‘वंध्यत्वा’वर आयुर्वेद परिणामकारक लेखांक – २

0
307

– डॉ. मनाली पवार (गणेशपुरी, म्हापसा)

आजही वंध्यत्व म्हटलं की तपासणीसाठी बहुधा स्त्रीलाच पाठविण्यात येते. परंतु पुरुषांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की, पुरुषांमध्ये दोष असण्याचे प्रमाण जवळ जवळ ४० टक्के इतके आहे. शुक्रजंतुंचे प्रमाण कमी असणे, शुक्राणूंची गती आवश्यक तेवढी नसणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, कधी कधी अति उष्णतेमुळे आतल्या आतच शुक्राणू नष्ट होणे अशा अनेक समस्या असतात.

सारी भौतिक सुखे घरात खेळणारी, उच्च विद्याविभूषित समाजात उत्तम स्थान, जग पाहून आलेले, चांगली नोकरी, चांगला व्यवसाय, नवरा-बायको दोघेही कमावते, घरदार, गाडी, नोकर-चाकर पण… पण.. स्वत:च्या मुलासाठी आसुसलेले.. आतच्या आत कोमजून गेलेले.. अशी अनेकांची स्थिती आज आहे. ज्यांना कोणतेही वैद्यकीय उपचार न करता अपत्यप्राप्ती होते त्यांना निसर्गाने आपल्याला दिलेली केवढी मोठी देणगी आहे, याचा कदाचित अंदाज नाही. ‘आपलं स्वत:चं मूल असणं’ ही प्रत्येकाची मानसिक व सामाजिक गरज आहे. समोरच्या व्यक्तिने ‘मुलं किती?’ हा प्रश्‍न विचारल्यावर ‘नाही… मला मुले नाहीत… हे सांगणं किती वेदनामय असतं., हे दुसरा अनुभवू शकत नाही. सहजीवनानंतर काही वर्षे उलटून गेल्यावरही मूल न होणे ज्यांनी अनुभवले आहे, त्यांना ‘वंध्यत्व’ या शब्दात किती दु:ख आणि निराशा समावलेली आहे, हे समजू शकेल.

वंध्यत्व
शास्त्रीय व्याख्येेप्रमाणे एखाद्या जोडप्याला एक वर्षाच्या सलग, गर्भनिरोधक साधनांचा वापर न करता केलेल्या शरीरसंबंधानंतरही गर्भधारणा झाली नसेल, तर त्याला वंध्यत्व असे म्हणतात. साध्या-सोप्या भाषेत लग्नाला एक वर्ष उलटून गेले तरी घरात पाळणा जर हलला नाही, तर ती वंध्यत्वाची खूण समजावी.
यात पुन्हा दोन प्रकार आहेत. जर एखाद्या जोडप्यामध्ये नैसर्गिक शरीर संबंधांनंतरही गर्भधारणा झालेली नसेल, तर अशा स्थितीला ‘प्राथमिक वंध्यत्व’ किंवा ‘प्रायमरी इन्‌फर्टिलिटी’ असे म्हणतात. याऐवजी जर एखाद्या वेळी गर्भधारणा होऊन नंतर पुन्हा गर्भधारणा झालेली नसेल तर अशा स्वरुपाच्या वंध्यत्वाला ‘सेकंडरी इन्‌फर्टीलिटी’ म्हणतात.
वंध्यत्वाला अनेक कारणे असतात. अनियमित पाळी येणे, स्त्रीबीज निर्माण होण्याच्या प्रक्रियेत अडथळा असणे, फॅलोपिअन ट्युबमधील ब्लॉक, गर्भधारणा होण्याच्या दृष्टीने स्त्रीच्या वयाच्या विसाव्या वर्षापासून पस्तिसाव्या वर्षापर्यंत शक्यता जास्त असते. पुरुषांच्या बाबतीत वयात आल्यानंतर म्हणजेच मिसरूड फुटल्यानंतर आयुष्यभर शुक्राणू राहतातच, पण वयाच्या साठ वर्षानंतर मात्र शुक्राणूंचे बल कमी होते.

