लोकसभा-विधानसभेसाठी ४५ उमेदवारांचे अर्ज

0
236

>> आज होणार अर्जांची छाननी

>> ८ एप्रिल रोजी चित्र स्पष्ट होणार

येत्या २३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत काल पूर्ण झाली. लोकसभेसाठी उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी ८ मिळून १६ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. तर मांद्रे (११), म्हापसा (११) व शिरोडा (७) या तीन मतदारसंघांच्या विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण २९ जणांनी अर्ज सादर केले आहेत. दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज ५ रोजी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सोमवार ८ एप्रिल रोजी चित्र स्पष्ट होणार आहे.

काल उमेदवारी दाखल करण्याचा शेवटच्या लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातून शिवसेनेतर्फे राखी अमित नाईक यांनी तर मयूर काणकोणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केेली. हे दोन अर्ज धरून दक्षिण गोवा मतदारसंघात लोकसभेसाठी अर्ज दाखले केलेल्या उमेदवारांची संख्या ८ झाली आहे. काल कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचे डमी म्हणून इमाने डिसौझा तर भाजपचे नरेंद्र सावईकर यांचे डमी म्हणून नीलेश जुवांव काब्राल यांनी अर्ज भरले. निज गोंयकार रेव्हूलेशन फ्रंटचे डॉ. कालिदास वायंगणकर तसेच आपचे एल्विस गोम्स यांनीही आणखी एक अर्ज सादर केला.

भाजप – कॉंग्रेसमध्ये लोकसभेसाठी चुरस
उत्तर गोवा मतदारसंघात भाजपचे श्रीपाद नाईक आणि कॉँग्रेसचे गिरीश चोडणकर यांच्यात प्रमुख लढत अपेक्षित आहे. तसेच या मतदारसंघातून आरपीआय (कांबळे) गटाचे अमित कोरगावकर, नीज गोंयकार फ्रंटच्या ऐश्‍वर्या साळगावकर, अपक्ष भगवंत कामत, आपचे दत्तात्रेय पाडगावकर, भाजपचे दयानंद मांद्रेकर, कॉँग्रेसचे प्रसाद आमोणकर यांनी अर्ज सादर केले आहेत. तर, दक्षिण गोव्यात भाजपचे नरेंद्र सावईकर आणि कॉंग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांच्यात प्रमुख लढत अपेक्षित आहे. या मतदारसंघात आपचे एल्विस गोम्स, नीज गोंयकार फ्रंटचे डॉ. कालिदास वायंगणकर, शिवसेनेच्या राखी नाईक, मयूर काणकोणकर, नीलेश काब्राल, यामिन डिसोझा यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

दक्षिणेत निरीक्षकांची नेमणूक
निवडणूक आयोगाने सर्वसामान्य खर्च व पोलीस निरीक्षणासाठी दक्षिण गोवा लोकसभा व शिरोडा मतदारसंघासाठी इंद्रा माल्लो व मोनालिसा गोस्वामी यांची नेमणूक केली आहे. मालो हे २१ ते ३० विधानसभा मतदारसंघ व मोनालिसा या ३१ ते ४० मतदारसंघांची जबाबदारी सांभाळतील. शिरोडा मतदारसंघाच्या सुथिमा सिन्हा निरीक्षक आहेत. अप्राजीत शर्मा खर्चावर देखरेख ठेवणारे निरीक्षक आहेत. नवीन सिग्ला यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

मांद्रेतून कॉंग्रेसचे बाबी बागकरांचा अर्ज
मांद्रे मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेसचे बाबी बागकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी, त्यांनी देवदेवतांचे दर्शन घेतले. पेडणे येथील श्री भगवती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक उपस्थित होते. यावेळी बागकर यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला.
अर्ज सादर करतेवेळी बागकर यांच्या समवेत माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, आमदार रवी नाईक, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, माजी मंत्री संगीता परब, हरमल सरपंच डॅनियल डिसौझा, प्रदीप हरमलकर आदी प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना बागकर यांनी मांद्रे मतदारसंघात बेरोजगारी, पाण्याची समस्या असून त्या सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. पक्षाने ठेवलेल्या विश्‍वासाला पात्र ठरणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

शेवटच्या दिवशी म्हापशात ३ अर्ज
म्हापसा मतदारसंघातून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे, म्हापसा पालिकेचे माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर व म्हापसा फेरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष सुदेश हसोटीकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. यापूर्वी भाजपचे जोशुआ डिसोझा, कॉंग्रेसचे सुधीर कांदोळकर व आम आदमीचे शेखर नाईक यांनी उमेदवारी दाखल केली आहे. राष्ट्रवादी उमेदवारासमवेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार जुझे फिलीप डिसोझा उपस्थित होते.