वंध्यत्व ः ज्वलंत बोचरे दुःख

0
366

डॉ. मनाली महेश पवार
(गणेशपुरी, म्हापसा- गोवा)

आयुर्वेदशास्त्रामध्ये वंध्यत्व येऊ नये व होणारी संतती उत्तम व्हावी यासाठी आचरणात आणायच्या विविध बाबींचा विचार झालेला आहे. त्यामुळे संततीप्राप्तीचा विचार करणार्‍या सर्वांनी ‘वंधत्व ः कारणे व निवारण’ तसेच ‘सुप्रजाजनना’संदर्भात आयुर्वेदाचे चिंतन मुळातून समजून घेणे आवश्यक आहे.

संततीप्राप्ती ही एक नैसर्गिक देणगी आहे. पण या नैसर्गिक योगदानाला अनेक कारणांनी जणू ग्रहणच लागले आहे. सध्या वंध्यत्व एक झपाट्याने वाढत जाणारी ज्वलंत समस्या आहे. त्यातही गर्भधारणा झालीच तर गर्भधारणेपूर्वीपासून ते संपूर्ण गर्भिणी अवस्थेत अनेक अडचणी, औषधे, तपासण्या व मानसिक ताप असे काहीसे चित्र पाहावयास मिळत आहे. एवढ्या सगळ्या दिव्यातून गेल्यावर सुप्रजा जन्माला येणारच याची शाश्‍वती कमीच.

वंध्यत्व व आधुनिक वैद्यकशास्त्र
स्त्री व पुरुष यांची वैयक्तिक जननक्षमता असते व ती वयोमानाप्रमाणे बदलत असते. स्त्रियांची जननक्षमता वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत खालच्या पातळीवर असते. वीस ते पंचवीस या वयात ती परमोच्च स्थितीस पोचते. त्यानंतर हळूहळू कमी होत जाऊन पस्तिशीनंतर वेगाने कमी होत जाते. मासिक पाळी बंद होण्याच्या वयात (४५ ते ५०) जननक्षमता संपुष्टात येते. पुरुषामध्ये जननक्षमता वयाच्या चौदा-पंधराव्या वर्षापासून सत्तर-पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत कायम असते. मानवी वंश सातत्याने चालत राहावा, यासाठी निसर्गाने नेटकी व्यवस्था केलेली आहे; मात्र अनेकांना काही अडचणींमुळे अपत्यप्राप्ती होत नाही. अशा वेळी अशा जोडप्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. त्यामुळेच जगभरातील वैद्यकीयशास्त्रामध्ये या विषयावर सविस्तर चिंतन, विवेचन, संशोधन चालले आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्रात सातत्याने संशोधन चालू आहे. त्यातूनच ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ)’, ‘टेस्ट ट्यूब बेबी’, ‘स्पर्य बँक’ यांसारखे उपाय पुढे आले. निरनिराळी औषधेही सतत येत आहेत. सतत नवनवीन संशोधन सुरूच आहे. विज्ञान असे नवनवे उपाय शोधून काढत असतानाच समाजाच्या एकूण धारणेसाठी ते कितपत योग्य- अयोग्य, उपयुक्त, हानीकारक आहेत- तसेच खर्चिक बाब हा वेगळाच मुद्दा आहे- यांसारख्या मुद्यावरही मोठी चर्चा सुरू आहे. दत्तकविधानाची प्रथा फार पूर्वीपासून आहेच. पूर्वी मूल न होण्याचे कारण एकमेव स्त्री असे मानून स्त्रीचा छळ, स्त्रीला सोडचिट्टी किंवा अनेक लग्ने असे प्रकार सर्रास घडायचे. पण आज शिक्षण, समाजप्रबोधनामुळे या गोष्टी कमी झाल्या आहेत, पण ‘सरोगसी’ हा प्रकार वाढला आहे. म्हणजे एखादी स्त्री गर्भधारणा करू शकत नसेल व स्वतःच्या पतीपासून मूल हवे असल्यास दुसर्‍या स्त्रीचे गर्भाशय तेवढ्यापुरते घेऊन ‘सरोगसी’च्या माध्यमातून संततीप्राप्ती करून घेतली जाते. गर्भाशय देणार्‍या स्त्रीला ‘सरोगेट मदर’ असे म्हणतात. पाश्‍चिमात्त्य राष्ट्रांमध्ये याचा प्रचार जास्त आहे. असे उपाय उपलब्ध असले तरी ‘आपले मूल’ स्त्री-पुरुषांना हवेच असते. त्यासाठी आयुर्वेदशास्त्रात अनेकविध उपाययोजना आहेत.

