लुसोफोनिया स्पर्धेत १०० कोटींचा घोटाळा

0
145

कॉंग्रेसचा आरोप : लवकरच सीबीआयकडे तक्रार
गेल्या जानेवारी महिन्यात गोव्यात झालेल्या लुसोफोनिया क्रीडा स्पर्धांत ५० ते १०० कोटी रु. चा घोटाळा झाल्याचा दावा कॉंग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. याबाबत आठवडाभरात सीबीआयकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
माहिती हक्क कायद्याखाली आपण मिळवलेल्या माहितीतून संशय घेता येईल अशी बरीच माहिती मिळाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
क्रीडा स्पर्धांच्या काळात १९० वाहने भाडेपट्टीवर घेण्यात आली. या गाड्यांवर भाड्यापोटी ३ कोटी ८४ लाख रु. खर्च करण्यात आले. सगळ्या गाड्या महाराष्ट्रातून आणण्यात आल्या. १९ दिवस त्या वापरण्यात आल्या. क्रीडा स्पर्धा १९ रोजी झाल्या. गाड्या मात्र १३ जानेवारीपासूनच भाडेपट्टीवर घेण्यात आल्या. नंतर ३१ पर्यंत त्या वापरण्यात आल्या. गरज नसताना ऑडी, बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर, इनोव्हा अशा महागड्या गाड्या भाडेपट्टीवर घेण्यात आल्या. भाडेही त्यांना दामदुप्पट देण्यात आले. इनोव्हासारख्या गाड्या गोव्यात दिवसाला ८ हजार रु. या दराने भाडेपट्टीवर मिळत असताना महाराष्ट्रातून आणलेल्या इनोव्हा गाड्यांना दिवशी ११ हजार रु. असे भाडे देण्यात आले. गोव्याच्या गाड्या भाडेपट्टीवर का घेतल्या नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
उद्घाटन व समारोप सोहळ्यावर २२ कोटी ४२ लाख रु. एवढा खर्च झाल्याचे दाखवण्यात आले असून हा खर्च भरमसाठच म्हणावा लागेल, असे कामत म्हणाले.
क्रीडापटू १८ रोजी आले. पण त्यांच्यासाठी १४ रोजीच खोल्यांचे आरक्षण करण्यात आले होते. हे असे का, असा प्रश्‍न करून या आरक्षणावर १० कोटी रु. खर्च करण्यात आल्याचे कामत म्हणाले.
याप्रकरणी सरकारी अधिकारी केशवचंद्र व क्रीडामंत्री रमेश तवडकर यांची चौकशी होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.