लोकसभेसाठी भाजपसोबत जेडीयूची युती

0
218

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जनता दल संयुक्तचा (जेडीयू) भाजपला पाठिंबा असेल असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व भाजप वेगवेगळे लढणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजप-जेडीयू युती होणार असली तरी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे जेडीयूच्या सूत्रांनी सांगितले.

बिहारमध्ये काल जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपसोबत युती करून लढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जागा वाटपाबाबत जरी निर्णय झाला नसला तरी पक्षाला सन्मानजनक जागा जरूर मिळतील, असा विश्वास असल्याचे जेडीयूच्या सूत्रांनी सांगितले. पुढील आठवड्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा बिहार दौर्‍यावर येणार असून त्यावेळी जागा वाटपाबाबत चर्चा होईल असे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे भाजपच्या ‘एक देश, एक निवडणूक’ या भूमिकेलाही पाठिंबा असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र नागरिक संशोधन विधेयकावरून संसदेत भाजपला जेडीयू विरोध करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

समाजवादी, तेलंगणा समितीचाही पाठिंबा
दरम्यान, भाजपच्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेला नितीशकुमारांपाठोपाठ समाजवादी पक्ष आणि तेलंगणा राष्ट्रीय समितीनेही पाठिंबा दिला आहे. मात्र डीएमकेने ही संकल्पनाच संविधानाच्या सिद्धांताविरोधात असल्याचे सांगून कडाडून विरोध केला आहे.