लोकसभेसाठी भाजप-कॉंग्रेस यांच्यातच प्रमुख लढत

0
120

>> विधानसभा पोटनिवडणुकीत बहुरंगी लढती ः दोनच अपक्षांची माघार

लोकसभा आणि गोवा विधानसभेच्या तीन मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील प्रत्येकी एका उमेदवारांनी मिळून एकूण दोन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. लोकसभेच्या दोन जागांसाठी १२ उमेदवार आणि तीन विधानसभा मतदारसंघातून १६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. विधानसभेच्या पोट निवडणुकीत तिरंगी, बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.

विधानसभेच्या पोट निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या दिवशी शिरोडा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हरिश्‍चंद्र नाईक आणि मांद्रे मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मुक्ती आरोलकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे श्रीपाद नाईक, कॉंग्रेसचे गिरीश चोडणकर, आपचे दत्तात्रय पाडगावकर, आरपीआयचे (कांबळे गट) अमित कोरगावकर, अपक्ष ऐश्‍वर्या साळगावकर आणि भगवंत कामत यांचा समावेश आहे. तर, दक्षिण गोव्यातून भाजपचे नरेंद्र सावईकर, कॉंग्रेसचे फ्रान्सिस सार्दीन, आपचे एल्वीस गोम्स, शिवसेनेच्या राखी नाईक, अपक्ष डॉ. कालिदास वायंगणकर आणि मयूर काणकोणकर यांचा समावेश आहे.

विधानसभेच्या विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी म्हापसा मतदारसंघातून भाजपचे जोशुआ डिसोझा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय बर्डे, कॉंग्रेसचे सुधीर कांदोळकर, गोवा सुरक्षा मंचाचे नंदन सावंत, आपचे शेखर नाईक, अपक्ष आशिष शिरोडकर आणि सुदेश हसोटीकर यांचा समावेश आहे.

मांद्रे मतदारसंघातून कॉंग्रेसचे बाबी बागकर, भाजपचे दयानंद सोपटे, गोवा सुरक्षा मंचाचे स्वरूप नाईक आणि अपक्ष जीत आरोलकर यांचा समावेश आहे.
शिरोडा मतदारसंघातून मगोपचे दीपक ढवळीकर, कॉंग्रेसचे महादेव नाईक, भाजपचे सुभाष शिरोडकर, गोवा सुरक्षा मंचाचे संतोष सतरकर आणि आपचे योगेश खांडेपारकर यांचा समावेश आहे. निवडणूक रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वितरण करण्यात आले आहे.