वाढते आव्हान

0
197

इटलीतील मिलानहून आलेल्या तीन खास विमानांतून ४१७ दर्यावर्दी अखेर थेट दाबोळी विमानतळावर उतरले. इटलीच्या कॉस्ता क्रुझेस या नावाजलेल्या शिपिंग कंपनीचे हे सगळे कर्मचारी आहेत. इटलीमध्ये या कंपनीची जवळजवळ पंधरा – सोळा आलिशान जहाजे आहेत. गेल्या मार्चपासून येत्या ३० जूनपर्यंत ही सगळी जहाजे बंद ठेवण्यात आली असल्याने कंपनीने या आपल्या कर्मचार्‍यांची आस्थापूर्वक परत पाठवणी केली आहे. त्यांच्या गोव्यातील विलगीकरणाची सोयही त्या कंपनीनेच करून व्यावसायिकतेचा आगळा आदर्श घालून दिला आहे. दर्यावर्दींची संघटना मात्र गोव्यात आलेल्या आणि येऊ घातलेल्या सगळ्या खलाशांचा खर्च सरकारने उचलावा, त्यांचा विलगीकरणाचा काळ कमी करावा म्हणून राजकारण्यांच्या गाठीभेटी घेत सुटली आहे. अर्थात, यासंबंधी आमची भूमिका आम्ही यापूर्वी मांडलीच आहे.
गोव्यात आलेले आणि येणार असलेले हे खलाशी, विदेशांत विखुरलेले आणि कोरोनामुळे नोकर्‍या गमावलेले गोमंतकीय, यांच्याबरोबरच आता रेल्वे आणि विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याची तयारी केंद्र सरकारने चालवली असल्याने येणार्‍या काळात गोव्यात कोरोना रुग्णांची ही आयात वाढत गेली तर आश्चर्य वाटून घेऊ नये.
रेल्वेने येत्या एक जूनपासून प्रवासी रेलगाड्या सुरू करण्याची जय्यत तयारी केली आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या गाड्यांच्या नामावलीमध्ये वास्को निजामुद्दिन गोवा एक्स्प्रेस, निझामुद्दिन – एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस, मुंबई – थिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस, निझामुद्दिन – एर्नाकुलम दुरोन्तो वगैरे वगैरे गोवामार्गे जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्याही आहेत. म्हणजेच अजूनही कोरोनाग्रस्त असलेल्या दिल्ली, मुंबईसारख्या लाल विभागांतून रोज शेकडो प्रवासी गोव्यामध्ये येणार्‍या काळात उतरत राहतील. येत्या पंचवीस मे पासून केंद्र सरकार देशांतर्गत विमानसेवाही सुरू करते आहे. दाबोळी विमानतळावर हे देशी प्रवाशीही उतरतील. या सर्वांसाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत व त्यानुसार सर्वांची तपासणी, विलगीकरण वगैरे प्रक्रिया जरी होणार असली, तरी गोमंतकीयांच्या मनामध्ये धास्ती निर्माण करणारा येणारा काळ आहे हेही तितकेच खरे आहे.
वाढत्या रुग्णसंख्येला सामोरे जाण्याएवढी सज्जता आपल्यापाशी खरोखर आहे का हा गंभीर प्रश्न आहे. कोविड रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवत वाढवत १७० पर्यंत नेण्यात आली. गरज भासल्यास खासगी इस्पितळेही ताब्यात घेण्याची सरकारची तयारी आहे, परंतु याचा अर्थ रेल्वे आणि विमानांतून कोरोना रुग्णांच्या झुंडीच्या झुंडी गोव्यात उतरत राहाव्यात असा नाही. केवळ देशाच्या विविध भागांत अडकून पडलेल्या गोमंतकीयांना माघारी आणण्यापुरतीच ही सेवा असती तर त्याला आक्षेप असण्याचे काही कारण नव्हते, परंतु इतर कोरोनाग्रस्त प्रांतांतील मंडळींना गोव्यात येऊन मौजमजा करण्याची इच्छा जरी असली आणि पर्यटन पुन्हा सुरू करण्यास काही मंत्रिमहोदय भलतेच उत्सुक जरी असले, तरी त्यासाठी अद्याप योग्य वेळ आलेली नाही.
