‘लिजंडस्’मध्ये आनंदचा सहभाग

0
152

मॅग्नस कार्लसन चेस टूर स्पर्धेचा भाग असलेल्या ‘लिजंडस् ऑफ दी चेस’ स्पर्धेत भारताचा पाचवेळचा माजी विश्‍वविजेता ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद खेळणार आहे. १५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेची ही ऑनलाइन स्पर्धा २१ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे.

‘स्पर्धेसाठीचे निमंत्रण दोन आठवड्यांपूर्वीच मिळाले होते. परंतु, सहभागाचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला. यंदा बुद्धिबळाचे अपेक्षित सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. या स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या पिढींतील खेळाडूंविरुद्ध खेळायची संधी मिळेल.’ असे विश्‍वनाथन आनंद याने या स्पर्धेविषयी बोलताना सांगितले.

कोरोनामुळे दीर्घकाळ स्थगित राहिलेल्या बुद्धिबळाला पुन्हा व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल आनंदने कार्लसनचे अभिनंदन केले. ‘क्लच चेस’ या बुद्धिबळाच्या नव्या प्रकाराचा धाडसी प्रयोग केल्याबद्दल त्याने सेंट लुईस क्लबचे कौतुकही केले.

ही स्पर्धा म्हणजे चेस टूरचा चौथा टप्पा असेल. यातील दोन स्पर्धा कार्लसनने जिंकल्या असून एकात रशियाचा युवा खेळाडू डॅनिल दुबोव याने बाजी मारली आहे.

आनंद व रशियाचा दिग्गज अनुभवी बुद्धिबळपटू व्लादिमीर क्रामनिक खेरीज नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन, नेदरलँड्‌सचा अनीश गिरी, रशियाचा इयान नेमोपनियाच्च्ची चीनचा डिंग लिरेन ही चौकडी मागील आठवड्यात संपलेल्या चेसेबल मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे ‘लिजंडस्’साठी पात्र ठरली आहे.

स्पर्धेतील इतर खेळाडूंची घोषणा कार्लसनकडून लवकरच केली जाणार आहे. या स्पर्धेनंतर ग्रँड फायनल आायेजित करण्यात आली असून कार्लसन, डुबोव व या ‘लिजंडस्’ स्पर्धेचा विजेत्या खेळाडूला फायनलमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. उर्वरित खेळाडूंची निवड गुणांच्या आधारे केली जाणार आहे. ९ ते २० ऑगस्ट या कालावधीत फायनल खेळविली जाणार असून यासाठी ३००,००० यूएस डॉलर्स बक्षीस आहे.