लॉकडाऊन आणि विद्यार्थी जगत

0
207
  • दत्ता भि. नाईक

 

सध्याच्या तरुण पिढीच्या आयुष्यभर स्मरणात राहील असा हा कालखंड आहे. ज्यांच्या नोकर्‍या होत्या त्यांच्या चालू राहणार आहेत. पगारी लोकांचे पगार चालू राहणार आहेत. सेवानिवृत्तांना निवृत्तीवेतन मिळणार आहे. परंतु विद्यार्थ्यांचे काय चालू राहणार आहे हे सध्यातरी कोणीही सांगू शकत नाही.

 

कोविड-१९ म्हणजे कोरोना व्हायरसच्या महामारीचे महासंकट आता दिवसेंदिवस भयानकपणे चोहोबाजूंनी वाढताना दिसत आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या क्षेत्रात अग्रेसर असलेला युरोप खंड हवालदील झालेला आहे. एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा इंग्लंडची सम्राज्ञी एलिझाबेथ क्वारेन्टीनमध्ये आहे तर प्रधानमंत्री बॉरीस जॉन्सन रुग्णालयात. महासत्ता असलेली अमेरिका किंकर्तव्यविमूढ झालेली आहे. यामुळे या रोगावर मात करावयाची असेल तर सर्व उद्योगधंदे, कारखाने, कार्यालये, मठ- मंदिरे- चर्च- मशिदींसारखी प्रार्थनास्थळे, सामाजिक व धार्मिक समारंभ, टपरीपासून तारांकित हॉटेल्स, मदिरालये व त्याचप्रमाणे पूर्वप्राथमिकपासून ते संशोधनाचे प्रयोग चालवणारी विश्‍वविद्यालये बंद ठेवावी लागतील, हे ओघानेच आले. २२ मार्च रोजी प्रयोग म्हणून देशात अठरा तासांचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. तो यशस्वी झाल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली त्यातील तोच तोचपणा घालवण्यासाठी थाळ्या वाजवणे, दिवे लावणे यासारखे प्रयोग करून संकटाच्या भावनेची धार कमी करण्याचेही प्रयोग झाले. आता लॉकडाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढवलेली आहे.

 

– परिणाम भोगणार विद्यार्थीच –

जागतिक अर्थव्यवस्था आगामी काळात चीन व अमेरिका यांच्यातील स्पर्धेचे होणारे परिणाम, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची धोरणे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय भवितव्य यासंबंधाने जगभर चर्चितचर्वण चालू असताना विश्‍वाचे खरेखुरे मानव संसाधन असलेल्या युवक व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधाने व विद्यार्थ्यांच्या विद्याप्राप्ती ज्ञानार्जन, स्पर्धा व परीक्षा यासंबंधाने कुणीही चर्चा करताना दिसत नाही. केंद्र व राज्य सरकारकडून अनेक सुट्‌ट्या घोषित केल्या जातात. कुणीतरी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थानावर असलेल्या व्यक्तीचे निधन होते तर कधी कधी कोणत्यातरी समाजाचे तुष्टीकरण करण्यासाठी सरकारकडून सुट्टीची घोषणा केली जाते. बर्‍याच वेळेस एस्.एस्.सी. बोर्डाचा वा विद्यापीठाचा किंवा स्पर्धा परीक्षेचा महत्त्वाचा पेपर असलेला तो दिवस असतो. हल्ली संपर्क वाढलेला आहे परंतु अगदी अलीकडे सहा वर्षांपूर्वी बरेच विद्यार्थी परिक्षाकेंद्रावर आल्यानंतर पेपर पुढे ढकलल्याचे समजल्यामुळे बेचैन होत असत. दुष्काळ ओला असो वा कोरडा, परिणाम भोगणारा विद्यार्थी, संप व बंद असले की शाळा-महाविद्यालय बुडणार ते त्याचेच व विद्यार्थ्यांनी एखादे मागणीपत्र विश्वविद्यालय वा सरकारसमोर प्रस्तुत केले तर शिकायचे सोडून हे काम करता?.. यासारखे प्रश्‍न विचारले जातात.

लॉकडाऊन घोषित करण्यात आले तो म्हणजे मार्च महिना. मार्च-एप्रिलचा काळ म्हणजे परिक्षांचा मौसम. परीक्षा वेळेवर झाल्या तर पेपर तपासणी वेळेवर होते आणि मग निकालही वेळेवर लागतात. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी तसेच व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश या सार्‍या गोष्टी सुरळीतपणे चालतात. विद्यार्थ्यांच्या जीवनात हा काळ ङ्गारच महत्त्वाचा असतो व जेव्हा त्यांची परीक्षा त्यांचे भवितव्य ठरवणारी असते तेव्हा तर तो हॅम्लेटच्या भूमिकेतच वावरत असतो.

