लिहीत रहा, चांगला चित्रपट चालून येईल : सुधीर मिश्रा

0
125

चित्रपट विषयक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मी सांगत असतो, लिहित रहा, एक दिवस असाच चांगला चित्रपट तुमच्याकडे चालून येईल. आजही सांगतो, लिहीत रहा, थकू नका. संधी चालून येतात त्याचा लाभ घ्या, असे पटकथा लेखक, दिग्दर्शक सुधीर मिश्रा स्किल स्टुडिओ कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
हिंदी सिने सृष्टीतील पहिल्या पाच सर्वकालीन चित्रपटांमध्ये ज्या चित्रपटाचा उल्लेख होतो त्या कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाचे पटकथा लेखक तसेच हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी स्किल स्टुडिओ कार्यक्रमात पटकथा लेखन व दिग्दर्शन या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलाताना मिश्रा म्हणाले, आपण दिल्लीत मानसशास्त्रात एमफील करत होतो.

त्याकाळात आपल्या कॉलेज कँम्पसमध्ये फिल्मशी संबधीत अनेक तरूण शिक्षण घेत होते. जे माझे चांगले मित्र होते. एकदा दूरदर्शनसाठी विनोद चोप्रा यांची माझा मित्र विनोद दुआ मुलाखत घेत होता. माझा फिल्मविषयक गोष्टींमध्ये फारच रस असल्याने माझ्या मित्राने प्रश्न विचारायला लावले. माझा स्वभाव व फिल्मविषयक ज्ञान पाहून विनोद चोप्रा यांना आवडले. व त्यांनी आवड असल्यास मुंबईत येण्यास सांगितले. तिथे माझी कुंदन शाह, महेश भट्ट, जावेद अख्तर, सईद मिर्झा आदींशी ओळख झाली. आपण तेव्हा कथा लिहायचो. पुढे कुंदन शाह ‘जाने भी दो यारो’ चित्रपट करत होते. त्यात संधी लाभली. परंतु मला सदैव दिग्दर्शनात रस असायचा. त्यामुळे पुढे दिग्दर्शनाकडे वळलो, असे त्यांनी पुढे सांगितले.

सुधीर मिश्रा म्हणाले, हिंदी सिनेसृष्टीत ‘जाने भी दो यारो’ सारखा चित्रपट क्वचितच बनतो. कुंदन शाहांचा ‘एक जाने भी दो यारो’ म्हणजे राम गोपाल वर्माचे सर्व चित्रपट असे भाष्य त्यांनी यावेळी केले. मिश्रा म्हणाले, माझ्या कारकिर्दीत माझ्या भावाचे मला फार सहकार्य होते. बादल सरकार यांच्यामुळे आपण रंगभूमीशी जोडलो गेलो. आणि पुढे विनोद चोप्रा यांच्यामुळे मुंबईत आलो.

हिंदी सिनेसृष्टीला मोहन जोशी हाजीर हो, खामोश, मै जिंदा हूँ, धारावी, अर्जुन पंडित, तेरा क्या होगा जॉनी, चमेली, कलकत्ता मेल या सारखे चित्रपट देणार्‍या सुधीर मिश्राने वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. कुंदन शाहा, सईद मिर्झा, जावेद अख्तर यांच्यासारख्या कलाकारांची सोबत असल्यामुळे आपण घडत गेलो, असे पुढे मिश्रा म्हणाले. स्वत:ला मोठे कलाकार समजणारे हिरो माझ्या चित्रपटांना पसंत करत नाहीत, असे मिश्कीलपणे यावेळी ते म्हणाले. इंडियन पॅनोरमाचे ज्युरी या नात्याने ते इफ्फीत सहभागी झाले आहेत. तसेच कुंदन शाहा यांना आदरांजली वाहाण्याच्या निमित्ताने ‘जाने भी दो यारो’ हा चित्रपट दाखविण्यात आला. पटकथा लेखक या नात्यानेही त्यांचा सहभाग आहे.