लुटा मजा पावसाची,  दूर ठेवा खोकला-सर्दी!

0
228
– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)
 उकळलेले गरम पाणी पिणे हे पावसाळ्यात महत्त्वाचे पथ्य होय. घरी किंवा बाहेर कुठेही जाताना पावसाळ्यात रोज चांगले वीस मिनिटे उकळलेले पाणी प्यावे. त्यासाठी थर्मासचा उपयोग करू शकता.
रात्रीच्या जेवणात मुगाची खिचडी किंवा द्रवाहार सूप याप्रमाणे जरी सेवन केले तरी आरोग्याच्या दृष्टीने शरीरास उपयुक्त ठरते. मांसरसाचे सेवन करण्यास हरकत नाही, पण चिकन, मटन टाळावे. मासे पूर्ण वर्ज्य करावेत.
रोज पिण्यासाठी पावसाळ्यात घरच्या घरी काढाही बनवता येतो. त्यासाठी गवती चहा एक-दोन इंचाचे तुकडे, दोन-तीन तुळशीची पाने, थोडे किसलेले आले, एक इंच दालचिनीचा तुकडा, दोन पाकळ्या कांद्याच्या, गूळ एक कप पाण्यामध्ये घालून चांगली उकळी आणून गॅस बंद करून झाकून ठेवावा. कोमट असताना घोट घोट पीत रहावे.
तसे पाहता श्‍वासाचा रुग्ण असेल किंवा पावसाळा चांगला हितकर घालवायचा असल्यास पावसाळा सुरू होण्याआधीच म्हणजेच ‘मे महिन्यात’ वमन दिले तर संपूर्ण वर्षभर स्रोतसाचा त्रास होत नाही.
पाऊस आवडत नाही, असा विरळाच. पावसात भिजणे, दंगा-मस्ती करणे, होड्या सोडणे, शाळेत जाताना, शाळेतून येताना येणारा पाऊस व छत्री सावरत थोडे थोडे भिजत येणे हे सगळ्यांनाच आवडते. पण आजची फ्लॅट सिस्टिम म्हणजे घरापुढचे अंगण नाही, होड्या सोडायला जाणार कुठे? पावसात अंगणात येऊन भिजणार कुठे? लहान मुलांसाठी तर सकाळी शाळा, संध्याकाळी विविध क्लासेस म्हणजे पाऊस पाहून तरी पावसाचा आनंद लुटणार म्हटला तर तोही नाही. मोठ्यांची तर बातच और. सारखे काम आणि काम व तेही वीक एन्ड किंवा सुट्टीत पावसाची मजा घेण्यासाठी ट्रॅकिंगचा पर्याय हल्लीच्या वर्षात निघालेला आहे. छोट्या छोट्या डोंगरखोर्‍यांतून पावसाचे पाणी खाली पडत असते, ज्याला धबधब्याचे स्वरुप असते व काही माणसे पायथ्याशी जमून त्या पाण्याखाली आंघोळ करतात. प्रत्येकाची आनंद लुटण्याची आपापली परिभाषा. पण हा आनंद घेण्यासाठी जाताना मनात एक ना हजार विचार. सर्दी खोकला झाला तर? दम्याचा त्रास सुरू झाला तर? किंवा काही काळजी न घेता तसेच भिजल्यावर पुढे आठ-दहा दिवस सर्दी खोकल्यापासून दूर कसे रहाल? मग त्यासाठी तुम्ही व तुमच्या बालचमुची काय काळजी घ्याल?
सर्दी, खोकला, दम्यापासून वाचायचे असल्यास प्रथमतः बाहेरचे वातावरण व त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे बदल व त्याची काळजी याचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. इतर कोणत्याही ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.
कारणः
– दूषित पाण्यामुळे जंतूंचे प्रमाण वाढते.
– त्रिदोष असंतुलन होते. वाताचे प्रमाण वाढते व पित्ताचा साठा व्हायला सुरुवात होते.
– धातू शिथिल होतात, व्यायाम करायला उत्साह नसतो. बलहानी होते व या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे व्याधीप्रतिकारशक्ती कमी होते.
– अग्नि मंदावतो. त्यामुळे भूक, पचनशक्ती कमी होते.
या सर्व शरीरात होणार्‍या बदलांमुळे शरीर नाजूक झालेले असते. मी-मी म्हणणारेसुद्धा आजारांना बळी पडतात. मग अशा परिस्थितीत काहीच काळजी न घेता, तसेच पावसाचे धो-धो खाली पडणारे पाणी डोक्यावर घेतल्यास सदी-खोकला का नाही होणार? म्हणून या सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये आहार-विहार-उपचार यांचा योग्य वापर करावयास सांगितला आहे….
