लोटलीतील सोसायटीकडून ३९ कोटी रु. चा गैरव्यवहार

0
255

>> पोलिसात तक्रार

दक्षिण गोव्यातील लोटली येथील व्हिजनरी क्रेडिट सोसायटीने ३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार ७३ गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हा विभागाकडे काल केली आहे.

या सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हा विभागाकडे तक्रार करून याप्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सोसायटीमध्ये सुमारे २ हजार लोकांनी गुंतवणूक केलेले सुमारे ३९ कोटी रुपये अडकून पडले आहेत. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर सुध्दा ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत दिली जात नाही. सोसायटीने काही गुंतवणूकदारांना ठेवीची रक्कम परत देण्यासाठी धनादेश दिले आहेत. सोसायटीकडून या धनादेशावर तारीख नोंद केली जात नाही. तारखेबाबत विचारल्यास धनादेश बँकेत सादर करण्याबाबत फोनच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला कळविण्यात येईल, असे उत्तर व्यवस्थापनाकडून दिले जात आहे. काही गुतवणूकदारांना देण्यात आलेले धनादेश वटले नाहीत, अशी तक्रार गुंतवणूकदारांनी केली आहे.