वाघ याचे उत्तर देतील का?

0
122

– राजीव कामत, खोर्ली म्हापसा
दि. १८ नोव्हेंबरच्या दै. नवप्रभात ‘वाचकीय’ सदरात विष्णू सूर्या वाघ यांचा ‘आता मी स्वतंत्र व्हायचे ठरवले आहे’ हा लेख वाचला. वाघांनी या लेखात ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, त्यांच्या सत्यतेबाबत माझ्याच कशाला, कुणाच्याही मनात शंका असू नये. प्रतिभा आणि बुद्धिमत्ता यांना राजकारणात काडीचेही स्थान नाही, हुशार असणे हा राजकारणातला अवगुण आहे. या त्यांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. किंबहुना तुमच्या अंगात जर निर्लज्जपणा व कोडगेपणा मुरलेला असेल, तरच तुम्ही राजकारणाच्या क्षेत्रात पडावे. अशी माझी ठाम भावना आहे. या विषयावर मी एक स्वतंत्र लेख लिहीनच. असो.विष्णू सूर्या वाघ यांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास विधानसभेत निवडून गेलेल्या ४० आमदारांमध्ये त्यांच्यासारखे चतुरस्त्र व्यक्तीमत्व दुसरे नाही. साहित्याच्या क्षेत्रात तर त्यांच्या जवळही पोचणारा दुसरा साहित्यिक शोधावा लागेल, अशी स्थिती आहे. त्यांची हल्लीच विधानसभेच्या कामकाजावर रविवारच्या नवप्रभेत प्रसिद्ध झालेली लेखमाला तर संग्राह्य अशीच आहे. विधानसभेच्या विविध विषयांचे बारकावे त्यांनी जनतेसमोर हळुवारपणे उघडून खरोखरच त्यांच्या अंतरांत ज्ञानदिवा पेटवला. त्यामुळे विधानसभेतील खरे ‘सारस्वत’ असेच मी त्यांना मानतो. तरीपण या राजकारणाच्या क्षेत्रात ते कायम उपेक्षित का राहिले याची कारणे शोधायचा मी प्रयत्न करणार नाही, पण या अस्थिरतेमुळे त्यांनी गोव्यातील किती राजकीय पक्षांतून विहार केला आहे हे शोधणे खरोखरच मनोरंजक ठरेल.
त्यांचा भाजपा प्रवेश हा मुख्यत्वे भाषामाध्यम या विषयावरूनच झाला. कॉंग्रेसचे तेव्हाचे ते प्रमुख प्रवक्ते असून सुद्धा त्यांनी आपल्याच पक्षाला भाषा माध्यम व अनुदान या विषयांवरून ललकारण्याचे धाडस केले. त्याचवेळी सत्तेवर येण्यासाठी धडपडणार्‍या मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखालील चाणाक्ष भाजपा नेत्यांनी त्यांची ही वृत्ती हेरून त्यांना आपल्या पक्षात ओढून घेतले. भाषा माध्यम प्रश्‍नी आक्रमक विरोधी भूमिका घेऊन त्यांनी गोव्याच्या विविध दैवतांना गार्‍हाणी घालून हा प्रश्‍न तापवला. त्यामुळे त्यांना भाजपातर्फे सांत आंद्रे या कॉंग्रेसी बालेकिल्ल्यात विधानसभेत उमेदवारी मिळाली. अटकळ अशी होती की, ते तिथे हमखास आपटणार. पण मोठ्या हिंमतीने त्यांनी हा कॉंग्रेसचा अभेद्य असा गड सर करून अप्रत्यक्षरीत्या आपली मंत्रिमंडळातील जागा पक्की केली. त्यांनी तसे जाहीरपणे बोलूनही दाखवले. पण त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास प्रतिभा, बुद्धिमत्ता व हुशारी या गोष्टींना बाजूला सारून त्यांच्या आकांक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. पण त्याचवेळी पक्षात दुफळी माजू नये म्हणून त्यांना कला अकादमीचे अध्यक्षपद व मनोरंजन सोसायटीचें उपाध्यक्षपद दिले गेले. पण ते म्हणतात तसे तिथे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळालेच नाही. त्यामुळे त्यांची सत्तेसाठी घुसमट चालूच होती.
भाषा माध्यम प्रश्‍न पुढे करून निवडून आलेल्या पर्रीकरांनी नंतर त्या विषयावरून ‘यू टर्न’ घेतला आणि भारतीय सुरक्षा मंचाचे जे पदाधिकारी होते, त्यांना वाघ म्हणतात तसे खरोखरच अधिकारांची हाडे फेकून गुलाम बनवण्यात आले. इतर कार्यकर्त्यांनी पायांत शेपट्या घातल्या. वाघ म्हणतात की त्यांनी एकट्याने या बाबतीत डरकाळी फोडली. पण कधी? सत्ता मिळविण्याचे अनेक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा काहीही साध्य झाले नाही, तेव्हाच ना? भाषा माध्यम धोरण जाहीर झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी जर ही डरकाळी फोडली असती, तर ते जास्त सयुक्तिक ठरले असते. त्यांच्यावर झालेला हल्ला, त्यांना कला अकादमी व मनोरंजन सोसायटीच्या पदावरून पायउतार करणे या गोष्टींवर पुष्कळ उहापोह झाला असल्यामुळे त्यावर लिहिण्यास मला अजिबातच रस नाही. पण वाघांच्या बाबतीत मला आलेला एक अनुभव सांगण्याचा मोह आवरत नाही.
