वाघांच्या मृत्युप्रकरणी संशयितांची कबुली

0
154

>> विषप्रयोग केल्याचे मान्य, चौघांचा सहभाग

म्हादई अभयारण्यातील चार वाघांच्या हत्याप्रकरणी वनखात्याने अटक केलेल्या संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मृत वाघ, वाघीण पुरण्यात आलेली जागा दाखविली आहे. वनखात्याच्या तपास अधिकार्‍याने संशयितांना घटनास्थळी नेऊन जागेचा पंचनामा काल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखीन एका संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाने वाघ मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केलेले दोन सदस्यीय पथक शुक्रवारी गोव्यात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

म्हादई अभयारण्यातील वाघांची हत्या प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारी यंत्रणेवर टीका केली जात आहे. वन खात्याच्या तपास अधिकार्‍याने गुरूवारी संशयितांना गोळावली येथे नेऊन वाघ, वाघीण पुरण्यात आलेल्या जागांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच कशा प्रकारे पुरण्यात आले याबाबत माहिती जाणून घेतली. वाघांना पुरण्याच्या कामात एकूण चारजण सहभागी झाल्याची माहिती नावासह संशयिताने तपास अधिकार्‍याला दिली आहे. मृतावस्थेत आढळून आलेल्या चौथ्या वाघाचे शवविच्छेदन काल करण्यात आले.

वाघाच्या अवयवांच्या तस्करीसाठी वाघाच्या हत्येबाबत अद्याप काहीच धागेदोरे सापडले नाहीत. धनगर कुटुंबातील एकाच्या म्हशीची वाघाने शिकार केल्याने मृत म्हशीवर विष ओतण्यात आल्याची माहिती जबानीमध्ये देण्यात आली. वाघांचा विषबाधेने मृत्यूबाबत न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल अद्यापर्यंत प्राप्त झालेला नाही, अशी माहिती वनखात्याच्या अधिकार्‍यांनी दिली.