वारीविषयी मला काय वाटते?

0
329
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

पांडुरंग होण्या| पांडुरंग व्हावें
पांडुरंग धावे| पांडुरंगीं
अशी एकात्म होण्याची आस… प्रत्येक वारकरी स्वतःचा राहत नाही… भावयात्रेचा अविभाज्य घटक होतो… हीच ती अद्वैतानुभूती… जनतेमध्ये जनार्दन शोधणारी… या ‘ईश्‍वरनिष्ठांच्या मांदियाळी’ने मराठी मनाची जमीन नांगरली आहे.

आयुष्यात मी कधी पंढरपूरच्या आषाढी किंवा कार्तिकी वारीला जाऊ शकलेलो नाही. तरी ‘वारी’ हा शब्द उच्चारताच माझ्या मनात उदात्त भाव जागे होतात. तुम्ही आस्तिक असा अथवा नास्तिक; वारीला जाणे आणि विटेवरच्या पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेवणे हा एक संस्कार आहे. शतकानुशतके अनेक भक्तजनांनी आपला माथा पांडुरंगाच्या चरणी टेकविला, अनेकांची चरणधुली ज्या क्षेत्राला लागली असे हे पवित्र क्षेत्र. अवघ्या महाराष्ट्राचे संचित. आषाढी एकादशीला किंवा कार्तिकी एकादशीला वारी करणे हे आपल्या आयुष्यातील एक पुण्यकर्म आहे, असे महाराष्ट्रातील जनमानस आजवर मानत आलेले आहे. कर्नाटकातील अनेकांचे विठ्ठल हे परम दैवत आहे. फार पूर्वीपासून गोव्यातील मंडळी पंढरपूरची वारी करीत आलेली आहे. प्रतिकूल काळातही ज्यांनी ज्यांनी हे व्रत पाळले, नेमधर्म आचरला ते ते कौतुकास व आदरास पात्र आहेत. आपण थोड्या अंतरावरच्या चालण्याने दमतो. ही मंडळी उन्हा-पावसाचा मारा सहन करीत एवढे लांबचे अंतर कसे बरे तोडत असेल? कुतूहल वाटायचे…. आजही वाटते. जी गोष्ट आपल्याला जमत नाही, ती जर कुणी करून दाखविली तर त्याच्याबद्दल मला अत्यंत आदर वाटत आलेला आहे.

वयाची अडुसष्ट वर्षे ओलांडल्यावर पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घडले. ज्ञानदेवादी संतांनी ज्याला आजवर गौरविले ते हे महाराष्ट्राचे परम दैवत… सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांचा श्‍वास आणि ध्यास पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्याचा… त्याचे सावळे सुंदर रूप म्हणजे अनुपम्य सुखाचा सोहळा… अनेकांच्या अभंगरचनेचा तो प्रेरणास्रोत… विठ्ठलाच्या मंदिराची पायरी होण्याचे नामदेवांनी पसंत केले. प्रवेशद्वाराजवळची त्याची समाधी पाहिली. तत्कालीन समाजाने चोखोबांना धिःक्कारले. पण नामदेवांच्या प्रयत्नांमुळे विठोबाच्या मंदिराच्या आवारातच त्यांच्या समाधीला जागा मिळाली, हे पाहून नामदेवांविषयीचा आदर द्विगुणित झाला. तुकारामांनी तर लीन भावाने पंढरपूरची वारी कशासाठी हे सांगितले आहे. पांडुरंगाशी त्यांनी याविषयी संवाद साधलेला आहे ः
देवा होईन भिकारी| पंढरीचा वारकरी॥
हाचि माझा नेमधर्म| मुखीं विठ्ठलाचें नांव॥
हीच माझी उपासना| लागे संतांच्या चरणां॥
अहो तुका म्हणे जीवा| हेचि माझी भोळी सेवा॥
पंढरपूरची वारी ही वारकर्‍यांची महत्त्वाची आचारसंहिता. वारीला जाणे म्हणजे आवडत्या पांडुरंगाला उत्कटतेने भेटणे. सासरी गेलेल्या सासुरवाशिणीला जशी माहेराची ओढ तशी वारकरी भक्ताला पंढरपुराची ओढ. पंढरपूर हे वारकर्‍यांचे माहेर. विठ्ठल ही त्यांची माऊली. ती भक्ताला प्रेमपान्हा देते. मायेची पाखर घालते.
वारीला जाता आले नाही; तरी वारीचा महिमा काय असतो, वारी काय असू शकते याचा वाढत्या वयात मानसिक पातळीवर शोध घेण्याचा प्रयत्न करू लागलो.

महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात बर्‍याच वेळा पुण्याला थोरल्या बहिणीकडे मी जात-येत असे. आगगाडीने प्रवास करताना रंगीबेरंगी फेटे बांधलेले पुरुष आणि रंगीबेरंगी साड्या परिधान केलेल्या स्त्रिया दिसायच्या. त्यांच्या डोईवर तुलसीवृंदावन असायचे. निकटदर्शनाची अनुभूती जरी घेता आली नसली तरी ते रंगविभ्रमांचे विश्‍व पाहून डोळ्यांचे पारणे फिटायचे. स्त्री-पुरुष भक्तिभावाने, एकतानतेने आणि एकच ध्यासाने झपाझप पावले टाकत असत. दूरच्या माळरानावरील नागमोडी वाटांवरून जाताना त्यांच्या हालचाली लक्ष वेधून घ्यायच्या. त्या वाटांनीदेखील भक्तिरसाचा अबीरगुलाल धारण केल्याचे दृश्य दिसायचे. त्या वाटा चैतन्याने फुलून यायच्या. माणसांच्या अंतरंगातील एकरसात्मकता दुरून का होईना प्रत्ययास येत होती.

बालपणापासून आमच्या खेडेगावातील भजनी परंपरेमुळे ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग आणि तुकारामांचे अभंग कानी पडायचे. कोणे एके काळी अवर्षणाचा दुर्धर प्रसंग पंचक्रोशीवर कोसळला होता. तेव्हापासून श्रीमल्लिकार्जुन मंदिरात भजनी सप्ताह सुरू झाला. तेव्हापासून चालत आलेली भजनी सप्ताहाची परंपरा आजतागायत चालू आहे. त्या काळात ‘पार’ जागवणे ही आनंदाची अनुभूती असायची. त्या काळात मनोहरबुवा शिरगावकर, नरहरीबुवा वळवईकर यांसारखी नामवंत मंडळी यायची. त्या आठवणी आजही मनात कायम आहेत. नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, नरहरी सोनार, कान्होपात्रा, जनाबाई, मुक्ताई, एकनाथ इत्यादिकांच्या अभंगरचनेतील अंतःसूर कानी पडायचे. भक्तीच्या गोडव्याबरोबर शब्दांची सुलभता, माधुर्य आणि भावलावण्य यांमुळे चित्तवृत्ती प्रसन्न व्हायची. त्यांतही तुकारामांचे अभंग जवळचे वाटले. ते अत्यंत भावले. सारे काही कळत होते असे नाही. त्यांतील काही अभंग फार सोपे होते. लोकांच्या ओठांवर ते खेळत असत. नित्य जीवनव्यवहारातील अटीतटीच्या प्रसंगी कृषिजीवन जगणार्‍यांच्या तोंडून त्यांतील ओळी सहजतेने उद्धृत केल्या जायच्या. उदा. ‘आलिया भोगासी असावे सादर’, ‘लहानपण दे गा देवा| मुंगी साखरेचा रवा’, ‘आलें देवाचिया मना तेथें कोणाचें चालेना’ आणि ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ इत्यादी विठ्ठलभक्तीने ओथंबलेले अनेक अभंगही ऐकू येत असत. चोखोबा, जनाबाई यांची अभंगरचनाही आवडायची; ती केवळ शब्दसौष्ठवामुळे नव्हती. भोवतालच्या सामाजिक अन्यायाची, विषमतेची टोचणी मनाला लागायची. संवेदनक्षमतेचा काळ होता तो… अशा भिजलेल्या मनाच्या मातीत संतांच्या वचनातील विचारबीजे रुजून आली… एकीकडे शेतीची मशागत चालायची अन् दुसरीकडे मनाची मशागत….