भाजपा सरकार सत्तेवर येऊन जेव्हा वाघांना कला अकादमीच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले, तेव्हा लोकांनी विशेषतः कलाकारांन एक जल्लोष केला. आता आपले प्रश्‍न चुटकीसरशी सोडवले जातील याची त्यांना खात्री वाटायला लागली. आणि कला अकादमीत ‘सहाय्यक हार्मोनियम वादक’ हवा अशी जाहिरात एके दिवशी वृत्तपत्रात झळकली. माझा एक स्नेही, ज्याने हार्मोनियम या वाद्यात प्राविण्य मिळविले आहे, (तो कोल्हापूर विद्यापीठाचा एमपीए- मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्टस् व पुण्याच्या एका संस्थेचा ‘संगीत अलंकार’ असा पदवीधर आहे.) त्याने मला विचारून त्या पदासाठी अर्ज दाखल केला. आमच्या महान देशात एक गोष्ट नेहमी घडताना दिसते. तुम्ही कितीही शिकलेले असा, एखाद्या पदाला कितीही लायक व पात्र असा जर तुमचा वशिला नसेल तर तुम्हाला कोणीही विचारत सुद्धा नाही. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री फ्रान्सीस डिसोझा व विष्णू सूर्या वाघ यांना भेटून या बाबतीत मदत करण्याची विनंती केली. वशिलेबाजी नव्हे तर त्याची पूर्ण गुणवत्ता तपासून त्याला घ्या, अशी मी त्यांच्याकडे विनंती केली. त्या कलाकाराची मुलाखतसुद्धा व्यवस्थितपणे पार पडली व अनधिकृतपणे तीनपैकी दोन परीक्षकांनी त्या मुलाचे तो नंबर १ वर असल्याने अभिनंदन केले. १६ जुलै २०१२ हा दिवस मला आठवतो. (कारण १७ जुलै हा माझा वाढदिवस आहे.) रात्री १० वाजता मला एका अन्य मित्राचा फोन आला,‘डॉक्टर, त्या सहाय्यक हार्मोनियम वादक या पदावर दुसर्‍या एका मुलाची निवड झाली आहे.’ दुसर्‍या दिवशी सकाळी मी म्हापसा येथे उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटलो असता त्यांनी मला ११.३० वा. विधानसभेत त्या उमेदवाराला घेऊन यायला सांगितले. विधानसभेचे अधिवेशन चालू होते व विष्णू वाघ आत सभागृहात बसले होते. उपमुख्यमंत्र्यांनी वाघांना बाहेर अभ्यागत कक्षात बोलावून माझ्याशी बोलण्यास सांगितले. मी सरळ त्यांना माझा उमेदवार पूर्ण लायक असूनसुद्धा त्याला का डावलण्यात आले याचे कारण विचारले. विष्णू वाघांनी ‘लोकसंस्थेच्या पवित्र मंदिरात’ उभे राहून मला याचे कारण सांगण्याचा केविलवणा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या उमेदवाराची पात्रता इतकी उत्तुंग होती की, हा हुद्दा त्याच्यासाठी अगदीच छोटा व नगण्य असल्यामुळे तो या पदावर सडण्याची त्यांना भीती वाटत होती! त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मला असेही सांगितले की ‘डॉक्टर, मला तुम्ही फक्त तीन महिन्यांचा अवधी द्या. मी या मुलाला अशा जागेवर नेऊन बसवेन की ज्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल. हा या वाघाचा तुम्हाला दिलेला शब्द आहे.’ त्यावर मी त्या दिवशी माझा वाढदिवस असल्याने मी त्यांचे हे आश्‍वासन म्हणजे माझ्या वाढदिवसाची भेट असे मी समजतो, असे सूतोवाच केले. अडीच वर्षे झाली, अजूनपर्यंत त्यांचे हे आश्‍वासन अन्य कुठल्याही राजकारणाच्या आश्‍वासनांसारखेच अधांतरित राहिले आहे.
हे सर्व लिहिण्याचे कारण वाघांना कुठल्याही बाबतीत कमी लेखण्याचे नाही, पण त्यांच्या म्हण्याप्रमाणे त्यांनी कला अकादमीच्या विविध स्पर्धांच्या बक्षिसांच्या रकमेत भरघोस वाढ करून कलाकारांना प्रोत्साहित केले. पण आता त्यांचे हे वर्तन म्हणजे ‘आयजीच्या नावावर बायजी उदार’ किंवा कोकणीत ‘मेजावयलें केळें काडून फिर्याद जोडतां’ या उक्तीनुसार स्वतःचे कलाकारांप्रती महत्त्व वाढवण्यासाठी सरकारी पैशांची उधळपट्टी असावी असा संशय येतो. कारण स्वतःवर अन्याय होतो याचा वेळोवेळी डंका पिटणारा एक महान साहित्यिक व कलाकार एका लायक व गरीब मुलाला हे सरकारी पद प्राप्त करण्यापासून रोखून नक्की काय संदेश देऊ पाहतो, कळत नाही. या घटनेवरची वाघांची प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे.