वाघाच्या हल्ल्यात गुरे दगावलेल्यांना सरकारची मदत

0
122

>> मुख्यमंत्री मदत निधीतून दोन कुटुंबांना दिले प्रत्येकी १५ हजार रु. चे धनादेश

राज्यातील अभयारण्यातील वाघाच्या हल्ल्यामुळे पशुधन गमावलेल्या व्यक्तींना अडचणीच्या वेळी मदत देण्यासाठी सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांना काल देण्यात आली.
या निर्णयानुसार मुख्यमंत्री मदत निधीतून काल गोळावली-सत्तरी येथील वाघांनी गुरे मारलेल्या विठो पावणे व लाखो जाधव यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रु. चे धनादेश देण्यात आले.

राज्यपाल मलिक यांनी म्हादई अभयारण्यातील चार वाघांच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल रॉय, मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी राज्यपाल मलिक यांची भेट घेऊन म्हादई अभयारण्यातील चार वाघांच्या मृत्यू प्रकरणी सविस्तर माहिती काल दिली.
म्हादई अभयारण्यातील वाघीण व तीन बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रोटोकॉल विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यपाल मलिक यांना दिली. तसेच या व्यतिरिक्त, वाघ संरक्षण आणि संवर्धन उपाय आणि मानवी आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हाती घेण्यात येणार्‍या विविध उपाय योजनांची माहिती देण्यात आली आहे.

दोन कुटुंबांना मुख्यमंत्री
निधीतून दिली मदत
म्हादई अभयारण्यात गोळावली-सत्तरी येथे वाघाने हल्ला केल्याने गाय मृत्युमुखी पडलेल्या विठो पावणे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून १५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य काल देण्यात आले. उपवनपाल कुलदीप शर्मा यांनी पावणे यांच्या कुटुंबीयाकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी ठाणे डोंगुर्ली पंचायतीच्या सरपंच प्रचिती गावस व इतरांची उपस्थिती होती. उपवनपाल शर्मा यांनी विठो पावणे यांच्या वृद्ध आईच्या तब्येतीची विचारपूसही केली. त्याच बरोबर वाघाच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडलेल्या लाखो फटी जाधव याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे पशुधन गमावलेल्या कुंटुबियांना आवश्यक आर्थिक साहाय्याचे वितरण एका आठवड्यात केले जाणार आहे, अशी माहिती उपवनपाल शर्मा यांनी दिली.