स्वास्थ्य व पोषणत्व यांवर गर्भधारणा अवलंबून असते. पोषणाचा अभाव असेल तर तसेच काही वेळेस स्थूलपणामुळे देखील स्त्रीबीजाची निर्मिती होत नाही व मासिक पाळी अनियमित येते.
स्त्री-पुरुष प्रचंड ताणाखाली जगत असल्यास, गर्भधारणेसाठी आवश्यक असे स्राव कमी प्रमाणात स्रवतात आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही.
वंध्यत्वाची प्राथमिक कारणे- शारीरिक समस्या, मानसिक समस्या व जैवरासायनिक समस्या अशा तीन प्रकारांत करता येऊ शकतात.

मूल होणे या प्रक्रियेत स्त्री आणि पुरुष या दोघांचाही एकत्रित सहभाग असतो. त्यामुळे त्या दोघांचे शारिरीक आरोग्य उत्तम असायलाच हवे शारिरीक आरोग्य म्हणजे निखळ बाह्य शरीर नव्हे, तर शरीरांचे अंतर्गत अवयवही सदृढ हवेत, त्याचबरोबर गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये पुरुष व स्त्री दोघांच्याही शरीरात स्रवणार्‍या अनेक स्रावांचीही अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे त्या स्रावांसाठी कारणीभूत असणार्‍या जैवरासायनिक क्रिया, त्याही महत्वाच्या ठरतात. हे झाले मूल हवे असलेल्या त्या स्त्री व पुरुषाच्या व्यक्तिगत शारीरिक आरोग्याबद्दल. त्या दोघांच्या शारीरिक आरोग्यासोबत त्यांचे मानसिक आरोग्यही उत्तम असावे लागते. तसेच त्यांच्या सहजीवनाचे आरोग्यही चांगले असावे लागते. त्याचबरोबर सभोवतालचे वातावरण चांगले नसल्यास, त्याचा परिणामही वंध्यत्वावर होतो. लैंगिक आरोग्याबद्दलच योग्य माहिती त्या दोघांना नसेल, तरीही वंध्यत्वाची समस्या कायम राहते.
असा हा सारा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे. अनेक बारीकसारीक घटना ज्यांच्याकडे अनेकदा आपण सरसकट दुर्लक्ष करीत असतो… असे घटकसुध्दा अपत्याच्या समस्येला कारणीभूत ठरू शकतात.

उदाहरणार्थ – एखाद्या मनुष्याचा स्पर्मकाऊंट कमी आहे, हे काही चाचण्यांतून दिसून आले. त्यासाठी महागड्या औषधांचा माराही झाला, पण सकारात्मक परिणाम काही दिसेना. अशा वेळी खोल विचारपूस केल्यावर, अनेक कारणांचा विचार केल्यावर मनावर ताण, असुरक्षितपणाची भावना अशी काही कारणे समोर आल्यास नुकतीच स्पर्मकाऊंट वाढवणारी औषधे काम करत नाही. अशा अवस्थेत शिरोधारा, शिरोतर्पण, नस्य, मेंदुवर कार्य करणारी औषधांची सांगड घातल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतो. यासाठीच वंध्यत्वावर चिकित्सा देताना विचार खोलवर पाहिजे.
कधी कधी अनपत्त्येचे मूळ कारण वेगळेच असते. दोघांच्याही सगळ्या टेस्ट केल्यास जवळपास, सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात. कारण काहीच समजत नाही. मग स्त्रीवर हॉर्मोनचा मारा, पुरुषांनाही काही वाजीकरण औषधांचा मारा, पण प्रत्यक्षात मात्र लैंगिंक संबंधाची योग्य माहिती नसणे, असे कारण दिसून येते. योग्य वयात योग्य माहिती दिली न गेल्यामुळे लैगिंक संबंधांची प्रचंड भीती वाटत असते. फोबिया हे कारण असू शकते. अशा वेळी फक्त कौन्सिलिंगने समस्या सुटू शकते.

