लोकसभा, मांद्य्रातील मगोच्या पाठिंब्यावर लवकरच निर्णय

0
130

मगो पक्षाच्या लोकसभा आणि मांद्रे मतदारसंघातील पाठिंब्याबाबत निर्णय १२ एप्रिलपर्यंत घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मगो पक्ष ८ एप्रिलपर्यंत लोकसभा आणि मांद्रे मतदारसंघातील उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेणार आहे, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, ८ रोजी पाठिंब्याबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी दोन – तीन दिवसात मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी दिली.

मगो पक्षाच्या म्हापसा गटाने म्हापसा मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर शिरोडा मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. तर, मांद्रे मतदारसंघातील पाठिंब्याबाबत निर्णय घेतलेला नाही. मांद्रे मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी मगो पक्षाच्या नेत्यांनी आरोलकर यांना पाठिंबा देण्याबाबत सूतोवाच केले होते. परंतु, यासंबंधी केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

लोकसभेच्या दोन्ही जाग्यांसाठी पाठिंबा देण्याबाबत मगो पक्षाकडून निर्णय घेतला जाणार आहे. प्रचारासाठी वेळ कमी असल्याने मगोपने निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. मगो पक्ष लोकसभा निवडणुकीत कुणाला पाठिंबा देणार याकडे राजकीय पक्षांची नजर लागलेली आहे.