वाघ मृत्यूप्रकरणी संशयितांची सशर्त जामीनावर सुटका

0
131

गोळावली-सत्तरी येथील चार वाघांच्या मृत्यूप्रकरणी अटक झालेल्या चार संशयितांची काल येथील सत्र न्यायालयाने सशर्त जामीनावर सुटका केली.
या प्रकरणी अटक झालेले गोळावली येथील मालो पावणे, विठो पावणे, ज्योतिबा पावणे व भिरो पावणे यांना सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.
काल याप्रकरणी सुनावणी झाली. संशयितांतर्फे यावेळी ऍड. यशवंत गावस यांनी बाजू मांडली. संशयितांना प्रत्येकी १५ हजार रु. च्या वैयक्तिक जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र त्यांना दररोज सकाळी ९ ते दु. १ व दु. ३ ते संध्या. ५ वा. या वेळेत वन कार्यालयात उपस्थित राहण्याची अट घालण्यात आली आहे.

चार वाघांचा मृत्यू एका पाठोपाठ उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर गेले होते. त्यानंतर केंद्रीय वन मंत्रालयाने खास पथक पाठवून या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. या तपास पथकाने सर्व माहिती मिळवून या संदर्भातील अहवाल केंद्रीय मंत्रालयाला सादर केला आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या तपास पथकात राजेंद्र गरवाड व अय्या मल्ल्या या अधिकार्‍यांचा समावेश होता. त्यांनी वन खात्याचे डीसीएफ विकास देसाई यांच्याशी चर्चा करून तपासकाम केले.
दरम्यान, सत्तरी भूमीपुत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल येथे आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांनी म्हादई अभयारण्याच्या परिसरातील नागरिकांची व्यथा सांगितली व न्याय देण्याची मागणी केली.

वाघ मृत्यू ः प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप नाही

म्हादई अभयारण्यातील गोळावली सत्तरी येथील वाघ मृत्यूप्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल अद्यापपर्यंत मिळालेला नाही. चार वाघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गोळावली येथे सर्वांत प्रथम मृतावस्थेत आढळून आलेल्या वाघाच्या पोटातील काही अवयव तपासणीसाठी डेहराडून येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. तपासणी अहवालानंतर वाघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. आठ दिवसात तपासणी अहवाल प्राप्त होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापि, दहा दिवसांपेक्षा काळ लोटला तरी अद्यापपर्यंत तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.