वन कार्यालयावर कॉंग्रेसचा मोर्चा

0
127

वाघांच्या हत्येच्या निषेधार्थ काल विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील वनखात्याच्या कार्यालयात मोर्चा नेला व अतिरिक्त विशेष मुख्य वनपाल संतोष कुमार यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन घेराव घालून वाघांच्या हत्येच्या प्रश्‍नांवरून त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला.

कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, संकल्प आमोणकर, महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, लालन पार्सेकर आदी पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळी ४ वाजता येथील वनखात्याच्या कार्यालयात मोर्चा नेला व वनखात्याच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. कुमार यांना वाघाच हत्येवरून विवध प्रश्‍न विचारले. यावेळी कुमार यांनी त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, कॉंग्रेसचे हे पदाधिकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना बाहेर काढले.

नंतर पत्रकारांशी बोलताना अमरनाथ पणजीकर म्हणाले की, आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्‍नाचे संतोषकुमार यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. वाघांची हत्या झाली तर मी काय करू? मी आत्महत्या करू काय? असा उद्धट प्रश्‍न कुमार यांनी केल्याचा आरोप पणजीकर यांनी यावेळी केला.

वाघांच्या वेषात कार्यकर्ते
वाघांच्या झालेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी वन खात्याच्या कार्यालयात आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काल चारजणांना वाघांचा वेष परिधान करून आणले होते. या चार वाघरुपी माणसांनी यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वनखात्याच्या कार्यालयात घोषणा देताना खात्याने चार वाघांचे प्राण घेतल्याचा आरोप केला. यावेळी वाघाचा वेष परिधान करून आलेल्यांनी वाकड्या तिकड्या उड्या मारून व संताप व्यक्त करून निषेध नोंदवला.