लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविणार?

0
181

भारतात दि. १४ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दि. २४ मार्च रोजी रात्री मध्यरात्रीपासून पुढील तीन आठवड्यांसाठी (२१ दिवस) देशभरात लॉकडाऊन जाहीर केले होते. आता हे लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविले जाणार असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

वाढीव लॉकडाऊनची मुदत ३० एप्रिल रोजी संपणार असली तरी १ मे रोजी स्थिती सर्वसामान्य राहणार नाही. कारण त्यानंतर लॉकडाऊन उठविण्याचे झाले तरी तरीही ते काम अतिशय सुनियोजित आखणीसह केले जाणार आहे. लॉकडाऊन मागे घेण्याच्या सरकारच्या संभाव्य योजनेनुसार ५ मे रोजी सर्वप्रथम धार्मिक स्थळे खुली केली जाणार आहेत. त्यानंतर ७ मे रोजी फळ-भाज्यांची मार्केटात खुली केली जाणार आहेत.

मॉल, चित्रपटगृहे

मेच्या तिसर्‍या आठवड्यात

मॉल, चित्रपटगृहे, विवाहाची सभागृहे आदी मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात व शैक्षणिक संस्था मेच्या शेवटी खुली होणार आहेत. रेल्वे व देशांतर्गत विमान सेवा १५ मे पासून सुरु होतील. मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३० जुलैपासून सुरु होण्याची शक्यता आहे.

वरील उच्चस्तरीय सूत्रांनुसार लॉकडाऊन उठविण्याचा हा संभाव्य आराखडा पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर आहे. तो विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यावरुन करण्यात आला आहे. त्यावर अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ व पंतप्रधानांकडून घेतला जाणार आहे. तथापी या संदर्भात काही बदल करावयाचे असल्यास संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोकळीक दिली जाईल.

आज पंतप्रधान – मुख्यमंत्री

यांची व्हिडिओ कॉन्फरन्स

आज शनिवारी मुख्यमंत्र्यांबरोबर होणार्‍या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये वरील लॉकडाऊन वाढविणे व उठविण्याचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. त्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला या अनुषंगाने संबोधणार आहेत.