वाढत्या वंध्यत्वाच्या समस्या पाहता, मुलगी वयात येते तेव्हापासूनच तिची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यात मासिक पाळीतील नियमितपणा ही अतिशय महत्वाची बाब आहे.कंबरदुखी, पोटदुखी इत्यादी त्रास असू नयेत. यात काहीही समस्या असल्यास त्यावर उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. हल्ली आहार-विहार यांतील दोषांमुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या अनेक मुलींना भेडसावतात. त्यासोबत योग्य माहिती नसताना घेतल्या जाणार्‍या औषधांचा दुष्परिणाम. खरेतर शालेय वयातच मासिक पाळी, या काळातील शारिरीक स्वच्छता आणि तिच्याशी संबंधित आरोग्याचे घटक यांची सविस्तर माहिती अगदी साध्या-सोप्या आणि सहज कळेल अशा पध्दतीने प्रत्येक मुलीला दिली जायला हवी. आपल्याकडे या विषयाची चर्चा तशी कमीच होते व गैरसमज कायम राहतात. बराच काळ समस्या तशाच सोसत राहिल्याने कालांतराने त्या गुंतागुतीच्या होतात. म्हणून मुलींना वयात येताना शरीराबद्दल, आरोग्याबद्दल योग्य माहिती नीट पध्दतीने दिली, तरी अनेक समस्या दूर होऊ शकतात.

वंध्यत्व म्हटले की प्रथम उपाय म्हणून स्त्रीवर हॉर्मोन्सचा मारा केला जातो, पण या हार्मोन्सचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. या सार्‍याचा विचार करताना पाळीच्या अनुषंगाने असणार्‍या सर्व विकांरावर आयुर्वेद शास्त्रांमध्ये उपाययोजना सांगितली आहे. पंचकर्म उपक्रमांनी शरीरशुध्दी करून, आयुर्वेदिक औषधीकल्पांचा उपयोग करून मासिक पाळीच्या कोणत्याही समस्येवर विजय मिळविता येतो. पाळीमध्ये नियमितपणा आला व विनारूजा योग्य रज:स्राव झाल्यानंतरचा टप्पा म्हणजे गर्भधारणेशी संबंधित सर्व शारिरीक अवयव निर्दोष असणे.
योनी, गर्भाशय, ग्रीवा, बीजनलिका, बीजग्रंथी, इत्यादी सर्व अवयव तसेच त्यांना कार्यान्वित करणार्‍या अंत:स्रावी ग्रंथी या सर्वांची रचना व कार्य अचूक असावे लागते. बीजांडनिर्मिती व योग्य वेळी ते फुटणे व त्याचा योग्यवेळी पुंबीजाशी संबंध येणे या सगळ्यांचे गर्भधारणेमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. वेगवेळ्या कारणांनी त्यात अडथळे निर्माण होतात. त्यातून गर्भाशयाच्या अंतस्त्वचेला सूज येणे, फॅलोपिअन ट्युब ब्लॉक होणे, गर्भाशयातील संसर्ग, ‘पीसीओडी’ इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय स्थूलपणा, ऍनिमिया अशा इतर कारणांनीही गर्भधारणात बाधा निर्माण होते.

आजही वंध्यत्व म्हटलं की तपासणीसाठी बहुधा स्त्रीलाच पाठविण्यात येते. परंतु पुरुषांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की, पुरुषांमध्ये दोष असण्याचे प्रमाण जवळ जवळ ४० टक्के इतके आहे. शुक्रजंतुंचे प्रमाण कमी असणे, शुक्राणूंची गती आवश्यक तेवढी नसणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, कधी कधी अति उष्णतेमुळे आतल्या आतच शुक्राणू नष्ट होणे अशा अनेक समस्या असतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये वाजीकरणांसारखी परिणामकारक उपाययोजना सांगितली आहे.
तणावग्रस्त जीवनपध्दतीमुळे जरी वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असले तरी आयुर्वेद शास्त्र या बोचर्‍या दु:खाला नक्कीच पर्याय आहे. त्यासाठी योग्य कारणांचा विचार करून, योग्य निदान करून, शारिरीक, मानसिक पातळीवर उपाययोजना केल्यास समस्या नक्कीच दूर होऊ शकेल.
– क्रमश: