लाथाळ्या नकोत

0
112

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात घेण्याचे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील सुप्त संघर्षाला अधिक धार चढू लागल्याचे दिसते. विशेषतः भाजप – शिवसेना आणि इतर मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये गेले काही दिवस जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार या दोन मुद्द्यांवरून जी तणातणी चालली आहे, तिचे निर्णायक पर्व आता सुरू झाले आहे. शनिवारी सेनेच्या मुखपत्रामध्ये – ‘सामना’ मध्ये जो अग्रलेख आला, त्यामध्ये महायुतीच्या संसारामध्ये मिठाचा खडा पडू नये अशी इच्छा व्यक्त झाली आणि ‘‘आधी सत्ता आणावी आणि मग सत्तेचे वाटप कसे करावे याचा निर्णय व्हावा या मताचे आम्ही आहोत’’ अशी विवेकी भूमिका घेतली गेली, परंतु त्याच दिवशी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी आपणही एक दावेदार असू शकतो हे आडून सूचित केल्याने त्यात विसंगती दिसू लागली आहे. भाजपा – शिवसेना हे हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या समान विचारधारेच्या पायावर नैसर्गिकरीत्या एकत्र आलेले पक्ष आहेत. गेली पंचवीस वर्षे ही युती नाना वादळे झेलूनही टिकली आहे. पण आता परिवर्तनाचा ऐतिहासिक क्षण नजीक येत असल्याचे दिसत असताना क्षुद्र लाभाच्या हव्यासापोटी दोन्ही पक्षांमध्ये विसंवाद निर्माण झाला तर महाराष्ट्राची अकरा कोटी जनता कदापि क्षमा करणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये ज्या दोन प्रमुख मुद्द्यांवर वाद आहे, त्यासंदर्भात समंजस भूमिका अपेक्षित आहे. ‘‘प्रत्येक राजकीय पक्षाला पसरण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण पसरताना तंगड्या एकमेकांत आल्या तर प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेऊन सटकतो’’ हे वास्तव ‘सामना’ चा अग्रलेख एकीकडे व्यक्त करीत असताना दुसरीकडे मुख्यमंत्रिपदासाठी आपण काही अगदीच वाईट नाही आणि मोदींसारखा चेहरा जनतेला हवा असेल आणि आपल्या चेहर्‍यात तो चेहरा जनतेला दिसत असेल तर चांगलेच आहे असे उद्धव ठाकरे यांनी विनोदी शैलीत का होईना, परंतु सुचवणे याची सुसंगती लावायची कशी? शिवसेना भाजपापेक्षा एक पायरी वर राहण्याची इच्छा बाळगते आहे, परंतु जेव्हा दोन्ही पक्ष सत्तेत होते तेव्हाची स्थिती आणि आज यामध्ये केवळे पाणी वाहून गेले आहे. गेल्या म्हणजे २००९ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सेनेने १६० जागा लढवल्या आणि त्यातील ४४ जिंकल्या, पण भाजपाने फक्त ११९ जागा लढवूनही ४६ जागा काबीज केल्या होत्या. गेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाची कामगिरी सेनेपेक्षा खूप चांगली दिसून आली आहे. लोकसभेच्या राज्यातील ४८ जागांपैकी सेनेला १८ मिळाल्या, तर भाजपाने २३ जागा जिंकल्या. मग असे असूनही सेना मुख्यमंत्रिपदावर आधीच दावा कोणत्या आधारावर करते आहे? हे म्हणजे शिताआधी मीठ खाण्यासारखे आहे. ठाकरे कुटुंब आजवर स्वतः सत्तेपासून दूर राहिले. त्यांची लोकप्रियता अनेक दशके टिकण्यात बाळासाहेबांच्या त्या निर्णयाचेही मोठे योगदान होते. मात्र, आज त्या परंपरेतून बाहेर पडून उद्धव स्वतःला मुख्यमंत्रिपदामध्ये रस असल्याचे सूचित करतात, त्यामागे भाजपाच्या पायात खोडा घालून अधिक जागा वाट्याला मिळवण्याचे डावपेच आहेत. परंतु भाजपा नमते घेण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही, कारण अजूनही मोदींच्या विजयाची नशा नेत्यांवर स्वार आहे. आजवर भाजपा – सेनेमध्ये जे जे पेचप्रसंग उद्भवले, ते दूर करणारे प्रमोद महाजनांसारखे खंदे नेते आज नाहीत. त्यांची उणीव आजही प्रकर्षाने जाणवते आहे. एकीकडे निवडणूकपूर्व सर्वेक्षणे महायुतीच्या बाजूने हवा वाहत असल्याचे सुचवून राहिली आहेत, दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांची सेना – भाजपाकडे रीघ लागलेली आहे. आदर्श आणि सिंचन घोटाळ्याचे भूत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या मानगुटीवरून उतरायला तयार नाही. असे सगळे वातावरण असताना महायुतीतील घटक पक्षांमधील अंतर्गत बेबनाव जेवढ्या लवकर संपुष्टात येईल तेवढे त्यांच्या हिताचे आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही अंतर्गत संघर्षाचा हाच प्रकार चालला आहे. असे वाद निवडणुकीच्या तोंडावर उद्भवणे स्वाभाविक असते, परंतु त्यावर तोडगा काढून एकदिलाने प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करण्याऐवजी आपसात हाणामार्‍या सुरू ठेवणे कोणाच्याच दृष्टीने हितावह ठरणार नाही.