण्यास सांगितले व आग आटोक्यात आणली. तोपर्यंत एटीएम आगीत खाक झाले होते. आग शॉर्टस्‌सर्कीटमुळे लागली असल्याचे सांगण्यात आले असले तरी पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. त्याविषयी तपास चालू आहे. वीज खात्यानेही दक्षता म्हणून वीज खंडित केली. दहा लाख पर्यंत नुकसान झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.