संतांनी केवळ परमेश्‍वरावरील श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी अभंगरचना केलेली नसून हृदयाला होणार्‍या वेदना अभिव्यक्त करण्यासाठी, गळा मोकळा करण्यासाठी हे माध्यम निवडलेले असावे… अशाने मनानेदेखील मुक्त होता येते हे हळूहळू कळायला लागले. सुदैवाने हे सांगणारे शाळेत शिक्षक भेटले. विठ्ठलाची नेमाने वारी करणे म्हणजे सर्वांनी भेदाभेद विसरून चंद्रभागेच्या वाळवंटात समानतेच्या पातळीवर एकत्र येणे. त्यांच्या हातातील भक्तिभावनेची ध्वजा म्हणजे ‘आपण सारी माणसे एक’ या भावनेची एकात्म ध्वजा अधोरेखित करणारे हे तत्त्व… हा संस्कार मनात रुजला. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात प्रा. गं. बा. सरदार यांचे ‘संतवाङ्‌मयाची सामाजिक फलश्रुती’ हे पुस्तक हाती पडले आणि मग ः
देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी
तेणें मुक्ती चारी साधियल्या
या ओळी इतरांबरोबर तारस्वरात म्हणणार्‍या माझ्या अस्तित्वात नव्या विचारांची रुजवण झाली. ‘चार मुक्ती कोणत्या’ हे त्या वयात कळले नव्हते; आजही पुरतेपणी त्या उमगलेल्या नाहीत. इत्यर्थ एवढाच की, तो सर्वस्वी अनुभूतीचा प्रांत आहे. आपल्यासारख्या येरागबाळ्यांचे काम नोहे… पण संतांचे साहित्य हे टाळकुट्यांचे साहित्य नाही, त्यात केवळ परमार्थ नाही तर सामाजिक संघर्षाची बीजे आहेत. मानवधर्माचे आग्रही प्रतिपादन आहे. सर्वांच्या अभ्युदयाचे नितांत रमणीय स्वप्न आहे हे उमगत गेले. शेकडो वर्षांपासून चालत आलेली पंढरपूरची वारी ही आंधळेपणाने केलेली यात्रा नव्हे. सर्वांना कनवाळूपणाने वागविणारा विठ्ठल हे भक्तांचे सुखनिधान आहे. त्याची वेल्हाळ रूपे मनात साठवीत, टाळ-मृदंगांच्या साथीने, वीणा-चिपळ्यांच्या आणि पखवाजाच्या नादनिनादात पुढे पुढे सरकणारा भक्तगण…
पाऊले चालती पंढरीची वाट
या शब्दांचे ध्वनी आसमंतात उमटलेले…
पांडुरंग होण्या| पांडुरंग व्हावें
पांडुरंग धावे| पांडुरंगीं
अशी एकात्म होण्याची आस… प्रत्येक वारकरी स्वतःचा राहत नाही… भावयात्रेचा अविभाज्य घटक होतो… हीच ती अद्वैतानुभूती… जनतेमध्ये जनार्दन शोधणारी… या ‘ईश्‍वरनिष्ठांच्या मांदियाळी’ने मराठी मनाची जमीन नांगरली आहे.
डॉ. इरावती कर्वे यांच्यासारख्या बुद्धिप्रामाण्यवादी, प्रज्ञावंत विदुषीला वारीचे स्वरूप विलोभनीय वाटले. ‘परिपूर्ती’मधील त्यांचा ललित निबंध त्यांच्या वारीशी समरस झालेल्या मनाचे उत्कट दर्शन घडवितो.
नव्या युगात भक्तिगाथेला संजीवन देणारी वारी मला अशी भावते!