वादळी वार्‍यामुळे वास्कोत पसरली कोळशाची भुकटी

0
93

ओखी चक्रीवादळाने गोव्याच्या किनारपट्टीला काल धडक दिली. अचानक आलेल्या वादळी वार्‍याने समुद्राला उधाण आले व वास्को शहराला या वादळी वार्‍यामुळे कोळसा प्रदूषणाचा तडाखा बसला. जोरदार वार्‍यामुळे सर्व घरांमध्ये कोळसाच कोळसा झाला.

काल संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वार्‍याने सर्व लोक भयभीत झाले. या वार्‍यामुळे केरकचरा लोकांच्या घरादारात घुसला. तसेच येथील मुरगाव बंदरातील कोळसा हवेत मिसळून सर्व वास्को शहरात विखुरला गेल्याने सर्वांच्या घरात. दुकानात आस्थापनात कोळसाच कोळसा झाला. जमिनीवरील लाद्या, टेबल, खुर्च्या सर्व काळ्या धुळीने माखल्या होत्या. अर्धातास ह्या वादळीवार्‍याने थैमान घातले. दरम्यान पाण्याची पातळी अचानक वाढल्याने काटे बायणा येथील सीआरझेडच्या विळख्यात असलेल्या बेकायदेशीर घरांना धोका निर्माण झाला आहे. कालपासून वारंवार पाण्याच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे येथील किनारी भागाची धूप झाली होती.

त्यामुळे येथील घरांच्या पायथ्यांशी असलेली वाळू सरकत असल्याने सदर घरे धोक्यात आहेत. दरम्यान या ओखी चक्रीवादळाचा तामिळनाडू, केरळ या राज्यातील शेकडो मच्छिमार व्यावसायिकांनी आपले ट्रॉलर्स व बोटी सुरक्षेच्या कारणास्तव गोव्यातील विविध मच्छिमारी जेटीवर आणून नांगरून ठेवल्या आहेत. वास्कोत खारीवाडा येथेही सदर राज्यातील ट्रॉलर्स नांगरण्यात आले आहेत. यातून परराज्यातील या टॉलरवर काम करणारेही उतरले आहेत. काल रात्रीपासून परराज्यातील मच्छिमार ट्रॉलर वास्को खारीवाडा जेटीवर येत असल्याची माहिती मिळताच वास्को पोलिस, सागरी पोलिस व तटरक्षक अधिकारी जेटीवर पोचले. वास्को पोलिसांनी या मच्छिमार ट्रॉलर व त्यावरील कामगारांची माहिती गोळा करण्याचे सोपस्कार पूर्ण केले.