लैंगिक छळणूक प्रकरणी मेजर जनरल बडतर्फ

0
106

एका कॅप्टन हुद्द्यावरील महिला अधिकार्‍याची लैंगिक छळणूक केल्याप्रकरणी भारतीय लष्कराच्या एका मेजर जनरल पदावरील अधिकार्‍याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी या निर्णयाला पुष्टी दिली आहे. २०१६ मधील या प्रकरणाची कोर्ट मार्शल चौकशी पूर्ण होऊन सदर अधिकार्‍याला बडतर्फीची शिक्षा ठोठावण्याचा निर्णय झाला.

लेफ्ट. जनरल एम. के. एस. कहलोन यांनी या निर्णयाची माहिती संबंधित मेजर जनरलला दिली असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. याप्रकरणी लष्कर प्रमुखांनी गेल्या जुलैमध्ये सदर शिक्षेच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आर्मी जनरल कोर्ट मार्शलने संबंधित मेजर जनरलला बडतर्फी शिक्षा ठोठावण्याची शिफारस केली होती.

मेजर जनरलच्या बडतर्फीच्या निवाड्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याचे वकील आनंद कुमार यांनी सांगितले, की शिक्षेची निश्‍चिती बेकायदेशीर आहे. कोर्ट मार्शल निवाड्यासंबंधात आणखी याचिका सादर करण्यासाठी आवश्यक ठरणार्‍या कोर्ट मार्शल प्रक्रियेची प्रत आपल्या अशीलाला मिळाली नसल्याचा दावा कुमार यांनी केला. तसेच आपल्या अशीलाचा फेरआढाव्यासाठीचा अर्जही प्रलंबित असताना शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही या शिक्षा निश्‍चितीच्या निवाड्याला आव्हान देणार आहोत असे ते म्हणाले.

भा. दं. सं. च्या कलम ३५४ अ आणि लष्कर कायदा ४५ खाली आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सदर मेजर जनरलला बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली होती. सदर मेजर जनरल ईशान्य भारतात २०१६ साली कार्यरत असताना सदर लैंगिक छळणुकीची तक्रार महिला अधिकार्‍याने केली होती. मात्र मेजर जनरलने आरोप फेटाळला होता. लष्करी लवादासमोर सादर केलेल्या आपल्या याचिकेत सदर मेजर जनरलने आपल्याला लष्करातील गटबाजीचा बळी करण्यात आल्याचा दावा केला होता.