वर्षभरात सर्व मार्गांवर सीसीटीव्ही ः वाहतूकमंत्री

0
94

वर्षभरात राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्हा रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा वाहतूक खात्याचा विचार आहे, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रीय महामार्गांवर कॅमेरे बसवण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार असून ती मिळाल्यानंतरच राष्ट्रीय महामार्गांवर हे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील रस्त्यांवर हे कॅमेरे बसवल्यानंतर वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांवर लक्ष ठेवणे सोपे होणार असल्याचे ते म्हणाले. वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांना दंड ठोठावून वाहतुकीत शिस्त व सुसूत्रता आणणे व पर्यायाने रस्ता अपघातांची संख्या खाली आणणे या उद्देशाने हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय खात्याने घेतला असल्याचे ढवळीकर यांनी नमूद केले.
लवकरच दोन इंटरसेप्टर वाहने
रस्त्यांवर अतिवेगाने वाहने हाकणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच दोन इंटरसेप्टर वाहने खरेदी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यातील रस्ते खूपच चांगले असल्याचा दावा त्यांनी एका प्रश्‍नावर केला. गोव्यातील प्रमुख रस्ते हे हॉटमिक्स असून रुंद असल्याचे ते म्हणाले.