अभिनेत्री पूजा बेदी आपल्या प्रियकरासोबत गोव्यात घुसली आणि वर गोव्यातील विलगीकरणाची सोय कशी वाईट आहे त्यावर समाजमाध्यमांवर अकांडतांडवही केले. अशा प्रवृत्तीला विद्यमान परिस्थितीत अटकाव होणे जरूरी आहे. शेवटी चौदा लाख गोमंतकीय जनतेच्या प्राणांनाही काही मोल आहे. बाहेरून रुग्ण ओतत राहून जनतेचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार केंद्र सरकारलाही नाही आणि राज्य सरकारलाही.
राज्यातील रुग्णसंख्येबाबतचा सावळागोंधळ अखेर आम्ही फटकार लगावल्यानंतर संपुष्टात आला. आता रोज संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची गोमेकॉतील आरटीपीसीआर तपासणीत दुजोरा मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या आरोग्य खाते जाहीर करू लागले आहे. आरोग्यसेतू ऍप आणि आरोग्य खात्याची आकडेवारी यातील तफावतही दूर करण्यात आली आहे. ट्रूनॅट स्क्रिनिंगमधील वास्तव रुग्णसंख्या आरोग्यमंत्री ट्वीटरवरून जाहीर करीत आले होते, परंतु गोमेकॉतील आरटीपीसीआर चाचणीत त्याला दुजोरा होईस्तोवर त्यांना कोरोना रुग्ण मानण्यात येत नाही. तसा केंद्र सरकारचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे आरोग्य खात्याची आकडेवारी हीच अधिकृत आकडेवारी मानणे भाग आहे. परंतु रोज शेकडो अहवाल तपासणीसाठी गेलेले असतात आणि शेकडो संशयित संस्थात्मक विलगीकरणात राहात आहेत हेही विसरता येत नाही. त्यामुळे आरोग्य खात्याच्या मीडिया बुलेटूीनमधील सर्वांत खालच्या भागात दिलेली कोविड रुग्णालयातील रुग्णांची संख्या, इस्पितळातील विलगीकरणातील संशयित रुग्णांची संख्या, विविध हॉटेलांतील संस्थात्मक विलगीकरणाखालील व्यक्तींची संख्या या सगळ्याकडे पाहिले तर रुग्णांचे प्रमाण बरेच वाढणार आहे याचे अनुमान काढता येते. राज्यातील विविध हॉटेलांतच बुधवार संध्याकाळपर्यंत तब्बल ७७७ लोकांना ठेवण्यात आलेले आहे. गेल्या महिन्याभरात जवळजवळ तीन हजारांहून अधिक लोक सीमांवरून रस्तामार्गे गोव्यात प्रवेशले आहेत. आता त्यामध्ये रेल्वे आणि विमान प्रवाशांची भर पडत जाणार आहे. या सगळ्याला सामोरे जाणे आणि तेही कोरोनासारख्या अत्यंत किचकट प्रकारच्या आणि गनिमी काव्याच्या विषाणूला सामोरे जाणे मुळीच सोपे नाही. गोव्याच्या कोविड इस्पितळात आतापर्यंत चाळीस आयसीयू बेड्‌स आणि १३० प्राणवायूयुक्त बेड्‌स आहेत व फक्त सोळा व्हेंटिलेटर आहेत असे सरकारनेच सांगितले आहे. राज्यभरात मिळून दोनशेच्या आसपास व्हेंटिलेटर आहेत. सरकारने मागवलेले २०० व्हेंटिलेटर पंचवीस पंचवीसच्या हप्त्यांनी यायचे आहेत. ही आरोग्यविषयक तयारी कोलमडू नये यासाठी गोव्यात प्रवेशणार्‍या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणे आत्यंतिक गरजेचे आहे. कोरोनाच्या सर्वच रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत नाहीत हे जरी खरे असले, तरीही रुग्णांची वाढत चाललेली संख्या जनतेला भयभीत करणारी आहे. गोव्यात येऊ घातलेेले अठरा ते वीस हजार विदेशस्थ गोमंतकीय, दर्यावर्दी, रेल्वे विमानांतून, रस्तामार्गे येणारे प्रवासी आणि त्याच बरोबर होम क्वारंटाईनखाली असलेले व आधी निगेटीव्ह चाचण्या येऊन नंतर कोरोनाबाधित सिद्ध होऊ शकणारे या सर्वांचा विचार करता त्यादृष्टीने अधिक मोठ्या प्रमाणावर तयारी ठेवणे आता निकडीचे असेल.