 

– परीक्षा नाही म्हणून निकाल नाही –

आतापर्यंत राज्य सरकारने नवीन परिस्थितीला अनुसरून एक वेळापत्रक जारी केलेले आहे विद्यार्थ्यांनी जोरदार मागणी केल्यामुळे. सरकारी यंत्रणा व विश्‍वविद्यालय यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागला. सध्याच्या परिस्थितीत उन्हाळ्याच्या सुट्‌ट्या १५ एप्रिल ते ३१ मेपर्यंत चालू राहणार तर शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र १५ जुलैपर्यंत चालू राहील असे घोषित केलेले आहे. सध्यातरी १ जूनपासून परीक्षा सुरू होतील असे म्हटलेले असून २०२०- २१चे शैक्षणिक वर्ष सोळा जुलैपासून सुरू होईल असा निर्णय झालेला आहे. हे संपूर्ण वेळापत्रक म्हणजे अखेरचा निर्णय नसून ते पूर्णपणे परिस्थितीसापेक्ष आहे, कोणतीही घोषणा केली नसती तर शैक्षणिक क्षेत्रात अराजकाचे वातावरण पसरले असते. त्यामुळे जी काही घोषणा केलेली असेल ती हितकारक आहे, असेच म्हणावे लागेल.

सध्या चालू असलेल्या शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करू नये असा शिरस्ता आहेच. त्यामुळे या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली गेली नाही म्हणून ङ्गारसा ङ्गरक पडणार नाही. परीक्षा घेतली गेली असती तरी निकाल ठरलेलाच होता. परंतु इयत्ता नववी व अकरावी यांच्या बाबतीत शिक्षण खात्यासमोर मोठी समस्या उभी राहिली होती. त्यांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या म्हटले तर शैक्षणिक रथाचे गाडेच अडून बसेल. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञांच्या सल्ल्याने शिक्षणखात्याने त्यावर एक तोडगा शोधून काढला व विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या प्रगतीवरून त्याला उत्तीर्ण व अनुत्तीर्ण ठरवावे असा निर्णय घेतला. राहता राहिला तो दहावी व बारावीच्या शैक्षणिक मंडळाकडून घेतल्या जाणार्‍या परिक्षांचा. विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या प्रत्येक सत्रात एक अशा दोन परीक्षा घेतल्या जातात. बी.ए., बी.एससी. व बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू पडतो. या परीक्षा महाविद्यालयामार्ङ्गत घेतल्या जातात. त्यातील ही द्वितीय सत्राची परीक्षा घेता आलेली नाही. त्यामुळे उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षासाठी प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे त्यांचे भवितव्य अधांतरी टांगले गेलेले आहे.

बारावीची परीक्षा नाही म्हणून व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठीची नीट परीक्षा नाही असे हे विलंबन सत्र सुरू झालेले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑङ्ग टेक्नॉलॉजी या देशातील विविध क्षेत्रात पसरलेल्या तंत्रज्ञानाचे शिक्षण देणार्‍या प्रतिष्ठित संस्था आहेत. खूप परिश्रमानंतर या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. ही प्रवेशपरीक्षा जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे जे.ई.ई. या नावाने परिचित आहे. ही प्रवेश परीक्षा साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात घेतली जाते. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाईल असे सध्यातरी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलेले आहे.

आय.आय.टी.च्या प्रवेशपरीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मोठ्या शहरांमध्ये पूर्वतयारी करवून घेणार्‍या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. असे यापूर्वीच ठिकठिकाणी जाऊन राहिलेले विद्यार्थी लॉकडाऊनमुळे त्या त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. एन्.टी.ए.ने हा विचार करूनच विद्यार्थी सध्या जिथे असतील तिथेच परीक्षाकेंद्र निवडण्याची मुभा दिलेली आहे.

 

– आयुष्यभर स्मरणात राहील –

सध्याचे लॉकडाऊन ३ मेपर्यंत चालू राहणार असले तरी ते एकदम उठविले जाणार नाही. तसे केल्यास अनेक प्रश्‍न निर्माण होतील. लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतील. त्यामुळे एक प्रकारचे अराजकाचे वातावरण निर्माण होईल आणि सर्व व्यवस्था कोलमडतील आणि कोरोनाचा भडका पुन्हा एकदा उडण्याची शक्यता उत्पन्न होईल. म्हणूनच २० एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा – किराणा दुकाने इत्यादी सेवा क्रमाक्रमाने सुरू करण्याची मुभा दिलेली आहे. त्याचबरोबर कोणताही समारंभ, प्रार्थनास्थळामधील एकत्रीकरण, यात्रा यांच्याबरोबर शैक्षणिक संस्थांनाही कोणतेही वर्ग सुरू करण्यास वा परिक्षेचे आयोजन करण्यास परवानगी दिलेली नाही.

सध्याच्या तरुण पिढीच्या आयुष्यभर स्मरणात राहील असा हा कालखंड आहे. ज्यांच्या नोकर्‍या होत्या त्यांच्या चालू राहणार आहेत. पगारी लोकांचे पगार चालू राहणार आहेत. सेवानिवृत्तांना निवृत्तीवेतन मिळणार आहे. परंतु विद्यार्थ्यांचे काय चालू राहणार आहे हे सध्यातरी कोणीही सांगू शकत नाही. त्यातल्यात्यात समाधानाची बाब म्हणजे अख्ख्या विद्यार्थी समाजावर कोसळलेले हे संकट समान स्वरुपाचे आहे. त्यामुळे सगळेचजण सारखाच परिणाम भोगणार आहेत… असे म्हणून गप्प बसणेच या पिढीच्या हातात आहे.