पावसाळ्यात होणार्‍या सर्दी-खोकला-दम्यासाठी आहार ः-
* वातावरणातील प्रदूषण, धूलीकण पावसाबरोबर खाली येतात. त्याचबरोबर खाली जमिनीवर साठलेला कचरा पाण्याबरोबर वाहून जात असल्याने पावसाळ्याच्या सुरवातीलाच नदी-नाल्यांचे पाणी किंवा बाहेर कुठे गेल्यास तेथील पाणी पिऊ नये. उकळलेले गरम पाणी पिणे हे पावसाळ्यात महत्त्वाचे पथ्य होय. घरी किंवा बाहेर कुठेही जाताना पावसाळ्यात रोज चांगले वीस मिनिटे उकळलेले पाणी प्यावे. त्यासाठी थर्मासचा उपयोग करू शकता.
* पावसाळ्यात पाण्याचा विपाकही अम्ल झालेला असतो व पाण्यामार्फत जंतुसंसर्ग सर्वांत जास्त होतो. म्हणून पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ यासारख्या द्रव्यांचा वापर करावा जेणेकरून पाणी शुद्धही होते व पचायलाही सोपे होते.
* पावसाळ्यात अशीही भूक कमी लागते. त्यामुळे घरचे ताजे हलके अन्न सेवन करा. चार घास कमी खाणे चांगले. संध्याकाळी लवकर जेवावे. जेवायला दहा-बारा वाजत असतील तर न जेवणे हितकर! रात्रीच्या जेवणात मुगाची खिचडी किंवा द्रवाहार सूप याप्रमाणे जरी सेवन केले तरी आरोग्याच्या दृष्टीने शरीरास उपयुक्त ठरते. मांसरसाचे सेवन करण्यास हरकत नाही, पण चिकन, मटन टाळावे. मासे पूर्ण वर्ज्य करावेत.
जेवणामध्ये दूध-भात, तूप-भात, मेतकूट-भात, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी किंवा फुलका खायला हरकत नाही.
* दुपारचे जेवणही गरम असणे आवश्यक आहे. फ्रीजमधील व शिळे अन्न संपूर्ण टाळावे.
* दही कितीही आवडत असले तरी दही खाणे पूर्णपणे टाळावे. पण काळी मिरीपूड, जिरे पूड, काळे मीठ, आले व हिंगाची फोडणी देऊन ताक चालते.
* धान्ये – जुने तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू ही सर्व धान्ये आधी भाजून घेऊन वापरल्यास पचायला सोपी बनतात.
* कडधान्ये – मूग, मटकी, कुळीथ, तूर या कडधान्यांचा जास्त वापर करावा. चवळी, वाटाणा, काबुली चणा, पावटा, राजमा पूर्ण वर्ज्य करावी.
* भाज्या – दुधीभोपळा, पडवळ, दोडकी, गाजर, भेंडी, कारले यांचा जेवणात समावेश करावा. पालेभाज्या वर्ज्य कराव्या. पण रानभाज्या खायला हरकत नाही. तसेच ढोबळी मिरची, गवार शेंगा (चिटकी), वांगे, वगैरे गोष्टी अपथ्यकर आहेत.
* फळे – सफरचंद, अंजीर, नारळ, गोड मोसंबी-संत्री, पपई.
* मसाल्याचे पदार्थ – धने, जिरे, दालचिनी, मिरे, लवंग, बडीशेप, हिंग, आले, लसूण, पदिना, कोथिंबीर.
* इतर – साळीच्या लाह्या, खडीसाखर, सेंधव मीठ, मध, घरचे ताजे तूप, दूध, गोड ताक, खीरी, शिरा, मूगाचे कढण, मूगाचे लाडू, इ.
अशा प्रकारच्या आहाराचे पालन केल्यास किंवा सेवन केल्यास अग्नी व्यवस्थित राहतो. खाल्लेले पचते. मल निःसारणाला त्रास होत नाही. आम उत्पत्ती होत नाही व प्राणवह स्रोतसामध्ये कुठेच अडथळा येत नसल्याने सर्दी-खोकला-दमा यांचा त्रास पावसाळ्यात जाणवत नाही.
सर्दी-खोकल्यामध्ये आचरण किंवा विहार ः-
* पावसात भिजल्यानंतर, गार वारा लागल्यानंतर सर्दी होणे स्वाभाविक आहे. म्हणून पावसाचा आनंद उपभोगल्यावर शरीराला पाणी बाधू नये म्हणून लगेच डोके (केस) व्यवस्थित पुसून घेणे, तसेच अंगही नीट पुसावे व त्यानंतर आले, गवतीचहा, तुळशीची पाने घालून केलेला चहा प्यावा.
* गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
* घरातील हवा शुद्ध करण्यासाठी सकाळ-संध्याकाळी विशिष्ट द्रव्यांच्या धूपाने धूपन करावे. यासाठी कडूनिंब, ओवा, गुग्गुळ, अगरू, चंदन, विडंग द्रव्यांचा वापर करावा.
* फार प्रवास, रात्री जागरण टाळावे.
* दमछाक करणारा व्यायाम करू नये, पण प्राणायाम, अनुलोम-विलोम, भस्त्रिका, काही योगासने ज्यामुळे पाचही वायू संतुलित राहतील असा व्यायाम करावा.
* भिजून आल्यावर ओवा-वावडिंगाची धुरी घेतल्यावर सदी-खोकल्यासारख्या संसर्गाला प्रतिबंध होऊ शकतो.
सर्दी-खोकला-दम्यासाठी उपचार ः-
– सर्दी, खोकला हे प्राणवह स्रोतसाचे व्याधी आहेत. म्हणून प्राणवह स्रोतसाला बल देणारी म्हणजेच रसायन चिकित्सा महत्त्वाची आहे. यासाठी वर्धमान पिंपळी प्रयोग लाभदायक ठरतो. आमलकीचे विविध कल्प फुफ्फुसाला बल देणारे असल्याने पावसाळा सुरू होताच च्यवनप्रासावलेह घरात सर्वांसाठी सुरू करावा. धात्री अवलेह, भल्यातकाचे इतर कल्पही रसायन म्हणून उपयुक्त ठरतात.
– सर्दी, दमा, खोकला यामध्ये स्नेहन हा उपक्रम अत्यावश्यक ठरतो. स्नेहनासाठी कंटकारी घृत, विपल्यादी घृत, सस्नाघृत नारायण तेल वापरले जाते.
– अभ्यंगानंतर परिषेक व अवगाह स्वेद लाभदायी ठरतो.
– नस्य, गण्डूष, धूमपान हे उपक्रमही लाभदायक ठरतात.
– पावसाळ्यात वातदोषाला संतुलित ठेवण्यासाठी अभ्यंग, स्वेदन व बस्ती हे उपक्रम उत्तम होत.
– ज्यांना पावसाळ्यामध्ये खोकला होण्याची शक्यता वाटते किंवा दमा असणार्‍यांनी पावसाळा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागताच ‘सितोपलादी चूर्ण’ घेण्यास सुरू करावे, अर्थातच वैद्याच्या सल्ल्याने!!
– रोज पिण्यासाठी पावसाळ्यात घरच्या घरी काढाही बनवता येतो. त्यासाठी गवती चहा एक-दोन इंचाचे तुकडे, दोन-तीन तुळशीची पाने, थोडे किसलेले आले, एक इंच दालचिनीचा तुकडा, दोन पाकळ्या कांद्याच्या, गूळ एक कप पाण्यामध्ये घालून चांगली उकळी आणून गॅस बंद करून झाकून ठेवावा. कोमट असताना घोट घोट पीत रहावे.
– रात्रीच्या जेवणात मुगाची खिचडी किंवा द्रवाहार सूप याप्रमाणे जरी सेवन केले तरी आरोग्याच्या दृष्टीने शरीरास उपयुक्त ठरते. मांसरसाचे सेवन करण्यास हरकत नाही, पण चिकन, मटन टाळावे. मासे पूर्ण वर्ज्य करावेत.
– रोज सकाळी सुंठ-गूळ-तूप याची सुपारीएवढी गोळी करून खावी.
– रोज सकाळी अर्धा चमचा आल्याचा रस व त्यात एक चमचा मध घालून चाटावे.
तसे पाहता श्‍वासाचा रुग्ण असेल किंवा पावसाळा चांगला हितकर घालवायचा असल्यास पावसाळा सुरू होण्याआधीच म्हणजेच ‘मे महिन्यात’ वमन दिले तर संपूर्ण वर्षभर स्रोतसाचा त्रास होत नाही. स्नेहपानासाठी तीळ तेल वापरावे. मध्यम मात्रेत म्हणजेच १२ तास भूक लागणार नाही इतक्या प्रमाणात स्नेहन द्यावे. स्नेहनानंतर स्वेदन करून वमन द्यावे. मदनफलपिप्पली, वचा, यष्टीमधु, यांचे चूर्ण उत्क्लेशनासाठी वापरावे. चांगला उत्क्लेश घडल्यावर यष्टीमधु आकंठपानासाठी देऊन वमन करावे. यथायोग्य संसर्जन क्रम करावा.
पावसाळा चांगला सर्दी-खोकल्याविना घालवायचा असेल तर पथ्यकर आहार-विहाराला खूप महत्त्व आहे.
– पंचकर्माने शरीरशुद्धी करावी.
– नित्य अणुतेल नस्य करावे.
– मृदु विरेचन चालू ठेवावे.
– नियमित बस्ति घेतल्यानेही फायदा होतो.
– सितोपलादी चूर्णाचा मध, खडीसाखरेसोबत वापर करावा.
– ग्विाष्टक चूर्णाचा अग्निदीपनासाठी वापर करावा.
– रसायन म्हणून च्यवनप्राशाचा नित्य उपयोग करावा.
– अंग कोरडे उबदार ठेवावे.