वाईट प्रवृत्तींवर वार करणारा ः ‘वारकरी’

0
150

– ओंकार व्यंकटेश कुलकर्णी (खडपाबांध-फोंडा)

‘कुणाही जिवाचा न घडावा मत्सर’…
हे भाव तुकोबांच्या मनात होते, म्हणून ते व त्यांचे अभंग अमर झालेत. इथे तर फक्त द्वेषभावनाच दिसते. म्हणून यांच्या साहित्याला पारंपरिक भजन-कीर्तनात थारा नाही. या असल्या ‘वादी’ लोकांना हे वारकरीच एक दिवस योग्य ती जागा दाखवतील. तोपर्यंत ‘‘जोहार, मायबाप!’’

आषाढ महिना म्हटले की आषाढ सरींचे व पंढरीच्या वारीचे विचार अनागतपणे आपल्या मनात येतात. डोक्यावर तुळस घेऊन, टाळ-मृदंगाच्या नादात, हातात पताका घेऊन हरिनामाचा गजर करत लयबद्ध चालणारा वारकरी डोळ्यासमोर येतो.

वारकरी या शब्दाचे विभाजन केले तर ‘वार’ आणि ‘करी’ हे दोन वेगळे शब्द तयार होतात. समाजातील वाईट प्रवृत्तींवर ‘वार करणारा’ म्हणजे वारकरी असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
‘नाठाळाचे माथी हाणू काठी’, म्हणणार्‍या तुकोबांनादेखील हाच अर्थ अभिप्रेत असावा कदाचित.

वारकरी संप्रदायाची स्थापना ज्ञानोबांनी केली असं म्हणतात. साधारण १२-१३ व्या शतकातील काळ. परकीय, खास करून मुघल आपल्यावर वारंवार आक्रमण करत होते. त्यांचा विरोध करण्याच्या ऐवजी आपला समाज जात-पात यामध्येच अडकला होता, विखुरला गेला होता (आज तरी कुठे एकत्र आहे म्हणा! छत्रपतींच्या राज्यसभेच्या नियुक्तीचा लखोटा फडणवीस घेऊन गेले आणि इथे पवार साहेबांनी लगेच ‘जात’ वर काढली). या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्याचे काम या संप्रदायाने केले. (पवार साहेबांनी एकदातरी वारी करावी).

‘‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम, अमंगळ ॥

हेच ब्रीद गेली ८०० वर्षे हा संप्रदाय जपत आला आहे. चंद्रभागेच्या तीरावर सगळेच एकामेकांच्या पाया पडतात. धर्माचे, जातीपातीचे, वयाचे बंधन नसतेच कधी इथे!

या वारकर्‍यांच्या गळ्यांत तुळशीची माळ असते. एकदा का ती माळ गळ्यांत पडली की ती त्या वारकर्‍यासोबतच वैकुठास जाते. वारी करत असताना हे वारकरी अनेक ठिकाणी रिंगण सोहळे करतात. माऊलीच्या घोड्यामागे गोल रिंगणात शर्यत लावतात. पण या शर्यतीचे वैशिष्ट्य असे की इथे सगळेच जिंकतात. पुढं काही दिवसांनी आषाढी एकादशी होते आणि हे वारकरी पुढचे ४-५ महिने शेतीच्या कामाला लागतात… ते थेट कार्तिकी एकादशी येईपर्यंत!

सामाजिक एकोप्यासोबतच या वारकरी संप्रदायानं आपल्याला भरभरून दिलं ते म्हणजे ‘संत वाङ्‌मय’! कितीतरी संतकवी या संप्रदायाने जन्मास घातले. पुढची हजारो वर्षं संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करतील असं साहित्य आपल्याकडे आहे. ‘‘हे विश्वची माझे घर’’ म्हणणारे संत आपल्याकडे होऊन गेलेत. ‘ग्लोबलायझेशन’च्या गप्पा आपण हल्लीच सुरू केल्या, पण कोणत्याही धर्माचा व देवाचा उल्लेख न करता विश्‍वशांतीसाठी, विश्‍वकल्याणासाठी ८०० वर्षांपूर्वीच ज्ञानोबांनी पसायदान लिहून ठेवले आहे.
दुष्काळग्रस्त भुकेल्या जनतेला धान्याची कोठारं उघडून देणारे दामाजीपंतांचे विचार आपल्याकडे आहेत. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी…’ म्हणून निसर्गाशी सोयरिक जोडणारे तुकोबा आपल्याकडे आहेत.