वंध्यत्व व आयुर्वेदशास्त्र
वंध्यत्व म्हणा किंवा इतर व्याधी म्हणा, ऍलोपॅतीव्यतिरिक्त इतर काही उपाय असूच शकत नाहीत अशी काहीशी धारणा अशिक्षितांमध्ये तसेच काही प्रमाणात सुशिक्षितांमध्येही बघायला मिळते. ज्या उपायांना हजारो वर्षांची परंपरा आहे, उपाय जुनाट व मागासलेले असले तरी ज्यात रोगांना समूळ नष्ट करण्याची क्षमता आहे, याचे ज्ञान नसल्याने समाजाचे मोठे नुकसान होत आहे. आयुर्वेदशास्त्रात वंध्यत्वनिवारण, इच्छित संतती, गर्भविज्ञान, गर्भिणी परिचर्या, प्रसूतिविज्ञान यांविषयी संपूर्ण शास्त्रीय विवेचन करण्यात आले आहे. त्यातील अडथळ्यांवर उपाय सांगितले आहेत. पंचकर्माच्या काही खास पद्धती, काही खास औषधी उपाय यांबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे.

आयुर्वेद सुप्रजाजननासाठी
आयुर्वेदशास्त्रामध्ये नुुसताच वंध्यत्वनिवारणाचा विचार झालेला नसून जन्माला येणारी संतती ही निरोगी, सुदृढ, दीर्घायुषी व्हावी यासाठी सुप्रजाजननशास्त्राचा विचार झालेला आहे. जगभरात वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या परिणामुळे सरकारने कुटुंब नियोजनाचा एक भाग म्हणून ‘हम दो हमारे दो’ अशा घोषणा सुरू केल्या. हळूहळू समाजानेच ‘हम दो, हमारा एक’ असा सोयीस्कर बदल करून घेतला. जणू काही अशी फॅशनच झाली व सामाजिक स्थिती बदलली. त्यात भर म्हणून आधुनिकीकरण, बदलते खान-पान, राहणीमान! प्रत्येकाला ध्यये उंच शिखरावर दिसत आहे व ते साध्य करण्यासाठी, गाठण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड. परिणामतः विवाहापूर्वी शारीरिक संबंध, विवाहबाह्य शारीरिक संबंध, उशिरा लग्ने, सतत मानसिक ताण व यातून वंध्यत्व. अपत्यप्राप्ती ही सजीवांची सहज स्वाभाविक ऊर्मी आहे. ‘आपल्याला मूल हवे’ ही सगळ्यांची भावना असते. म्हणूनच एक का असेना पण आपले मूल सुदृढ आणि निरोगी असावे, अशीच माता-पित्यांची इच्छा असते. पण नेमके वंधत्व निवारणासाठी म्हणा किंवा सुप्रजाजननासाठी काय करावे हे माहीत नसल्याने चुकीच्या दिशेने प्रयत्न करतात.

वास्तविक आयुर्वेदशास्त्रामध्ये वंध्यत्व येऊ नये व होणारी संतती उत्तम व्हावी यासाठी आचरणात आणायच्या विविध बाबींचा विचार झालेला आहे. त्यामुळे संततीप्राप्तीचा विचार करणार्‍या सर्वांनी ‘वंधत्व ः कारणे व निवारण’ तसेच ‘सुप्रजाजनना’संदर्भात आयुर्वेदाचे चिंतन मुळातून समजून घेणे आवश्यक आहे.

सुप्रजाजनन म्हणजे काय?
बदलती जीवनशैली सगळेच बदलून गेली. ना संततीप्राप्ती नैसर्गिक राहिली, ना प्रसूती नैसर्गिक राहिली. मुले होणार औषधांवर व वाढणारही औषधांवर अशी काहीशी स्थिती सर्वत्र पाहायला मिळत आहे. नवनवीन रोग समाजात रुजू होत आहेत. अशा परिस्थितीत गरज आहे ती सुदृढ, निरोगी प्रजा तयार करणे. सारा समाज निरोगी व्हावयाचा असेल तर प्रत्येक व्यक्ती सुदृढ व निरोगी बनावी लागेल. त्यामुळे सुदृढ अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणे आणि जन्माला येणार्‍या प्रत्येक बाळाची काळजी घेणे अत्यावश्यक ठरते. सुदृढ संततीप्राप्तीसाठी आयुर्वेदात ‘गर्भसंस्कार’ सांगितलेले आहेत. गर्भधारणा होण्यापूर्वीचा काळ, गर्भावस्था व अपत्यजन्मानंतरचे संस्कार अशा तीन टप्प्यांत गर्भसंस्काराचा विचार केला जातो. यांपैकी गर्भधारणा होण्यापूर्वीचा काळ आणि प्रत्यक्ष गर्भधारणेचा काळ यांचा संततीप्राप्ती आणि सुप्रजाजननच्या दृष्टीने अधिक विचार केला जाण्याची आवश्यकता आहे.
गर्भधारणा होण्यापूर्वीच्या काळात उत्तम व संपन्न गर्भासाठी योग्य वेळ, निरोगी स्त्रीशरीर व गर्भाशय, गर्भाच्या विकासाला आवश्यक असणारे पोषण व संपन्न बीज या सर्व गोष्टींचा समन्वय आवश्यक असतो. माता-पित्यांनी स्वतःच्या शारीरिक आरोग्यासाठी केलेली तयारी, योग्य गर्भधारणा होण्यासाठी केलेली उपाययोजना व गर्भ राहिल्यानंतर प्रसूतीपर्यंत घ्यावयाचे उपचार या बाबी सुप्रजाजननासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या ठरतात.

