वटवृक्ष

0
243

मराठी भाषा, शिक्षण, साहित्य, रंगभूमी आणि संस्कृती हीच आस, ध्यास आणि श्वास मानून अक्षरशः तहहयात कार्यरत राहिलेले भिकू पै आंगले काल आपल्यातून निघून गेले. एखाद्या विशाल वटवृक्षासारखे ते गोमंतकीय मराठी चळवळीवर आपली छत्रछाया धरून होते. गतवर्षी साक्षात् मृत्यूच्या उंबरठ्यावर जाऊन परतले तेव्हा त्या अनुभवातून हादरून न जाता आपल्या नेहमीच्या प्रसन्न शैलीत खळखळून हसत ‘भोज्ज्याला शिवून आलो’ असे सांगणारे भिकूबाब आज या क्षणी डोळ्यांपुढे उभे आहेत. ते हाडाचे शिक्षक. आयुष्यभर त्यांनी विद्यार्थी घडवण्याचे काम केले. विद्यार्थी हा नुसता विद्येने मंडित होणे पुरेसे नाही, तर त्याच्यावर स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कृतीचेही बीजारोपण झाले पाहिजे यावर त्यांची श्रद्धा होती. त्यामुळे असा सुसंपन्न विद्यार्थी घडवण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. आपल्या विद्यार्थीदशेत त्यांनाही असेच ध्येयवादी शिक्षक लाभले होते. गणेश लक्ष्मण चंदावरकर यांच्यासारख्या शिक्षकाने गिरगावच्या राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या या विद्यार्थ्यावर पुत्रवत प्रेम केले. ते आपल्याला ‘यू आर अ बॉर्न टीचर’ म्हणायचे व त्यांनीच आपल्या जीवनाला वळण दिले, जगण्याची दिशा दिली असे भिकूबाबनी एकदा सांगितले होते. हाच कित्ता गिरवत पुढे त्यांनी ज्या ज्या शाळांमध्ये अध्यापन केले, तेथेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीवर विशेष लक्ष दिले. त्यासाठी उपक्रम राबवले. तेव्हाचा विद्यार्थीवर्ग आजही त्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण काढतो. काही काळापूर्वी अशाच त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रतीचे प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी आनंदमेळाही भरवला होता. याहून एखाद्या शिक्षकासाठी कृतार्थतेचा दुसरा कोणता बरे क्षण असू शकतो? शिक्षणाप्रमाणेच भिकू पैंचे दुसरे वेड म्हणजे रंगभूमी. अभिनेता आणि दिग्दर्शक या दुहेरी भूमिका त्यांनी रंगभूमीवर दीर्घकाळ वठवल्या. चौथीत असताना पुठ्‌ठ्याचा मुकूट आणि गळ्यात रूद्राक्षाची माळ घालून राजाचा अभिनय करणार्‍या छोट्या जयरामला वडिलांनी ‘राजाची भूमिका आणि रूद्राक्षाची माळ?’ असे विचारत खास मोत्यांची माळ आणून दिली होती. हा नाट्यसंस्कार त्यांच्यावर कायम होता. मुंबईच्या वास्तव्यात धी गोवा हिंदू असोसिएशनच्या वाटचालीमध्ये त्यांचे मौलिक योगदान राहिले. नाशिकला ओझरला अध्यापन करीत असताना त्यांना वसंतराव कानेटकरांचा सहवास लाभला आणि कानेटकरांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या अजरामर नाट्यकृतीच्या निर्मितीप्रक्रियेचे ते जवळचे साक्षीदार झाले. किंबहुना त्यांच्याच आग्रहामुळे गोवा हिंदू साठी कानेटकरांनी ते नाटक लिहिले आणि पुढे त्याने इतिहास घडवला. त्या नाटकामुळे गोवा हिंदूकडे पैशाचा झरा वाहू लागला असे भिकू पै म्हणायचे. ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘तुझा तू वाढवी राजा’ अशा अनेक नाट्यकृतींना मंचित करण्यामध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. ‘मत्स्यगंधा’ने पन्नासाव्या प्रयोगापासून पाय रोवले आणि पुढे हाऊसफुल्ल झाले. दत्तारामबापूंसारख्या नटश्रेष्ठाचा सहवास त्यांना लाभला. दत्तारामबापूंना त्यांनी गुरू मानले होते. शैक्षणिक कारकिर्दीतून निवृत्तीनंतर गोव्यात परतलेल्या भिकू पैंना येथे मराठीवर होत असलेला अन्याय सहन झाला नाही. त्याविरुद्ध जळजळीत शब्दांतून लिहिण्यास आणि बोलण्यास ते कचरले नाहीत. आपल्याच ज्ञातिबांधवांविरुद्ध परखडपणे ते बोलत असत. राज्यकर्त्यांना जाहीरपणे खडसावण्यास ते कधी डगमगले नाहीत. गोवा सरकारने गोवा मराठी अकादमी स्थापन केली, तेव्हा उद्घाटन सोहळ्यामधील आपल्या मनोगतामध्ये मराठी राजभाषेची जाहीर मागणी त्यांनी केली होती. इतकेच नव्हे, तर मराठी अकादमीचे सध्या काय चालले आहे, अशी विचारणा ते आपल्या प्रकृती अस्वास्थ्यातूनही सतत करीत असत. गोव्यातील मराठीच्या कार्यासंबंधी त्यांनी एक टिपणही लिहिले होते. मराठी चळवळीच्या वाटचालीची सदैव सजगतेने चौकशी करणारे आणि मराठी गोव्याची राजभाषा व्हावी यासाठी तळमळणारे भिकूबाब त्या लढ्याचे एक शेवटचे शिलेदार होते. आता त्या उंचीची माणसे फारच कमी उरली आहेत. एखाद्या वटवृक्षाने सावली धरावी तशी त्यांची प्रेमळ, वात्सल्यपूर्ण छाया सर्वांवर असायची. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या प्रकृतीच्या अनंत समस्या असायच्या. त्यांच्यावर किती शस्त्रक्रिया झाल्या याची मोजदादही हरवावी एवढे व्रण त्यांनी शरीरावर झेलले होते, परंतु तरीही सदैव आनंदी आणि हसतमुख राहणे ही त्यांची जीवनवृत्तीच होती. सुटाबुटाचा पेहराव, हातात खानदानी श्रीमंतांच्या हाती शोभावी अशी काठी, व्यक्तिमत्त्वात भिनलेला जातिवंत रंगकर्मीचा डौल आणि चेहर्‍यावर दिलखुलास, खळाळते हास्य. आता ही वात्सल्यमूर्ती पुन्हा दिसणे नाही. आता मागे उरले आहे भिकू पै आंगले हे गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अजरामर नाव….