‘‘जे का रंजले गांजले | त्यासी म्हणजे जो आपुले |
तोचि साधु ओळखावा | देव तेथेचि जाणावा ॥

असं म्हणून समाजातील गोर-गरिबांशी नातं जोडणारे संस्कार हा वारकरी आपल्यावर करतो. इतकंच काय तर ‘‘अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे…’’ म्हणणारे आपले सोहिरोबानाथदेखील याच पंगतीतले म्हटल्यास चूक ठरणार नाही.
ख्रिस्त पुराणाच्या सुरुवातीलाच…

‘‘जैसी हरळांमाजी रत्नकिळा |
कि रत्नामाजी हिरा निळा |
तैसी भासामधी भासा चोखळा |
भासा मराठी ॥

मराठीची थोरवी गाणारे फा. थोमस स्टिफन्स सुद्धा लिहून गेले.
ख्रिस्त पुराणात पुढे ‘‘येसू जातो ‘‘वैकुंठासी’’| रडू आले मरियेसी’’ असा उल्लेख करतात. ‘वैकुंठच’ म्हणावं असं का बरं वाटलं असेल त्यांना?… कारण कुठे ना कुठेतरी आपणही त्या परंपरेशी जोडलो गेलो आहोत… हे त्यांनादेखील कळलं असावं बहुतेक!!
जो कधीही भंग पावत नाही तो ‘अभंग’! अनंत काळापर्यंत गोडी टिकून राहणारे अभंग आज आपल्याकडे आहेत. या संतांनी, वारकर्‍यांनी त्यांची श्रद्धा, तपश्चर्या यांच्या बळावरच या अभंगांची रचना केली आहे.
गोव्यातील कोणत्याही गावात जा, अगदी पेडण्यापासून कोणकोणापर्यंत… हे अभंग गाऊन तल्लीन होणारी भजनी मंडळे दिसतील. ‘ज्ञानोबा माऊली’च्या गजरात अवघे आसमंत दुमदुमून टाकणारी दिंडी पथकं आपल्याला दिसतील. जोपर्यंत हे लोक गोव्यात आहेत तोपर्यंत आपल्या संस्कृतीला कोणत्याही परकीय शक्ती हरवू शकणार नाहीत.
पण हल्ली नजीकच्या काळात स्वकियांपासूनच या संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे असे जाणवते. अभंग लेखनाच्या कार्यशाळा भरविण्यात येतात. अभंग लेखन? .. बापरे..! तेवढी तपश्चर्या, तितकी श्रद्धा असलेले कोण बरे हे लोक? हं… भक्तिगीत लिहिण्यापर्यंत काहींची मजल पोहोचू शकते. कशासाठी हा अट्टाहास? पारंपरिक अभंग सोडून का तुमचे अभंग आम्ही म्हणायचे? कुठलातरी घाणेरडा ‘वाद’ अजूनही यांच्या मनामध्ये जिवंत आहे.
‘कुणाही जिवाचा न घडावा मत्सर’…
हे भाव तुकोबांच्या मनात होते, म्हणून ते व त्यांचे अभंग अमर झालेत. इथे तर फक्त द्वेषभावनाच दिसते. म्हणून यांच्या साहित्याला पारंपरिक भजन-कीर्तनात थारा नाही. या असल्या ‘वादी’ लोकांना हे वारकरीच एक दिवस योग्य ती जागा दाखवतील. तोपर्यंत ‘‘जोहार, मायबाप!’’