सुप्रजाजननासाठी ऋतू, क्षेत्र, अम्व् व बीज या गोष्टीही महत्त्वपूर्ण ठरतात, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. ऋतू म्हणजे गर्भधारणास योग्य असा काळ. साधारण आठव्या दिवसापासून अठराव्या दिवसांपर्यंत. अठराव्या रात्रीनंतर गर्भ राहिल्यास संतती आरोग्य, बल, वर्ण, इंद्रियशक्ती, ओज वगैरे कमी असण्याची शक्यता असते. गर्भधारणेच्या वेळी स्त्रीचे वय २० ते ३५ आणि पुरुषाचे २० ते ४५ वर्षे या दरम्यान असावे. क्षेत्र म्हणजे ज्याठिकाणी बीजारोपण करणार ते गर्भाशय सुपीक, शुद्ध व गर्भाचे पालनपोषण करण्यास सक्षम असले पाहिजे. प्रसूतीसाठी आवश्यक गर्भाशयाची लवचीकता, ताकद आणि एकंदर शरीरशक्ती यांचा विचार करून स्त्रियांची ४० वर्षांनंतर गर्भधारणा होऊ न देणे श्रेयस्कर असते. अम्व् म्हणजे जसे शेतात बी पेरल्यानंतर पाणीपुरवठा करावा लागतो, तसे गर्भाचे पोषण स्त्रीच्या रक्ताद्वारे चांगले होणे आवश्यक असते. सकस बीजाचा संबंध काही आनुवंशिक विकारांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण शरीरातील मृदू घटक जसे मांस व रक्त हे मातेकडून येतात. म्हणजे यासंबंधी होणार्‍या आनुवंशिक विकारांचा संबंध मातेशी येतो. तर केस, शिरा, हाडे इत्यादी कठीण घटक पितृज असतात. म्हणजे यासंबंधीच्या आनुवंशिक विकारांचा स्रोत पित्याकडून येतो, असेही आयुर्वेदाने सांगितलेले आहे.

जेथे शुद्धता व पावित्र्याची खात्री आहे, अशी वास्तू गर्भधारणेसाठी निवडणे योग्य ठरते. तसेच गर्भधारणेपूर्वी तसेच गर्भधारणेच्यावेळी मनात येणारे विचार यांचा गर्भाची मानसिक स्थिती घडविण्यावर मोठा प्रभाव पडतो. गर्भधारणेच्यावेळी पावित्र्य व सकारात्मक मानसिकता यांचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. चिंता, शोक, चिडचिड व निराशा यांमुळे शुक्रधातूचा र्‍हास होतो. त्यामुळे गर्भधारणेच्यावेळी अशा नकारात्मक भावना टाळणेच इष्ट!
गर्भातील घटनात्मक किंवा क्रियात्मक दोष, मानसिक क्षोभ, शुक्राणू वा बीजांडातील दोष योग्य व प्रकृतिनुरूप आहार-आचरण न ठेवणे, हार्मोन्समधील असंतुलन, मासिक पाळीतील दोष किंवा अनैसर्गिक वर्तन यांवर गर्भधारणेतील तसेच सुप्रजननातील यशापयश अवलंबून असते. आयुर्वेदशास्त्राने सुप्रजननाचा असा मुळातून विचार केलेला आहे. त्यात येणार्‍या समस्या, अडचणी, त्या दूर करण्यासाठी योजावयाचे उपाय अशा अनेक अंगांनी आयुर्वेदशास्त्रात विचार केलेला आहे. असे हे ज्ञान आजच्या काळात उपयुक्त ठरणारे आहे.